अखेर मोदी चाळीची होणार भूकर पाहणी

 Sewri
अखेर मोदी चाळीची होणार भूकर पाहणी

अनेक वर्षांपासून पुनर्विकास रखडलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या शिवडीतील के. के. मोदी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पातील बिल्डरला अखेर म्हाडाने दणका देण्यास सुरुवात केली आहे. बिल्डरने सर्व नियम धाब्यावर बसवत पुनर्विकासाचा आराखडा तयार करत तो मंजूर करून घेतल्याच्या रहिवाशांच्या आणि बृहन्मुंबई भाडेकरू परिषदेच्या तक्रारीची अखेर म्हाडाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार 14 जून रोजी के. के. मोदी चाळीची भूकर पाहणी करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यासंबंधीचे पत्र जारी केल्याची माहिती येथील रहिवासी मनोज सावंत यांनी दिली आहे.

19 वर्षांपासून मे. एम. बी. कन्स्ट्रक्शन या बिल्डरने मोदी चाळीचा पुनर्विकास रखडवला आहे. हा पुनर्विकास मार्गी लागावा आणि आपल्याला हक्काचे घर मिळावे यासाठी तिथले रहिवासी म्हाडाच्या पायऱ्या झिजवत आहेत. 

दुसरीकडे न्यायालयीन लढाईही रहिवाशांनी लढली. त्यात त्यांना यशही आले. पण न्यायालयाच्या आदेशाचेही पालन हा बिल्डर करताना दिसत नसल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. त्याचवेळी मोदी चाळीच्या पुनर्विकासाचा आराखडा बिल्डरने तयार केला. इतकेच नाही तर त्याने पालिकेची मंजुरी देखील मिळवून घेतली आहे. पण तो आराखडा चुकीचा असून त्यात अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत रहिवाशांनी याबाबतही म्हाडाकडे तक्रार केली होती. या आराखड्यानुसार डोंगर भाग पोखरून इमारत बांधली जाणार आहे, तर इमारतीच्या बाजूने अग्निशमन दलाची गाडी जाण्यासाठी आवश्यक ती जागा सोडण्यात आलेली नाही. त्यातच प्रकल्पाच्या बाजूलाच टाटा पॉवरच्या लाईन्स जातात. नियमाप्रमाणे 30 मीटरची जागाही सोडण्यात आलेली नाही. असे असताना पालिकेने या आराखड्याला मंजुरी कशी दिली? असा प्रश्न तिथल्या रहिवाशांनी उपस्थित करत या आराखड्याविरोधात तक्रार केली होती.


हेही वाचा

म्हाडाला कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या बिल्डरला दणका!

झोपु रखडवणाऱ्या 24 बिल्डरांना झोपुचा दणका

आता बिल्डर तुम्हाला फसवूच शकणार नाही!


एप्रिलमध्ये झालेल्या सुनावणीत दुरुस्ती मंडळाने या तक्रारीची दखल घेत जागेची भूकर पाहणी करण्याचे आदेश दिले होते. पण ही पाहणी काही होत नव्हती. त्यामुळे हा विषय रहिवाशांनी लावून धरला आणि अखेर मंडळाने14 जूनला ही पाहणी लावली.

Loading Comments