Advertisement

अशी असावी, मैत्रीची भन्नाट केमिस्ट्री !


अशी असावी, मैत्रीची भन्नाट केमिस्ट्री !
SHARES

शरदाचे चांदणे, वसंताचा बहर, श्रावणाची पालवी  या सर्वांहून मनमोहक आणि आकर्षक काही असेल तर ती आहे मैत्री... मैत्री! भावभावनांचा सुरेख संगम असलेल्या मैत्रीच्या भन्नाट केमिस्ट्रीचं शब्दांत वर्णन करायचं तरी कसं? कारण या दोन शब्दांमध्ये इतकं सामर्थ्य दडलंय की त्याला कुठल्याही बंधनात बांधून ठेवणं निव्वळ अशक्यच. मग अशा मैत्रीला एका धाग्यात बांधण्याचा अट्टाहास का? अजून तरी मैत्रीला बंधनात बांधून ठेवण्याइतका मजबूत धागाच बनलेला नाही. 

 


मैत्रीत कुठलीच बंधनं नसतात. मैत्रीच्या नात्यात जे स्वातंत्र्य असतं ते इतर कुठल्याही नात्यात नसतं. एकमेकांवर असलेला विश्वास, आपलेपणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संकटकाळी नेहमीच साथसोबत करण्याच्या जिद्दीतून हे नातं अधिक गहिरं होत जातं.



आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर, कुणाच्याही रुपात आपल्याला जीवाभावाचा मित्र/मैत्रिण गवसू शकते. मैत्रीला वय, वेळ, समाज कशाचंही बंधन नसल्यानं लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत कुणासोबतही मैत्रीची नाळ जोडली जाऊ शकते. मग ते आई-वडील असाेत, स्वत:ची मुलं असोत, बायको, बहीण, नवरा असो की कुणी अनोळखी व्यक्ती. कुणासोबतही मैत्रीच्या भावविश्वात आपण रममाण होऊ शकतो. मैत्रीचे असेच काही किस्से आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. हे किस्से तुम्हाला सहज, सुंदर अन् अलगदरीत्या मैत्रीचं नातं उलगडून दाखवतील.


माझ्या आयुष्यात खूप मित्र-मैत्रिणी आहेत. पण माझी जीवाभावाची मैत्रिण लहानपणापासून माझ्यासोबत आहे. लहानपणापासून म्हणजे अगदी मी तिच्या गर्भात असल्यापासूनच आमची चांगली गट्टी आहे. तुम्हाला कळालंच असेल मी कोणाबद्दल बोलतोय ते. तिनंच मला चालायला, बोलायला शिकवलं. समाजात माझं जे काही नाव, अस्तित्व आहे, ते सारं तिच्यामुळंच आहे. 



खऱ्या अर्थानं ती माझ्या सुख-दु:खात सहभागी असते. कधी चुकलो तर समजावते. कुठे अडलो तर प्रोत्साहन देते. तिच्याबद्दल लिहिण्यासारखं खूप आहे. पण लिहावं तेवढं कमीच.

- कल्पेश जाधव


मैत्री ही पाण्यासारखी असते. पूर्ण‌त: पारदर्शक. तिला कुठलाही रंग नसतो. अशीच माझी एक मैत्रिण आहे, भाग्यश्री भुवड. पाण्यासारखी नितळ वाहणारी आणि तेवढीच पारदर्शक. तिच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असते. आयुष्याकडे बघण्याचा तिचा दृष्टीकोन खूप सकारात्मक आहे. तिच्यामुळे माझा दृष्टीकोनही सकारात्मक झाला आहे. मला जेव्हा मदतीची गरज असते, तेव्हा ती सर्वात आधी धावून येते. मी कुठे चुकत असेल, तर खूप रागावते. पण नंतर स्वत:च समजावून सांगते. जीवाला जीव लावणारे मित्र आणि मैत्रीणी प्रत्येकाच्या आयुष्यात असाव्यात. त्यांच्यामुळेच जीवनाला खरा अर्थ लाभतो. 

- सचिन हसम


प्रिय बेस्ट फ्रेंड उर्फ ताईस (कविता धलपे)

जेव्हापासून कळायला लागले तेव्हापासून शेजारच्या घरात राहत असल्याची आठवतेस. हे मध्येच आठवायचं प्रयोजन म्हणजे सामानाची आवराआवर करताना जुन्या फोटोंचा अल्बम अचानक हाती लागला. माझ्या वाढदिवसाला कायम शेजारी उभी दिसणारी तू नंतरच्या फोटोत आभावानेच दिसू लागलीस. माझ्या आयुष्यात तुझं अस्तित्त्व आबाधित असलं तरी त्यात या फोटोसारखंच अंतर पडल्याचं जाणवतं. आपण आपल्या शिक्षण, नोकरीच्या शर्यतीत इतके वाहावत जातो की या प्रवाहात मैत्रीही पुसट होऊन जाते.



आपण मुद्दाम बोललो-भेटलो नाही असं नाही. पण आहेसच की समोर भेटूच की, बोलूच की निवांत, असं मनात नेहमीच वाटायचं. अचानक एके दिवशी तुझं लग्न ठरल्याचं कळलं आणि आठवलं की बरंच काही बोलायचं राहून गेलंय. सुट्टीत कॅरम आणि पत्त्यांचे डाव जरा कमीच खेळलो. तुझ्या लग्नाच्या दिवशीसुद्धा मी उशीराच पोहोचलो. नातेवाईकांच्या रांगेतूनच फोटो काढायला आलो. लग्नातली मजा आणि आपले स्पेशल फोटो राहूनच गेले. त्यानंतरसुद्धा येशीलच की माहेरी म्हणून गृहीत धरले. आपण कधी कधी एकमेकांना जरा जास्तच गृहीत धरतो. आता मी हे घर सोडून दुसरीकडे जातोय. पण म्हणून काय झालं, आहोतच की आपण एका शहरात. भेटूच की निवांत कधीतरी, बोलूच की निवांत कधीतरी.

तुझा बेस्ट फ्रेंड उर्फ भाऊ

- क्षितिज सरोदे


आज गोष्ट सांगतेय तुम्हाला, माझ्या जीवलग सखीची

नात्याने जरी बहीण ती, तरी आमच्यात निखळ मैत्री...


ताईला दिली बाप्पाने भेट

इवलिशी परी आली स्वर्गातून थेट

लोभस वाणी, गोंडस रूप

साऱ्यांना आवडते ती अगदी खूप खूप



अंगी हिच्या कलागुण भारी, साऱ्यांना जपायची हिची रितच न्यारी

                                              नाही कुणास दुजाभाव, हिला सगळेच सेम टू सेम


आपली मस्ती आपल्या गप्पा

मी सतत आठवत राहते

दूरदेशी घरातल्या तुळशीत

तुलाच पाहत राहते



आज होणार तुझ्या कष्टाचे चिज, लवकरच मिळेल तुझ्या मेहनतीचे फळ

जे नक्कीच असेल एवढे मधूर, की देईल तुझ्या पंखांना आणखीन बळ


‘घे भरारी’ या आकाशात

कसलीच तमा न बाळगता

पडशील अडखळशील कुठे

तरीही चालक राहा न थांबता


- अश्विनी माहिमकर


2010ला मी गरवारेमध्ये पत्रकारितेला अॅडमीशन घेतले. त्यावेळी बाळकृष्ण (बाळा) मला भेटला. आम्ही दोघेही कोकणातले असल्यामुळे आणि त्यातच दोघांनाही मालवणी भाषा येत असल्यामुळे आमचे खूप जमू लागले. पण बाळा हा खऱ्या अर्थाने कळला तो माझ्या कठीण काळात. माझ्या वडिलांचे निधन झाले होते. महिना जानेवारीचा होता आणि महत्वाची शिकवणी सुरू होती. मात्र घरात असे झाल्यामुळे मी कॉलेजला जाऊ शकत नव्हतो. त्यातच नोकरी करून कॉलेज करत असल्यामुळेही माझ्या आधीच खूप सुट्ट्या झाल्या होत्या. मात्र त्यावेळी बाळकृष्ण मला कायम मदत करत असे. मला परीक्षेदरम्यान तोच नोट्स द्यायचा. मला पत्रकारितेमध्ये पहिली नोकरी मिळवून देण्याचेही काम बाळकृष्णने केले. कुठेही नोकरीची संधी असो किंवा कसलीही मदत असो बाळा नेहमी मोठ्या भावासारखा माझ्या मदतीला धावून आलाय. त्यामुळे बाळा माझा मित्रच नाही तर भाऊ आहे, असे मी अनेकांना कायम सांगत आलो. जाता जाता आपल्या मालवणी भाषेत एकच देवाक गाऱ्हाना आसा की आमची दोस्ती अशीच रवाने रे महाराजा.

- सुशांत सावंत

   

मित्र-मैत्रिणी तर खूप आहेत आयुष्यात. पण मला माझ्या जोडीदारातच माझा मित्र सापडला. माझ्या सुखात, दु:खात असणारा माझा सोबती. माझ्या डोळ्यातून बघ म्हणजे लक्षात येईल की तू माझा केवढा चांगला मित्र आहेस.



 नवरासुद्धा चांगला मित्र होऊ शकतो, हे तूच सिद्ध केले आहेस. कठीण काळात कोणत्याही स्वार्थाविना, अपेक्षेविना जे पाठिशी उभे असतात ते कुटुंबं असते आणि मित्र देखील कुटुंबासारखे असतात.

- प्रणिता  कवठणकर


आई आणि माझ्यात खूप चांगली मैत्री आहे. आईशी मी कोणतीच गोष्ट लपवत नाही. 

जेव्हा गोंधळलेला किंवा उदास असतो तेव्हा मी सर्व गोष्टी तिच्याशी शेअर करतो. काही समस्या असेल तर तीच मला योग्य मार्ग दाखवते.  

- अविनाश शेलार



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा