म्हाडाच्या दुकानांचीही लॉटरी लटकलेलीच...

  Mumbai
  म्हाडाच्या दुकानांचीही लॉटरी लटकलेलीच...
  मुंबई  -  

  म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांसाठी दरवर्षी 31 मे रोजी फुटणारी लॉटरी आता ऑगस्ट उजाडला तरी फुटलेली नाही, नव्हे लॉटरीची साधी जाहिरातही अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. कधी रेराचे तर कधी जीएसटीचे कारण पुढे रेटत लॉटरी लांबत असल्याचे असल्याचे सांगणाऱ्या मुंबई मंडळाकडे मुळात लॉटरीसाठी पुरेशी घरेच नसल्याने लॉटरी लांबत असल्याची जोरदार चर्चा म्हाडातच रंगली आहे. अशातच नियम धाब्यावर बसवत मास्टरलिस्टमधील घरांचा समावेश लाँटरीत करण्याचा डाव मुंबई लाइव्हच्या यासंबंधीच्या वृत्ताने हाणून पाडला आहे. तर पवईतील 1 कोटी 61 लाख किंमतीच्या घराबाबतच्या मुंबई लाइव्हच्या वृत्तानंतर घरांच्या किंमतीवरूनही म्हाडात खल सुरू झाल्याने लॉटरी काही मार्गी लागत नसल्याचे चित्र आहे. अशावेळी मुंबई मंडळाकडे अंदाजे 200 दुकाने बांधून तयार आहेत. तर या दुकानांच्या लॉटरीची तयारीही दरम्यानच्या काळात मुंबई मंडळाने पूर्ण केली आहे. दुकानांच्या किंमतीही जवळपास निश्चित झाल्या आहेत. असे असताना या दुकानांची लॉटरी मुंबई मंडळाने लटकवली आहे. मुंबई मंडळाच्या उदासीन कारभारामुळे घरांसह दुकानांची लॉटरी लटकली असून 200 दुकाने धूळ खात पडून असल्याची चर्चा आहे.


  अशी निघते दुकानांची लॉटरी


  घरांच्या लॉटरीप्रमाणे दुकानांची लॉटरी नसते. कारण दुकानांच्या विक्रीसाठी इच्छुकांकडून निविदा मागवल्या जातात. दुकानांची एका ठराविक किंमती मंडळाकडून निश्चित केली जाते. या किंमतीपेक्षा अधिक जो निविदाधारक-अर्जदार बोली लावतो तो बाजी मारतो आणि मग त्याला दुकानाची लॉटरी लागते, अर्थात त्याची पात्रता निश्चित करत त्याला दुकान वितरीत केले जाते. त्यामुळे घरांच्या लॉटरीपेक्षा दुकानांच्या लॉटरीची पद्धत वेगळी असते.

  म्हाडा वसाहतीतील रहिवाशांना आवश्यक त्या सुविधा अर्थात किराणा माल, दळण, औषधे, फळे, भाजीपाला मिळण्याची सोय व्हावी, यासाठी म्हाडा गृहप्रकल्पात इमारतींबरोबर काही दुकानेही बांधली जातात. महत्त्वाचे म्हणजे या व्यावसायिक गाळ्यांमध्ये समाजमंदिर, अद्ययावत व्यायामशाळा आणि बँकांसाठीच्या गाळ्यांच्याही समावेश असतो. त्यानुसार, गेल्या कित्येक वर्षांपासून मोठ्या संख्येने दुकाने बांधून तयार आहेत. पण मुंबई मंडळाला मात्र या दुकानांचा विसर पडल्याचे चित्र आहे.


  इथे आहेत दुकाने


  बिंबिसारनगर, गोरेगाव, येथे दोन मजली व्यावसायिक इमारत मुंबई मंडळाने बांधली असून यात अंदाजे 17 गाळे आहेत. त्यात एका बँकेसाठीच्या, जीमसाठीच्या गाळ्यासह समाज मंदिराच्या जागेचाही समावेश आहे. द्रुतगती मार्गालगत ही इमारत असल्याने दुकानांची लॉटरी निघाल्यास येथील दुकानांना चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. तर मालवणी येथेही तीन व्यावसायिक इमारती असून यातही विविध प्रकारच्या अंदाजे 59 गाळ्यांचा समावेश आहे. तर सिद्धार्थनगर, गोरेगाव येथे चार दुकाने बांधून तयार आहेत. त्याचवेळी पवई आणि प्रतिक्षानगरसह अन्य म्हाडा वसाहतीतील दुकानेही लॉटरीसाठी सज्ज आहेत.


  विरार-बोळींजमध्येही दुकाने धूळ खात पडून


  याआधी मुंबई मंडळाने 2010 मध्ये 169 दुकानांची लॉटरी अर्थात विक्री निविदा पद्धतीने केली होती. त्यानंतर आता सात वर्षे झाली तर दुकानांची विक्री काही मुंबई मंडळाकडू करण्यात आलेली नाही. महत्त्वाचे म्हणजे कोकण मंडळाच्या विरार-बोळींजमधील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पातही मोठ्या संख्येने दुकाने बांधण्यात आली असून ही दुकानेही तयार आहेत. मात्र या दुकानांच्या विक्रीसाठीही कोकण मंडळाकडून निविदा काढण्यात येत नसल्याचे चित्र आहे. मुंबई मंडळाप्रमाणे कोकण मंडळही दुकानांच्या विक्रीसंदर्भात उदासीनच असल्याचे चित्र आहे. दुकानांसाठी मोठी मागणी असूनही मुंबई आणि कोकण मंडळाकडे सातत्याने सर्वसामान्यांकडून दुकानांच्या विक्रीसंदर्भात चौकशी होत आहे. तरीही विक्री काही होत नसल्याने या दोन्ही मंडळावर टीकाही होताना दिसते आहे.


  इथेही ओसीचा खोडा


  मुंबई मंडळाच्या उदासीन कारभारामुळे दुकानांची लॉटरी रखडल्याची चर्चा आहे. मुंबई लाइव्हने यासंबंधी पाठपुरावा केला असता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे बिंबिसार येथील दुकानांना पालिकेकडून ओसीमिळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. बिंबिसार येथे मुंबई मंडळाची जी व्यावसायिक इमारत उभी आहे त्या इमारतीवरून पालिका आणि मुंबई मंडळात वाद सुरू असून पालिकेकडून ओसी देण्यास नकार दिला जात नसल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. तर मालवणीतील दुकानांसाठीही अद्याप ओसी मिळालेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी मात्र ओसी मिळण्यात काही अडचणी नसून ओसी मिळवण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे. लवकरच ओसी मिळेल, अशी माहिती मुंबई लाइव्हला दिली आहे. त्यामुळे ओसी मिळण्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला  असेल तर दुकानांची विक्री का केली जात नाही, असा सवालही उपस्थित केला जात आहे. दरम्यान, ओसी मिळेपर्यंत दुकानांच्या निविदा काढत पात्रता निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी अशीही मागणी होत आहे. त्यामुळे आता मुंबई मंडळ दुकानांच्या बाबतीत काय आणि कधी निर्णय घेते की घरांप्रमाणेच दुकानेही धूळ खात अशीच पडून राहतात, हेच पाहणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण बैठकीत असल्याचे सांगत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.