Advertisement

रेड झोनमधील मुंबईत १९ हजार तयार घरे विक्रीविना पडून

लाॅकडाऊनमुळे घर खरेदी-विक्री प्रक्रिया पूर्णपणे थंडावल्यामुळे देशातील ७ प्रमुख शहरांतील विक्रीयोग्य असलेली तब्बल ७८ हजार घरे तशीच पडून आहेत. यांतील मुंबई महानगर आणि पुण्याचा ४५ टक्के वाटा आहे.

रेड झोनमधील मुंबईत १९ हजार तयार घरे विक्रीविना पडून
SHARES

कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये म्हणून लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लाॅकडाऊनचा मोठा फटका बांधकाम व्यवसायाला देखील बसला आहे. लाॅकडाऊनमुळे घर खरेदी-विक्री प्रक्रिया पूर्णपणे थंडावल्यामुळे देशातील ७ प्रमुख शहरांतील विक्रीयोग्य असलेली तब्बल ७८ हजार घरे तशीच पडून आहेत. यांतील मुंबई महानगर आणि पुण्याचा ४५ टक्के वाटा आहे. तिसऱ्या टप्प्यातील लाॅकडाऊनमध्येही बांधकाम क्षेत्रावर असलेली बंदी कायम राहणार असल्याने नुकसानीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता मालमत्ता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.  

मुंबई, पुण्यात परवानगी नाहीच

केंद्र सरकारने १७ मे पर्यंत देशव्यापी लाॅकडाऊन वाढवला आहे. या तिसऱ्या टप्प्यातील लाॅकडाऊनमध्ये नव्या अधिसूचनेनुसार रेड झोनमध्ये मर्यादित प्रमाणात उद्योग सुरू करण्याची तसंच बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली असली, तरीही मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशात ही परवानगी नसेल. ज्या रेड झोन भागात बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे, त्या ठिकाणी बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणीच (इन सिटू) राहण्याची सोय असणं बंधनकारक असणार आहे. 

हेही वाचा - IFSC मुंबईतच ठेवा, नाहीतर देशाचं आर्थिक नुकसान- शरद पवार

७८ हजार तयार घरे धूळखात

लाॅकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे, व्यवसाय, आॅफिस ठप्प झाल्याने त्याचा रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. पैशांची देवाण-घेवाण थांबल्याने सर्वसामान्यांचं बजेट देखील कोलमडलं आहे. अशा स्थितीत सहाजिकच ग्राहकांनी घर खरेदीतही आखडता हात घेतलेला आहे. यामुळे अॅनाराॅक प्राॅपर्टी कन्सल्टंट संस्थेच्या आकडेवारीनुसार मुंबई महानगर, पुणे, एनसीआर, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद अशा ७ शहरांमध्ये ६५,९५० कोटी रुपये किंमतीची तब्बल ६.४४ घरे विक्रीविना पडून आहेत. तर यातील ७८ हजार तयार घरे ही धूळ खात पडून आहेत.

मुंबई महानगर आणि पुण्यातील घरांच्या विक्रीसंदर्भात माहिती देताना अॅनाराॅक प्राॅपर्टी कन्सल्टंटचे चेअरमन अनुज पुरी म्हणतात की, मुंबई महानगर आणि पुण्यात आजघडीला ३७,५५० कोटी रुपये किंमतीची ३५,२०० घरे पडून आहेत. एकूण ७ शहरांच्या तुलनेत केवळ मुंबई-पुण्याचा वाटा ५७ टक्के इतका होतो. 

देशभरातील बांधकाम प्रक्रिया पूर्णपणे थांबलेली आहे. तरीही घर खरेदी खरेदीदारांसाठी मात्र ही सुवर्णसंधी आहे, कारण या काळात घर खरेदारांना घासाघीस करून वाजवी दरात रेडी टू मूव्ह घर मिळू शकतं. सध्या व्याजाचे दरही ७.८ ते ७.१५ टक्क्यांदरम्यान आहेत. अनेकांनी आॅनलाइन प्लॅटफाॅर्मचा वापर करत घर खरेदी-विक्री प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्याचाही ग्राहकांना फायदा होऊ शकतो, असं पुरी म्हणतात.  

'अशी' आहे आकडेवारी:

  • मुंबई महानगरात एकूण २.१३ लाख घरे विक्रीविना पडून आहेत. यामध्ये २६,१५० कोटी रुपये मूल्याच्या १९,२०० घरांचा समावेश आहे. एकूण घरांच्या तुलनेत हे प्रमाण ९ टक्के आहे. 
  • तर, पुण्यात एकूण ९३,३०० घरे विक्रीविना पडून आहेत. यामध्ये ११,४०० कोटी रुपयांच्या १६ हजार तयार घरांचा समावेश आहे. एकूण घरांच्या तुलनेत हे प्रमाण १७ टक्के आहे.
  • एनसीआरमध्ये एकूण १.७३ लाख घरे विक्रीविना पडून आहेत. यामध्ये १०,७२० कोटी रुपयांच्या १५,६०० तयार घरांचा समावेश आहे. एकूण घरांच्या तुलनेत हे प्रमाण ९ टक्के आहे.
  • बंगळुरूत एकूण ६२,८०० घरे विक्रीविना पडून आहेत. यामध्ये ५,८०० कोटी रुपयांच्या ९,४०० तयार घरांचा समावेश आहे. एकूण घरांच्या तुलनेत हे प्रमाण २८ टक्के आहे.
  • कोलकातामध्ये एकूण ४३,६०० घरे विक्रीविना पडून आहेत. यामध्ये २८६० कोटी रुपयांच्या ५ तयार घरांचा समावेश आहे. एकूण घरांच्या तुलनेत हे प्रमाण १२ टक्के आहे.
  • हैदराबादमध्ये एकूण २४,९०० घरे विक्रीविना पडून आहेत. यामध्ये १,८७० कोटी रुपयांच्या २,४०० तयार घरांचा समावेश आहे. एकूण घरांच्या तुलनेत हे प्रमाण १० टक्के आहे.

हेही वाचा - कामकाज सुरू करण्यासाठी महाराष्ट्रातील १३, ४४८ उद्योगांकडून अर्ज

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा