गिरगावमधील कोळणींचं कोयता आंदोलन, मेट्रो-३ विरोधात आक्रमक

गिरगावमधील मच्छिमार्केटची जागाही 'एमएमआरसी'ला हवी असून मच्छिमार्केटमधील कोळणींनी ही जागा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यानुसार या चिराबाजार मासे विक्रेता मंडळाच्या माध्यमातून या कोळणी रस्त्यावर उतरल्या.

  • गिरगावमधील कोळणींचं कोयता आंदोलन, मेट्रो-३ विरोधात आक्रमक
  • गिरगावमधील कोळणींचं कोयता आंदोलन, मेट्रो-३ विरोधात आक्रमक
SHARE

गिरगाव, चिराबाजार येथील १०० वर्षे जुन्या मच्छिमार्केटची जागा कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पाच्या मार्गात येत असल्याने मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी) ने ही जागा खाली करण्यासाठी मच्छिमार्केट आणि मार्केटमध्ये बसणाऱ्या कोळणींना नोटीसा बजावल्या आहेत. या नोटीसा पाहून कोळणी आक्रमक झाल्या असून कोणत्याही परिस्थितीत आम्ही मच्छिमार्केट सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे. एवढंच नाही, तर आपला असंतोष राज्य सरकारसह 'एमएमआरसी'पर्यंत पोहोचवण्यासाठी कोळणींनी शुक्रवारी चक्क कोयता आंदोलन केलं.


विश्वासात न घेताच विस्थापन

मेट्रो-३ च्या कामासाठी गिरगावमधील मोठ्या प्रमाणात निवासी-व्यावसायिक बांधकामं विस्थापित होणार आहेत. असं असतानाही विस्थापितांच्या पुनर्वसनाचा कोणताही आराखडा 'एमएमआरसी'कडं नाही. विस्थापितांना विश्वासात न घेताच हा प्रकल्प दामटला जात असल्याचं म्हणत गिरगावकर सुरूवातीपासूनच या प्रकल्पाला विरोध करत करत आहेत. त्यातच गिरगावमधील मच्छिमार्केटची जागाही 'एमएमआरसी'ला हवी असून मच्छिमार्केटमधील कोळणींनी ही जागा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यानुसार या चिराबाजार मासे विक्रेता मंडळाच्या माध्यमातून या कोळणी रस्त्यावर उतरल्या.

पोटावर पाय

चिराबाजार इथं गिरगावातील सर्वात मोठं १०० वर्षे जुनं मच्छिमार्केट आहे. यात २०० हून अधिक कोळणी मासेविक्री करतात. असं असताना मेट्रो-३ प्रकल्पामुळे त्यांच्या पोटावर पाय पडणार आहे. वर्षानुवर्षे ज्या ठिकाणी मासेविक्री केली तिथून अचानक दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येणार असल्यानं आपल्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. त्यामुळेच मच्छिमार्केटची जागा 'एमएमआरसी'ला देण्यास आपला विरोध असल्याची माहिती चिराबाजार मासे विक्रेता मंडळाच्या उपाध्यक्षा प्रीती दवणे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.जशास तसं उत्तर देऊ

'एमएमआरसी'नं आम्हाला ठाकूरद्वार येथील महापालिका शाळेतील तळमजल्यावरील जागा दिली असून ती जागा आम्हाला मान्य नाही. हेच 'एमएमआरसी'ला दाखवून देण्यासाठी कोयता आंदोलन केल्याचंही दवणे यांनी स्पष्ट केलं आहे. यापुढं जर आम्हाला इथून हटवण्याचा प्रयत्न केला तर जशास तसं उत्तर देऊ असा कडक इशाराही त्यांनी राज्य सरकारसह 'एमएमआरसी'ला दिला.


शिवसेनेचा पाठिंबा

कोळणींच्या या आंदोलनाला शिवसेनेनंही पाठिंबा दिला आहे. त्यामुळंच या कोयता आंदोलनात विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्यासह शिवसैनिकही सहभागी झाले होते. 'एमएमआरसी'च्या या निर्णयामुळं कोळी महिलांचा व्यवसाय धोक्यात येणार असून त्यांच्या पुनर्वसनासाठी कोणतीही ठोस भूमिका अद्यापपर्यंत 'एमएमआरसी'नं घेतलेली नाही. असं असताना त्यांना इथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न होत असून शिवसेना हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी सकपाळ यांनी दिली.

याविषयी एमएमआरसीचे वरिष्ठ अधिकारी रमण्णा यांंच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला.हेही वाचा-

मेट्रो-३ घेणार आणखी ७६ झाडांचा बळी!

मेट्रो-३ च्या कामामुळं वरळी नाका महापालिका शाळेला तडेसंबंधित विषय
ताज्या बातम्या