• आपली घरं बनतायत का सायलेंट झोन?
  • आपली घरं बनतायत का सायलेंट झोन?
  • आपली घरं बनतायत का सायलेंट झोन?
  • आपली घरं बनतायत का सायलेंट झोन?
  • आपली घरं बनतायत का सायलेंट झोन?
  • आपली घरं बनतायत का सायलेंट झोन?
SHARE

घरात इन-मिन पाच-सहा जण. पण घरात ही स्मशान शांतता. ती जेवण करण्यात व्यस्त. जेवण करता करता एक डोळा टीव्हीवर. तो आहे कम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये बिझी. घरात बच्चे कंपनी असेल, तर अभ्यासात मग्न. एकूणच सर्व आपापल्या विश्वात गुंतलेले. आई-बाबा, नवरा-बायको, भाऊ-बहीण, मुलं ही नाती घराला घरपण देतात. बहुतांश घरांमध्ये ही सर्व नाती असतात. पण तरीही घरात सुख आणि शांती नाही. घरात प्रत्येकाला एकटेपणा जाणवत असतो. काही तरी मिसिंग आहे, असं जाणवत असतं. पण नक्की काय? हेच कुणाला ठाऊक नसतं.घर म्हणजे नुसत्या चार भिंती असतात का? एक उंबरठा, दोन खिडक्या आणि डोक्यावर सावली देणारं छत हीच का घराची व्याख्या? जर ही व्याख्या बरोबर असेल, तर अभिनंदन. अभिनंदन यासाठी की तुमच्याकडे चार भिंतींनी बांधलेलं घर, उंबरठा, दोन खिडक्या आणि सावली देण्यासाठी छत आहे. पण आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, माया नाही. सर्व नाती आहेत, पण त्यांना गंज लागला आहे. हा गंज साफ करायचा असेल तर एकच रामबाण उपाय आहे आणि तो म्हणजे घरा-घरातील संपलेला संवाद पुन्हा सुरू करणे. 

संवाद म्हणजे कम्युनिकेशन. कम्युनिकेशन शिकवणारे अनेक कोर्स आहेत. कित्येक जण नोकरीसाठी आवश्यक म्हणून कम्युनिकेशन शिकलेही असतील. पण कमाल बघा! एवढं शिकूनही आपल्या घरातच आपलं कम्युनिकेशन नाही. कित्येक घरांमध्ये संवादच नसतो. टीव्ही, कपाट, खुर्ची या निर्जीव वस्तूंमध्ये आणि आपल्यात मग फरक काय? असा साधा प्रश्न देखील आपल्याला पडत नाही.नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, शेजारी-पाजारी हे नेहमीच आपल्या सुख-दु:खात साथ देतात. ही नाती आपण जपलीच पाहिजेत. यात काहीच शंका नाही. पण घरातल्या नात्यांकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? शेवटी घरात ज्यांच्यासोबत एकत्र राहायचं, त्यांच्याशी संवाद कसा तोडता येईल? कित्येक घरांमध्ये मोजून मापून शब्द वापरले जातात. जेवायला बसूया, अंथरूण टाकलंय, आज जेवण काय बनवायचं? बास! शब्दांचा कोटा संपला. काही घरांमध्ये तर भांडणापूर्तीच संवाद साधला जातो. पण याचा तुमच्या स्वत:वर आणि कुटुंबीयांवर किती परिणाम होतो याचा विचार कधी केला आहे का?

अशा अबोल्यामुळे घरातले मतभेद तर वाढतातच. शिवाय मनातल्या गोष्टी तुम्ही मनात किती दिवस कुजवत ठेवता. मनात राहून राहून त्या गोष्टी सडतात आणि द्वेषाची भावना निर्माण होते. याचाच परिणाम आपण अबोला घेतो किंवा भांडतो. पण या सर्वात घरातील शांती मात्र भंग होते. त्यामुळे सततची चीडचीड होते. खास करून लहान मुलांमध्ये. घरातला अबोला पाहून ती सुद्धा अबोल होत जातात. घरामध्ये नेहमीच दु:खी आणि उदास चेहेरे देखील लहान मुलांना निरुत्साही करतात. मग अशा वातावरणात मुलं जास्त वेळ थांबणं पसंत करत नाहीत. मग सोशल मीडिया किंवा मित्रांमध्येच जास्त वेळ घालवायला लागतात. एकूणच, घरापासून मुलं दुरावली जातात. साहाजिकच मोठी झाल्यावर त्यांच्या परिवारात देखील हेच चक्र चालतं.

एकत्र कुटुंब पद्धती आजही अनेक घरांमध्ये आहे. मोठी कुटुंब आजही एकत्र राहतात हे खरं आहे. पण ती मनाने किती एकत्र आहेत हे सांगता येणं कठीणच आहे. यासंदर्भातलाच एक किस्सा. तीन भावंड, तीन सुना, त्यांची मुलं आणि आई-बाबा असं एकत्र कुटुंब..दोन मजली बंगलोमध्ये हे कुटुंब राहायचं. प्रत्येकाची स्वतंत्र रूम. तिघं मुलं सरकारी नोकरी करायचे. त्यामुळे संध्याकाळी ७ ला घरात हजर. घरात नऊ-दहा जण असायचे. पण प्रत्येकाचं वेगळं विश्व. जेवणाच्या टेबलावर देखील ते एकत्र यायचे नाहीत. तिघं भाऊ आपापल्या बायको आणि मुलांसोबत स्वत:च्या रूममध्ये जाऊन जेवायचे. बिचारे आई-बाबा दोघेच डायनिंग टेबलवर बसून जेवायचे. ना त्यांच्यात संवाद, ना भांडणं. एकदा तिघा भावंडांपैकी एक बाहेरगावी गेला हे त्यांच्या बाबांना चक्क एका आठवड्यानंतर लक्षात येतं. ते घर कमी आणि हॉस्टेलच जास्त होतं म्हणा ना!
आजचं युग हे तंत्रज्ञानाचं आहे. पण तंत्रज्ञानाच्या किती आहारी जायचं हे आपल्याच हातात आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप यामुळे आपण जगाशी नक्कीच जोडले गेलो आहोत. पण घरच्यांचं काय? कित्येक जण फेसबुकवर कुटुंबीयांसोबतचे अनेक फोटो शेअर करतात. त्याला छानसं कॅप्शनही देतात. पण प्रत्यक्षात परिस्थिती फार उलट असते. फेसबुकवर टाकण्यात आलेल्या एकाच फोटोत स्माईल देणारी मंडळी घरात चुप्पी साधून असतात. सोशल मीडियावर फोटो टाकण्यात काहीच वावगं नाही. पण फोटोत जगाला दिसणारी आपुलकी, प्रेम हे प्रत्यक्षात तुमच्या नात्यांमध्ये असणं देखील आवश्यक आहे.तंत्रज्ञानानं जग जोडता येतं. पण कुटुंबीयांसोबत जोडण्यासाठी प्रत्यक्ष संवाद साधणं हेच एक तंत्रज्ञान आहे. कितीही काम असेल किंवा तुम्ही कितीही थकला असाल पण कुटुंबीयांशी संवाद साधलाच पाहिजे. संवाद करताना अचानक झालेला विनोद, मोकळेपणानं मारलेल्या गप्पा यामुळे एखाद्याच्या मनावरचा ताण नक्कीच हलका होत असेल. कामावरून येऊन मोबाईल, टीव्ही किंवा फेसबुक आणि व्हॉट्सअपसारख्या गोष्टींना आपण वेळ देऊ शकतो. तर मग घरच्यांना का नाही? एक दिवस टीव्हीवरील एक-दोन मालिका कमी बघा. आई किंवा बायकोला जेवणात मदत करता-करता गप्पा मारा. जेवता-जेवतासुद्धा तुम्ही कुटुंबीयांसोबत बोलू शकता. पण तेव्हासुद्धा आपण त्या टीव्हीमध्ये घुसलेलो असतो. कधी तरी फक्त कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाणं. त्यांना चित्रपट पाहायला नेणं. छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी त्या आयुष्य आनंदी जगण्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. लहानपणीच्या आठवणी सर्वांच्याच लक्षात असतील. लहानपणी शाळेतून आलो की दिवसभरातला दिनक्रम आपण घरात येऊन आई किंवा बाबांसोबत शेअर करायचो. आई-बाबा कामावर असतील तर ते कामावरून आल्यावर त्यांना सागायचो. नाहीतर आजी-आजोबा आहेतच. पण मोठे होता होता या छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्याला विसर पडतो.माझ्या घरात इन-मीन दोन माणसं. मी आणि आई. ऑफिसमधून येऊन आम्ही दोघी एकमेकांना सर्व गोष्टी शेअर करतो. ऑफिसमध्ये हे घडलं. मग अमुक अमुक व्यक्ती असं बोलली. आमचा हा रोजचा उपक्रम ठरलेला असतो. आता किती तरी वेळा असं होतं की, तिच्या मोबाईलमधले आलेले मेसेज ती मला वाचून दाखवते. मला पण ते मेसेज आलेले असतात किंवा ते मेसेज जुनेच असतात. पण तरीही तिच्याकडून ते जोक ऐकण्याची मजा वेगळीच असते. कारण ते सांगताना तिच्या चेहऱ्यावर एक आनंद असतो. तिचा थोडा ताणतणाव देखील कमी होतो. कधी-कधी मी तिला पुस्तकात वाचलेल्या स्टोरी ऐकवते. त्यामुळे घरातलं वातावरणही आनंदी राहतं. दोघींचा तणाव कमी होण्यास मदत होते. खूप मोजक्या घरांमध्ये हे वातावरण पाहायला मिळतं.या लेखाच्या निमित्तानं एका मित्राचं वाक्य आठवतं. आमची गँग कधी एकत्र आली किंवा कुटुंबीयांसोबत तो कधी गेला असेल. कुणाच्या हातात मोबाईल दिसला की, त्याचं ठरलेलं वाक्य म्हणजे, 'अरे काय हे? किती दिवसांनी एकत्र आलोय, गप्पा मारा की. मोबाईलमध्ये काय डोकी टाकून बसलात.' त्याच्या या वाक्यानं माझ्या मनात कायमचं घर केलं आहे. अनेक घरांमध्ये व्हॉट्सअॅपवर घरातली मंडळी प्रचंड गप्पा मारतात. पण घरात वावरणारी तीच मंडळी बाजूला बसलेल्या भावा-बहिणीला किंवा आई-बाबांना साधं विचारत देखील नाही.

स्पेस प्रत्येकालाच हवी असते...स्वातंत्र्य प्रत्येकाचीच मागणी असते...मोकळीकही प्रत्येकालाच हवी असते..पण नातेसंबंधांचं घट्ट पाठबळ नसेल, तर या सगळ्याला काहीच अर्थ नाही. शेवटी वेगळ्या स्पेसमध्ये मोकळीक घेता घेता त्या स्पेसमध्ये आपण एकटेच तर रहात नाही ना? याचाही विचार करणं गरजेचं आहे!


संबंधित विषय
ताज्या बातम्या