Advertisement

म्हाडावर नामुष्की! १९ आॅगस्टची लाॅटरी २५ आॅगस्टवर

लाॅटरीची संपूर्ण तयारी झालेली असताना, नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना केवळ प्रतिसाद नसल्यानं लाॅटरी पुढं ढकलण्याची वेळ कोकण मंडळात पहिल्यांदाच घडली असावी. त्यामुळं आता अर्जांचा आकडा फुगवण्याचा कोकण मंडळाचा हा केविलवाणा प्रयत्न कितपत यशस्वी होतो हेच पाहवं लागेल.

म्हाडावर नामुष्की! १९ आॅगस्टची लाॅटरी २५ आॅगस्टवर
SHARES

इच्छुकांच्या थंड प्रतिसादामुळे कोकण मंडळावर थेट लाॅटरीची तारीख बदलण्याची नामुष्की ओढावली आहे. अर्जांचा आकडा फुगवत आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न म्हणून लाॅटरीच्या तारखेसह नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीच्या तारखा बदलत मुदतवाढ देण्यात आल्याचं कोकण मंडळाकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार ही लाॅटरी १९ आॅगस्टएेवजी २५ आॅगस्टला फुटणार आहे. तर १६ आॅगस्टपर्यंत नोंदणी आणि १८ आॅगस्टपर्यंत अनामत रकमेसह अर्ज सादर करता येणार आहे.


म्हाडाचा केविलवाणा प्रयत्न

लाॅटरीची संपूर्ण तयारी झालेली असताना, नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना केवळ प्रतिसाद नसल्यानं लाॅटरी पुढं ढकलण्याची वेळ कोकण मंडळात पहिल्यांदाच घडली असावी. त्यामुळं आता अर्जांचा आकडा फुगवण्याचा कोकण मंडळाचा हा केविलवाणा प्रयत्न कितपत यशस्वी होतो हेच पाहवं लागेल.


'असा' केला पदार्फाश

कोकण मंडळाच्या लाॅटरीतील घरं कशी महाग आहेत, लाॅटरीत किंमतीचा, क्षेत्रफळाचा कसा झोल आहे आणि ही लाॅटरी अत्यल्प-अल्प गटासाठी नव्हे, तर केवळ श्रीमंतांसाठी कशी आहे, याचा पर्दाफाश जाहिरातीनंतर २ दिवसांतच मुंबई लाइव्हनं केला होता. २५ हजारांपर्यंत महिना कमावणाऱ्याला साडे अठरा लाखांत घर तर ७५ हजार महिना कमावणाऱ्या ७ ते ८ लाखांत आणि महिना लाखभर वा त्यापेक्षा अधिक कमावणाऱ्याला केवळ १९ लाखांत एका प्रकल्पातील घरं विकली जात असल्याचं वृत्त 'मुंबई लाइव्ह'नं प्रसिद्ध केलं होतं.


'मुंबई लाइव्ह'चं भाकीत

ज्या गरीबांसाठी म्हाडाची लाॅटरी असते त्याच गरीबांना महाग घर तर श्रीमंतांना स्वस्त घर विकली जात असल्याचा विरोधाभास लक्षात घेता या लाॅटरीला प्रतिसाद मिळणार नाही असं भाकीतही 'मुंबई लाइव्ह'कडून वर्तवण्यात आलं होतं.


नोंदणी अडकली

अखेर हे भाकीत खरं ठरलं आहे. ९०१८ इतका घरांचा मोठा आकडा असताना अर्ज सादर करण्याची मुदत संपण्यासाठी केवळ ३ दिवस उरले असताना फक्त २६ हजार अर्ज सादर झाले आहेत. हा आकडा जेमतेम ३५ हजारांच्या घरात जाण्याची शक्यता होती. तर नोंदणीला केवळ १ दिवस उरलेला असताना नोंदणी ४५ हजारांच्या घरात अडकली असून हा आकडा एका दिवसांत जेमतेम ५० हजारांपर्यंत पोहोचू शकला असता.


'अशी' आहे मुदतवाढ

एकूणच लाॅटरी फ्लाॅप ठरल्याचं आता स्पष्ट झालं असतानाच कोकण मंडळानं लाॅटरीच पुढं ढकलतं स्वत:ही हे सिद्ध केलं आहे. त्यामुळं आता २५ आॅगस्टला लाॅटरी फुटणार आहे. तर या मुदतवाढीनुसार आता १६ आॅगस्टला रात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. तर एनईएफटी आणि आरटीजीएसद्वारे १६ आॅगस्टला रात्री १२ वाजेपर्यंत अनामत रकमेसह अर्ज भरता येणार आहे.

१८ आॅगस्टपर्यंत चलन बँकेत सादर करता येणार आहे. सादर झालेल्या अर्जांची अंतिम छाननी करत २२ आॅगस्टला म्हाडाच्या संकेतस्थळावर सायंकाळी ६ वाजता अर्जदारांची, लाॅटरीत प्रत्यक्ष सहभागी झालेल्यांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.हेही वाचा-

म्हाडाच्या मुंबई मंडळाचा गृहधमाका दिवाळीत!

म्हाडाची लाॅटरी लटकणार? न्यायालयात याचिका दाखलRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement