Advertisement

'एमएमआर'मध्ये आणखी ३ मेट्रो मार्ग, मेट्रोची धाव सीएसएमटीपर्यंत

गायमुख ते शिवाजी चौक (मीरारोड) मेट्रो-१०, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मेट्रो-११ आणि कल्याण ते तळोजी मेट्रो-१२ या ३ मेट्रो मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

'एमएमआर'मध्ये आणखी ३ मेट्रो मार्ग, मेट्रोची धाव सीएसएमटीपर्यंत
SHARES

मेट्रो प्रकल्पाचं जाळं मुंबई महानगर प्रदेशात चांगलंच विस्तारत चाललं आहे. मेट्रो-१ सेवेत दाखल झाल्यानंतर मेट्रो-२, मेट्रो-३, मेट्रो-४, मेट्रो-७ चं काम सुरू असतानाच आणखी ३ मेट्रो मार्गांचा मार्गही मोकळा झाला आहे. मेट्रो-१०, मेट्रो-११ आणि मेट्रो-१२ असे आणखी ३ मेट्रो प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ने हाती घेत आहेत. या तिन्ही मेट्रो मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवाला (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट)ला बुधवारी 'एमएमआरडीए' प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे हे ३ नवे मार्गही लवकरच हाती घेण्यात येणार आहेत. मेट्रो-११ च्या माध्यमातून मेट्रो वडाळ्यावरून थेट सीएसएमटीपर्यंत धाव घेणार आहे.


किती खर्च अपेक्षित?

गायमुख ते शिवाजी चौक (मीरारोड) मेट्रो-१०, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मेट्रो-११ आणि कल्याण ते तळोजी मेट्रो-१२ या ३ मेट्रो मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानुसार या प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीस सुरूवात होणार आहे. मेट्रो-१० साठी ४४७६ कोटी रुपये, मेट्रो-११ साठी ८,७३९ कोटी रूपये तर मेट्रो-१२ साठी ४१३२ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.


महामंडळाची स्थापना

अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) मेट्रो-७ आणि दहिसर ते डीएननगर मेट्रो-२ अच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. तेव्हा हे दोन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी 'एमएमआरडीए'ने मुंबई मेट्रो संचालन महामंडळाची स्थापना केली आहे. स्वायत्त अशा या महामंडळावर मेट्रो आणि मोनोची संपूर्ण जबाबदारी असणार आहे. या महामंडळात सुमारे १००० पद भरण्यात येणार असून ही पदं भरण्यासाठीच्या प्रस्तावालाही बुधवारच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली.


बोधचिन्हाचं उद्घाटन

'एमएमआरडीए'कडून मेट्रो, मोनो, एमटीएचएल, रस्ते, उड्डाणपूल असे अनेक प्रकल्प राबवले जात आहेत. हे प्रकल्प मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विकासाच्यादृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे प्रकल्प योग्यरित्या आणि जलदगतीनं मार्गी लागावेत यासाठी 'एमएमआरडीए'कडून मंत्रालयाच्या धर्तीवर 'वाॅर रूम अॅण्ड इनोव्हेशन सेंटर' स्थापण्यात आलं आहे. या 'वाॅर रूम अॅण्ड इनोव्हेशन सेंटर'चं उद्घाटनही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. दरम्यान 'एमएमआरडीए'चा लोगो बदलण्यात आला असून नव्या बोधचिन्हाचं अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.



हेही वाचा-

परवानगीशिवाय एकही झाड कापणार नाही, 'एमएमआरसी'ची न्यायालयात ग्वाही

मेट्रो-२ ब च्या कामावरील स्थगिती कायम



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा