SHARE

खोतवाडी-भीमवाडा झोपडपट्टीचा पुनर्विकास करताना चौहान बिल्डर्स इंडिया हाऊसिंग डेव्हलपमेंट प्रा. लिमिटेड यांनी जीवन विमा निगम लिमीटेड (एलआयसी) यांना संबंधित जमीन तारण देवून पैसे घेतल्याचं निदर्शनास आल्यास या प्रकरणी केंद्र सरकारच्‍या 'स्पेशल फ्रॉड इन्व्हेस्टीगेशन अधिकाऱ्या'मार्फत(एसएफआयओ) चौकशी करण्यात येईल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी विधानसभेत दिली.


प्रस्ताव दाखल

याप्रकरणी सदस्य ॲड. आशिष शेलार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. खोतवाडी-भीमवाडा झोपडपट्टी पुनर्विकास समिती, सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्याकडून सांताक्रूझ पश्चिम येथील व्हिलेज सांताक्रूझ येथे चौहान बिल्डर्स इंडिया हौसिंग डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांनी देवधर असोसिएट वास्तूविशारद यांच्या मार्फत विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत सादर केलेला प्रस्ताव झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने दाखल करून घेतल्याची माहिती मेहता यांनी दिली.


परस्पर हस्तांतरण

या जागेची मालकी बृहन्मुंबई महापालिकेची असून, विकासकाने संबंधित जमीन गहाण ठेवल्यावर तीच जमीन दुसऱ्या विकासकाला हस्तांतरीत करता येऊ शकत नाही, अशी तरतूद आहे. या प्रकरणातील चौहान या विकासकाने जीवन विमा निगमला जमीन तारण ठेवून त्याच्याकडून पैसे घेतले असतील आणि दुसऱ्या विकासकाला काम हस्तांतरित केलं असेल, तर त्यासंदर्भात विशेष अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

भविष्यात शासनाच्या जमिनीवर झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविताना विकासकांनी जमीन तारण ठेवताना राज्य शासनाची परवानगी घेणं आवश्यक राहील, अशी तरतूद करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं.हेही वाचा-

पुनर्विकासाची कासवगती! ८ वर्षानंतर म्हाडाच्या २ सोसायट्यांचा पुनर्विकास मार्गी

स्वयंपुनर्विकासाला चालना! बाेरीवलीतील सोसायटीला ११० कोटीचं कर्जसंबंधित विषय
ताज्या बातम्या