मुंबई मंडळाची पु्न्हा मास्टरलिस्टच्या घरांसाठी फिल्डिंग

  Mumbai
  मुंबई मंडळाची पु्न्हा मास्टरलिस्टच्या घरांसाठी फिल्डिंग
  मुंबई  -  

  म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीतील घरांचा आकडा वाढावा यासाठी मंडळाने पुन्हा लॉटरी लटकवत मास्टरलिस्टमधील घरे समाविष्ट करण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. मास्टरलिस्टची घरे कायद्याच्या चौकटीत राहून कशी लॉटरीत समाविष्ट करता येतील, याच्या चाचपणीपासून ते या घरांच्या चाव्या शोधण्यापर्यंत मुंबई मंडळ, मुंबई दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाची सध्या चांगलीच दमछाक सुरू आहे.

  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मास्टरलिस्टमधील 153 घरे मुंबई मंडळाकडे वर्ग करण्याची तयारी दाखवली आहे. त्यानुसार यातील किती घरे लॉटरीत घेता येतील? याचीही चाचपणी सुरू असून सुमारे सव्वाशे घरांचा समावेश लॉटरीत करण्याची मुंबई मंडळाची तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना याला दुजोरा दिला आहे.

  उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासांतर्गत दुरुस्ती मंडळाला मिळालेली अतिरिक्त घरे ही म्हाडा विनियम 35 नुसार मास्टरलिस्टमधील मूळ रहिवाशांशिवाय कुणालाही देता येत नाहीत. असे असताना मुंबई मंडळ आणि दुरुस्ती मंडळाने कायदा धाब्यावर बसवत मास्टरलिस्टमधील अंदाजे 159 घरे लॉटरीमध्ये समाविष्ट करण्याचा घाट महिन्याभरापूर्वी घातला. यासंबंधीचे सविस्तर वृत्त महिन्याभरापूर्वी 'मुंबई लाइव्ह'ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताचा चांगलाच धसका मुंबई मंडळ आणि दुरुस्ती मंडळाने घेतला आणि ही घरे लॉटरीतून बाद केली.

  वर्षागणिक मुंबई मंडळाच्या लॉटरीतील घरांचा आकडा फुगण्याऐवजी कमी होत चालला आहे. तर दुसरीकडे म्हाडाच्या घरांची मागणी वाढत आहे. त्यामुळे म्हाडावर सडकून टीका होत आहे. या धर्तीवर लॉटरीतील घरांचा आकडा वाढवण्यासाठी मुंबई मंडळाने वाटेल ते करण्याचा जणू विडाच उचलला आहे. त्यामुळेच याआधी 2016 च्या सोडतीत वादग्रस्त, बंद पत्राचाळ प्रकल्पातील 306 घरांच्या सोडतीचा समावेश केला. 

  आजही या घरांचे काम पूर्ण नसून ओसीही मिळालेली नाही, किंबहुना या घरांना ओसी मिळेल का? आणि या घरांचे काम पूर्ण होईल का? हाच मोठा प्रश्न आहे. असे असताना आता जुनी, मास्टरलिस्टमधील घरे कायद्याला, नियमांना फाटा देत लॉटरीत समाविष्ट करण्याच्या पुन्हा हालचाली मुंबई मंडळाने सुरू केल्या आहेत. घरांचा आकडा वाढावा यासाठी मंडळावर प्रचंड दबाब असल्याने मंडळाने हा घाट घातल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, ही घरे लॉटरीत समाविष्ट करणे मुंबई मंडळासह दुरूस्ती मंडळ आणि म्हाडा प्राधिकरणालाही चांगलेच महागात पडेल, अशी चर्चा आहे.


  जुनी आणि घुसखोरी असलेली घरे?

  मास्टरलिस्टमधील ही घरे 180 चौ. फुटांपासून ते 750 चौ. फुटापर्यंतची आहेत. ही घरे कशा अवस्थेत आहेत, याची पाहणी सध्या मुंबई मंडळ आणि दुरूस्ती मंडळाकडून सुरू आहे. ही घरे अतिशय जुनी असून यातील काही घरांमध्ये घुसखोरी झाल्याचेही सूत्रांकडून समजते. दक्षिण मुंबईत विखुरलेल्या या घरांच्या पाहणीसाठी घरांच्या चाव्यांचीही शोधाशोध जोरात सुरू आहे. यंदा अत्यल्प वर्गासाठी सोडतीत घरेच नसल्याचे वृत्त 'मुंबई लाइव्ह'ने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले होते. त्यामुळेही म्हाडाला टीकेला सामारे जावे लागले होते. अत्यल्प गटासाठी काही केल्या घरेच उपलब्ध होत नसल्याने मुंबई मंडळाने पुन्हा आपला मोर्चा मास्टरलिस्टच्या घरांकडे वळवला आहे.


  लॉटरी लांबणार

  विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जुलैला जाहिरात प्रसिद्ध करत 14 सप्टेंबर रोजी सोडत फोडण्याची संपूर्ण तयारी मुंबई मंडळाने केली होती. मात्र असे असताना उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी यात खोडा घातल्याची चर्चा आहे. घरांचा आकडा वाढवण्यासाठी मास्टर लिस्टच्या घरांचा आग्रह धरण्यात आल्याने मुंबई मंडळ या घरांचा समावेश लॉटरीत करण्याच्या कामाला लागले आहे. त्यामुळे घरांच्या किंमती निश्चित करण्यापासून घरे लॉटरीत समाविष्ट करण्यापर्यंतची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मंडळाला किमान दहा दिवसांचा वेळ लागणार आहे. त्याअनुषंगाने लॉटरी लांबणार असेच चित्र आहे.
  हेही वाचा -

  म्हाडाच्या टीटबिट भूखंडाचे वितरण आता सरकार करणार

  म्हाडा लॉटरी : ओसी रखडली, विजेते प्रतिक्षेत


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.