Advertisement

गिरणी कामगारांनो त्वरा करा, अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक


गिरणी कामगारांनो त्वरा करा, अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक
SHARES

गिरण्यांच्या जमिनीवरील हक्काच्या घराच्या योजनेच्या लाभापासून केवळ अर्ज न भरल्यामुळे वंचित राहिलेल्या गिरणी कामगारांना एक संधी म्हाडाकडून देण्यात आली आहे. त्यानुसार अर्ज भरण्यासाठीची मुदत दोन दिवसांत, 31 जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे कामगारांनो, अद्यापही अर्ज भरला नसेल तर त्वरा करा, अर्ज भरा आणि आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करा असे आवाहन गिरणी कामगार संघटनांसह म्हाडाकडून करण्यात आले आहे.

याआधी 1 लाख 48 हजार गिरणी कामगारांनी अर्ज भरले असून याच कामगारांना हक्काच्या घराच्या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. मात्र त्याचवेळी अनेक गिरणी कामगार अर्ज भरू न शकल्याने या योजनेपासून दूर होते. त्यामुळे गिरणी कामगार संघटनांसह गिरणी कामगारांकडून एक संधी देत अर्ज भरून घेण्याची मागणी होत होती. पण सरकार आणि म्हाडाकडून मात्र याबाबत काहीही निर्णय होत नव्हता. त्यामुळे गिरणी कामगार एकजुटीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने अर्ज भरून देण्याचे आदेश देत सरकारला दणका दिला.

या आदेशानुसार, 26 मे पासून म्हाडाने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केली. ही प्रक्रिया 27 जून रोजी संपणार होती. मात्र गिरणी कामगारांनी मुदतवाढ मागितल्याने म्हाडाने 31 जुलैपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली. त्याप्रमाणे सोमवारी 31 जुलैला ही मुदतवाढ संपत असून आता अर्ज भरण्याच्या प्रक्रियेने चांगलाच वेग घेतला आहे. पण ही गिरणी कामगारांनासाठी शेवटची संधी असल्याने अर्ज न भरलेल्या कामगारांनी दोन दिवसांत अर्ज भरणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरावेत, असे आवाहन गिरणी कामगार एकजुटीचे हेमंत राऊळ यांनी केले आहे.


आतापर्यंत 25 हजार अर्ज दाखल

जवळपासून एक लाख गिरणी कामगार अर्ज  भरण्यापासून वंचित असल्याचा दावा संघटनांकडून केला जात होता. त्यानुसार हजारोंच्या संख्येने अर्ज दाखल होती अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात कामगारांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळेच 26 मे ते 29 जुलैदरम्यान केवळ 25 हजार गिरणी कामगारांनी अर्ज भरले असून हा आकडा आता दोन दिवसांत किती फुगतो, हेच पाहणे महत्त्वाचे ठरेल.


गिरणी कामगारांपैकी अनेक कामगार बिहार-उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशसारख्या राज्यात वास्तव्यास आहेत. तर राज्यातील जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात कामगार विखुरलेल्या आहे. त्यांच्यापर्यंत तांत्रिक कारणांमुळे पोहोचणे शक्य न झाल्याचेच या अर्जाच्या आकड्यावरून स्पष्ट होत आहे. पण 25 हजारांहून अधिक अर्जदार योजनेत समाविष्ट होणार हेही कमी नाही.

दत्ता इस्वलकर, गिरणी कामगार नेते

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा