एलफिन्स्टनवर 23 बळी, धारावीतही तेच होणार?


SHARE

शुक्रवारी एल्फिन्स्टन रेल्वे पादचारी पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि 23 जणांचा दुर्दैवी बळी गेला. या दुर्घटनेने मुंबईकरांच्या मनात भिती निर्माण केली आहे. असे असताना एल्फिन्स्टनसारखी घटना धारावीतील संत रोहिदास मार्गावरील 60 फुटी रोडवरही घडू शकते. कारण माहिम रेल्वे स्थानकाकडे धारावीकडून जाणारा हा एकमेव रस्ता. पण हा रस्ता अत्यंत अरूंद असून पादचाऱ्यांची संख्या भरमसाठ आहे. त्यामुळे हा रस्ता अपुरा पडत असल्याने त्रासलेल्या पादचाऱ्यांकडून 'सांगा चालायचं कसं?' असा प्रश्न विचारला जात आहे. तर एल्फिन्स्टनसारखी चेंगराचेंगरी झाली, तर जबाबदार कोण? असा सवालही धारावीकरांकडून केला जात आहे.


सात मिनिटांसाठी अर्धा तास खर्च?

12 लाख लोकसंख्या असलेला धारावीचा परिसर. अशा वेळी धारावीकरांना माहिम रेल्वे स्थानकाला जाण्यासाठी वा माहिम रेल्वे मार्ग पार कडून पलिकडे जाण्यासाठी संत रोहिदास मार्गावरील 60 फुटी रोडचाच पर्याय आहे. मात्र हा रस्ता अत्यंत अरूंद असून हा रस्ता कायम गर्दीने व्यापलेला असतो. दोन्ही बाजूला दुकानांची दाटी असल्याने पादचाऱ्यांची आणखी गैरसोय होते. 60 फुटी रस्ता ते माहिम स्थानक हे अंतर सात मिनिटांत पार होण्याजोगे असताना गर्दीच्या वेळेस हेच सात मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी धारावीकरांना चक्क 30 मिनिटं खर्च करावे लागतात.

सायन रुग्णालयाच्या दिशेने जाण्यासाठी वाहनचालकही याच 60 फुटी रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे एकीकडे वाहनांची कोंडी आणि या कोंडीतून वाट काढत पादचाऱ्यांची माहिम स्थानक तसेच घर गाठण्याची घाई. त्यामुळे गेल्या काही वर्षांत या रस्त्यावर अपघातांची संख्या वाढली असल्याची माहिती धारावीतील शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने यांनी दिली आहे.


म्हणून स्कायवॉकची मागणी

धारावीकरांची हीच गैरसोय लक्षात घेता 2012 मध्ये माहिम ते धारावी असा स्कायवॉक बांधण्याची मागणी धारावीकरांनी उचलून धरली. त्यानुसार राज्य सरकारने 2013 मध्ये धारावी स्कायवॉक बांधण्याची जबाबदारी म्हाडावर टाकत त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. सरकारच्या निर्णयानुसार म्हाडाने माहिम स्थानक ते अभ्युदय बँक असा स्कावॉक बांधण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी अंदाजे 36 कोटी रुपयांची मागणी सरकारकडे केली.


...म्हणून रखडला स्कायवॉक!

प्रत्यक्षात 36 कोटींपैकी अंदाजे 12 कोटींचाच निधी मिळाल्याने, उपलब्ध निधीनुसार म्हाडाने अर्धा स्कायवॉक बांधून अडीच-तीन वर्षांपूर्वीच पूर्ण केलाय. पण हा अर्धा स्कायवॉक उपयोगाचा नसल्याने हा स्कायवॉक वापरावाचून धूळ खात पडून आहे. स्कायवॉकचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी म्हाडाकडून 19 कोटींची मागणी गेल्या दोन-अडीच वर्षांपासून केली जात आहे. पण सरकार आणि एमएमआरडीएकडून निधीच मिळत नसल्याने दुसरा टप्पा रखडला आहे. त्यामुळे धारावीकरांचे हाल सुरूच असून हा स्कायवॉक कधी पूर्ण होणार? असा सवाल धारावीकरांकडून विचारला जात आहे.


नव्या-कोऱ्या स्कायवॉकची दुरवस्था

बांधून झालेला अर्धा स्कायवॉक वापराविना धूळ खात पडून असल्याने या स्कायवॉकवर रात्री गर्दुल्ल्यांचा अड्डा जमतो. भिकारी झोपतात. त्यामुळे नव्याकोऱ्या स्कायवॉकची दुरवस्था झाली असून स्कायवॉकवर प्रचंड दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरल्याचेही माने यांनी स्पष्ट केले आहे. तर त्वरीत निधी मिळवत हा स्कायवॉक पूर्ण करण्याची मागणीही त्यांनी केली असून त्यासाठी लवकरच म्हाडा उपाध्यक्षांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे.


दुसरा टप्पा लवकरच...

दुसऱ्या टप्प्यासाठी 19 कोटींच्या निधीची मागणी एमएमआरडीएकडे केली होती. त्यानुसार एमएमआरडीएने निधी देण्याचे मान्य करत त्यासंबंधीचे लेखी पत्र पाठवले आहे. साधारणत: 15 कोटींचा निधी लवकरच मिळणार असल्याने दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होईल. येत्या पंधरा दिवसांत दुसऱ्या टप्प्यासाठी निविदा काढण्याचा विचार आहे.

एस. एस. कोन्नूर, कार्यकारी अभियंता (प्रनिस)हेही वाचा

धक्कादायक...मुंबईतले तलाव झाले गायब!


संबंधित विषय
ताज्या बातम्या