Advertisement

म्हाडा लाॅटरी: एका घरामागे फक्त ६ अर्ज

कोकण मंडळाच्या ९०१८ घरांसाठी २५ आॅगस्टला रंगशारदामध्ये लाॅटरी फुटणार आहे. या घरांसाठी एकूण ५४ हजार २७१ अर्ज म्हणजे एका घरामागे ६ अर्ज सादर झाले आहेत.

म्हाडा लाॅटरी: एका घरामागे फक्त ६ अर्ज
SHARES

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ९०१८ घरांच्या लाॅटरीसाठीच्या अर्जविक्री-स्वीकृतीची प्रक्रिया अखेर शनिवारी सायंकाळी ६ वाजता संपली. या घरांसाठी एकूण ५४ हजार २७१ अर्ज म्हणजे एका घरामागे फक्त ६ अर्ज सादर झाले आहेत.  त्यामुळे यंदा म्हाडाच्या घरांना प्रतिसाद थंड असल्याचं स्पष्ट झालं आहे.


महाग घरांमुळं कमी प्रतिसाद 

कोकण मंडळाच्या ९०१८ घरांसाठी २५ आॅगस्टला रंगशारदामध्ये लाॅटरी फुटणार आहे. महागड्या घरांमुळं या लाॅटरीला कमी प्रतिसाद मिळाल्यानं नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना कोकण मंडळानं नोंदणी-अर्जविक्री-स्वीकृतीला मुदतवाढ दिली. त्यानुसार नोंदणीची मुदत १६ आॅगस्ट, गुरूवारी रात्री १२ वाजता संपली आहे. शेवटपर्यंत ६३ हजार ९१३ इच्छुकांनी नोंदणी केली आहे. तर आता अर्जविक्री-स्वीकृतीची मुदतही शनिवारी संपली आहे.


पहिल्यांदाच मोठी लाॅटरी

शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुदत संपायच्या क्षणापर्यंत ५४ हजार २७१ अर्ज सादर झाले आहेत. कोकण मंडळाकडून मुंबई आणि आसपासच्या घरांसाठी इतक्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच लाॅटरी काढली जात असताना अर्जाचा आकडा पाऊण लाखापर्यंतही पोहचू शकलेला नाही. त्यामुळेच एका घरामागे केवळ सहा अर्ज सादर झाले आहेत. कोकणाच्या महागड्या घरांकडे अर्जदार पाठ फिरवतील ही शक्यता अखेर खरी ठरली आहे. दरम्यान, अर्जविक्री-स्वीकृतीची मुदत संपली असून  अंतिम आकडा रविवारपर्यंत येईल. हा आखडा २ ते ३ हजारांच्या घरात असण्याची शक्यता असल्यानं ५६ ते ५७ हजारापर्यंतच अर्जाचा आकडा पोहचण्याची शक्यता आहे.


२३ आॅगस्टला अंतीम यादी

अर्जविक्री-स्वीकृतीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता अर्जांची छाननी अंतिम करत २२ आॅगस्टला सायंकाळी ६ वाजता अर्जदारांच्या नावाची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. या यादीनुसार आवश्यक ते बदल करून घेत २३ आॅगस्टला सायंकाळी ६ वाजता अंतीम यादी जाहीर करण्यात येईल. या यादीतील अर्जदार लाॅटरीत सहभागी होतील. त्यामुळे ही अंतिम यादी अर्जदारांसाठी महत्त्वाची आहे. २५ आॅगस्टला सकाळी १० वाजता वांद्रयाच्या रंगशारदा सभागृहात लाॅटरी फुटेल.हेही वाचा -

मुदतवाढीनंतरही लाॅटरीकडे पाठ! ९०१८ घरांसाठी ६३९१३ इच्छुकांची नोंदणी

गुडन्यूज! ठाण्यात दिव्यांगांसाठी १९० घरंRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement