Advertisement

सिडको पुन्हा अडचणीत, 'महारेरा'कडे दुसरी तक्रार

'महारेरा' कायद्याचं उल्लंघन केल्याचा दावा करत सिडकोविरोधात दुसरी तक्रार 'महारेरा'कडे दाखल झाली आहे. 'महाराष्ट्र चेंबर आॅफ हाऊसिंग इंडस्ट्रीज' (एमसीएचआय)च्या रायगड शाखेनं ही तक्रार दाखल केली आहे.

सिडको पुन्हा अडचणीत, 'महारेरा'कडे दुसरी तक्रार
SHARES

सिडकोच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कारण 'महारेरा' कायद्याचं उल्लंघन केल्याचा दावा करत सिडकोविरोधात दुसरी तक्रार 'महारेरा'कडे दाखल झाली आहे. 'महाराष्ट्र चेंबर आॅफ हाऊसिंग इंडस्ट्रीज' (एमसीएचआय)च्या रायगड शाखेनं ही तक्रार दाखल केली आहे. खासगी बिल्डरांप्रमाणेच कायद्यानुसार सिडकोविरोधातही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केल्याची माहिती 'एमसीएचआय' रायगडचे अध्यक्ष अतिक खातू यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


कायद्याचं उल्लंघन कसं?

खासगी बिल्डरांप्रमाणेच म्हाडा आणि सिडकोसारख्या सरकारी यंत्रणांनाही 'महारेरा' कायद्याच्या कक्षात येतात. त्यामुळे घराची लाॅटरी काढताना वा भूखंडाची विक्री करताना या यंत्रणांनाही 'महारेरा'त नोंदणी करणं बंधनकारक आहे. असं असताना सिडकोनं 'महारेरा'ची नोंदणी नसताना आॅगस्टमध्ये १४ हजार ८३८ घरांच्या लाॅटरीसाठी जाहिरात काढली.


धावपळ करत नोंदणी

अशी जाहिरात काढणं 'महारेरा' कायद्याचं उल्लंघन असल्याचं म्हणत मुंबई ग्राहक पंचायतीनं सिडकोविरोधात 'महारेरा'कडे रितसर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. कारण सिडकोनं कायद्याचं उल्लंघन केल्याचं वृत्त प्रसिद्ध होताच धावपळ करत काही तासांतच नोंदणी करून घेतली होती.


भूखंडाच्या विक्रीसाठी जाहिरात

त्यानंतर आता सिडकोनं घरांबरोबरच भूखंडाची विक्री करतानाही 'महारेरा' कायद्याचं उल्लंघन केल्याची आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. सिडकोनं कळंबोली आणि खारघरमधील ९ भूखंडाच्या विक्रीसाठी अर्थात लिलावासाठी आॅगस्टमध्ये जाहिरात काढली. या भूखंडाच्या लिलावासाठीही 'महारेरा'त नोंदणी बंधनकारक असताना सिडकोनं अशी नोंदणी न करता जाहिरात काढल्याचा आरोप खातू यांनी केला आहे.


'महारेरा'चा दुजाभाव

हे 'महारेरा' कायद्याचं उल्लंघन असून असं उल्लंघन करणाऱ्या बिल्डरांविरोधात गेल्या सव्वा वर्षांपासून कडक कारवाई करण्यात येत आहे. मात्र त्याचवेळी या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या सरकारी यंत्रणांविरोधात मात्र कारवाई होत नसून 'महारेरा'च्या दुजाभावाबद्दल खोत यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.


कारवाईकडे लक्ष

'महारेरा'संदर्भात पुण्यात नुकतचं एक चर्चासत्र झालं, त्यावेळी बिल्डरांनी, एमसीएचआय-रायगड शाखेनं हा प्रश्न उचलून धरला. त्यानुसार महारेराकडून यासंदर्भात रितसर तक्रार दाखल करण्यास सांगितलं. त्याप्रमाणे बुधवारी 'महारेरा'त तक्रार दाखल करत सिडकोविरोधात कारवाई करण्याची मागणी केल्याचं खातू यांनी सांगितलं. आता दोन तक्रारीनंतर तरी 'महारेरा' सिडकोविरोधात कारवाई करत का? याकडेच आमचं लक्ष लागल्याचंही खातू यांनी स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा-

'पीएमएवाय'मध्ये नोंदणी करायचीय? मग सकाळी ९ ते १ अशी वेळ काढा

खूशखबर! नोव्हेंबरमध्ये १००० घरांची लॉटरी!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा