Advertisement

मुदतवाढीनंतरही लाॅटरीकडे पाठ! ९०१८ घरांसाठी ६३९१३ इच्छुकांची नोंदणी

मुदतवाढीनंतरही नोंदणीचा आकडा म्हणावा तसा वाढलेला नाही. लाॅटरीसाठी शेवटच्या दिवसांपर्यंत ६३ हजार ९१३ इच्छुकांनी नोंदणी केली आहे. ९०१८ हा घरांचा आकडा लक्षात घेता हा प्रतिसाद अत्यंत कमी आहे. कारण मुंबई मंडळाच्या १००० घरांच्या लाॅटरीसाठी यापेक्षा अधिक संख्येनं नोंदणी होते.

मुदतवाढीनंतरही लाॅटरीकडे पाठ! ९०१८ घरांसाठी ६३९१३ इच्छुकांची नोंदणी
SHARES

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ९०१८ घरांसाठी २५ आॅगस्टला फुटणाऱ्या लाॅटरीसाठी कोकण मंडळाला थंडच प्रतिसाद मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. गुरूवारी रात्री १२ वाजता लाॅटरीसाठीची नोंदणी प्रक्रिया बंद झाली असून शेवटच्या क्षणापर्यंत ९०१८ घरांसाठी केवळ ६३ हजार ९१३ इच्छुकांनीच नोंदणी केली आहे. घरांच्या आकड्याच्या तुलनेत नोंदणीचा आकडा खूपच कमी असल्यानं हा प्रतिसाद थंडच मानला जात आहे. त्यामुळे नोंदणी आणि अर्जांचा आकडा फुगवण्यासाठी मुदतवाढ देण्याचा म्हाडाने केलेला प्रयत्न फोल ठरल्याची चर्चा आहे.


आधीची मुदत 'अशी'

विरार, रत्नागिरी, ठाणे आणि सिंधुदुर्गमधील ९०१८ घरांसाठी लाॅटरीसाठी १८ जुलैपासून नोंदणी तर १९ जुलैपासून अर्जविक्री-स्वीकृती सुरू झाली आहे. कोकण मंडळाच्या लाॅटरी प्रक्रियेचा कार्यक्रमानुसार नोंदणी ८ आॅगस्टला रात्री १२ वाजता नोंदणीची मुदत संपणार होती. तर अर्जविक्री-स्वीकृतीची मुदत ९ आॅगस्टला संपत १९ आॅगस्टला वांद्रयाच्या रंगशारदा सभागृहात लाॅटरी फुटणार होती. पण लाॅटरीतली घरं खूपच महाग असल्यानं, त्यातही गरीबांसाठीची, अत्यल्प आणि अल्प गटाची घर महाग तर मध्यम-उच्च गटातील अर्थात श्रीमंतांसाठीची घर स्वस्त असल्यानं या लाॅटरीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.


लाॅटरी पुढं ढकलली

नोंदणीची मुदत संपण्यासाठी काही तास शिल्लक असतानाही नोंदणी आणि अर्जविक्री-स्वीकृती वाढत नसल्यानं कोकण मंडळानं चक्क लाॅटरीचं पुढं ढकलली. लाॅटरीसह लाॅटरीच्या प्रक्रियेला मुदतवाढ दिली. नोंदणी आणि अर्जांचा आकडा फुगवणं हेच मुख्य उद्दीष्ट ठेवत कोकण मंडळानं मुदतवाढ दिली. त्यानुसार ८ आॅगस्टवरून १६ आॅगस्ट अशी नोंदणीला तर ९ आॅगस्टवरून १८ आॅगस्ट अशी अर्जविक्री-स्वीकृतीला मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार गुरूवारी, १६ आॅगस्टला नोंदणीची मुदत संपली.


आकडा मर्यादीतच

मुदतवाढीनंतरही नोंदणीचा आकडा म्हणावा तसा वाढलेला नाही. लाॅटरीसाठी शेवटच्या दिवसांपर्यंत ६३ हजार ९१३ इच्छुकांनी नोंदणी केली आहे. ९०१८ हा घरांचा आकडा लक्षात घेता हा प्रतिसाद अत्यंत कमी आहे. कारण मुंबई मंडळाच्या १००० घरांच्या लाॅटरीसाठी यापेक्षा अधिक संख्येनं नोंदणी होते.


अर्जांची संख्याही कमी

अर्जांची संख्याही कमी असून शनिवारी अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे. शुक्रवारी, १७ आॅगस्ट, सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५० हजार २०५ अर्ज सादर झाले आहेत. हा आकडा मुदत संपेपर्यंत ५५ ते ५६ हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. कोकण मंडळानं इतक्या मोठ्या संख्येने घरांची लाॅटरी जाहीर केली असताना अर्जांचा आकडा पाऊण लाखांपर्यंतही जाऊ शकलेला नाही. यावरून इच्छुकांनी कोकण मंडळाच्या घरांकडे पाठ फिरवल्याचच चित्र आहे.हेही वाचा-

Exclusive: सिडकोचं घर अडीच लाखांनी स्वस्त मिळणार!

वांंद्रयातील म्हाडा भवन कात टाकणार; १६ मजली टाॅवर होणारRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement