Advertisement

'पुरुषांना' न्याय कधी मिळणार?


'पुरुषांना' न्याय कधी मिळणार?
SHARES

गेल्या ४ वर्षांपासून ते दोघे रिलेशनशीपमध्ये होते. तिच्या घरच्यांना त्यांचं हे नातं मान्य नव्हतं. घरातल्यांना सांगून ती त्याच्याकडे आली. त्याच्या घरच्यांनीही त्यांचं लग्न लावून दिलं. लग्नाच्या १-२ महिन्यातच काय झालं माहीत नाही, पण तिचं वागणं अचानक बदललं आणि परत ती तिच्या आईवडिलांच्या घरी गेली. त्याच्याकडून तिने घटस्फोटाची मागणी केली. त्याने तिची खूप विनवणी केली, पण तिने त्याचं काहीही ऐकलं नाही. उलट काही दिवसांत तिने त्याच्यावर जबरदस्ती लग्न केल्याचा गुन्हा दाखल केला. आज १ वर्ष झालं. ही त्यांची केस कोर्टात सुरु आहे. तो, त्याचं कुटुंब पुरतं खचलंय. पोलिसांनाही माहितीये, की त्याची चूक नाही. पण 'ती मुलगी आहे रे आणि तिने आधी कम्प्लेंट दिली आहे, त्यावर आता आपण काही नाही करू शकत' अशी उत्तरं त्याला मिळत आहेत. 'ती मुलगी आहे म्हणून'. किती सहज बोलून जातो आपण हे!

म्हणजे आपण २१व्या शतकात आहोत आणि आता महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. काही क्षेत्रात तर पुरुषांच्याही पुढे जातात. पण तरीही 'ती मुलगी/महिला आहे म्हणून' ही गोष्ट आजही तशीच आहे. असं का? एखाद्या मुलाने मुलीला काही कारणांमुळे सोडून दिलं, तर ती त्यावर 'लग्नाचं आमिष दाखवून फसवण्याचा गुन्हा' अगदी सहज दाखल करते आणि त्यानंतर त्या मुलाचं आयुष्य काय होतं हे आपल्यातील अनेकांनी पाहिलं किंवा ऐकलं असेल. पण हेच जेव्हा मुलगी करते तेव्हा? म्हणजे मुली सोडून नाही का जात मुलाला? तेही शरीरसंबंध ठेवले असताना? आजही बायकोला नवऱ्याने मारलं तर अगदी ओळख नसलेले लोक ही त्या मुलीला सहानुभूती दाखवतात. पण हेच जर कोणता नवरा म्हणाला की 'मला माझी बायको खूप त्रास देतेय, माझ्यावर हात उचलते', तर त्या पुढचं वाक्य असतं 'तूच काहीतरी केलं असशील, उगाच नाही ती असं करणार'.

आपल्याकडे खूप पूर्वीपासूनच महिलांना झुकतं माप दिलं जातंय. पण जशी वर्ष बदलली, विचार बदलले, तिथे हे विचार मात्र तसेच राहिले.

अत्याचार मुलींवर होतात, तसेच ते मुलांवरही होतात. पण यात जसं मुलींना/महिलांना सपोर्ट मिळतो तसा मुलांना/पुरुषांना आजही मिळत नाही. आणि पुरुषांना समजून न घेणारे पुरुषच असतात.

मी रोज ट्रेनने ट्रॅव्हल करतो. त्यामुळे याविषयावर मला आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते. जसे महिलांना स्पेशल डब्बे आहेत, तसे आम्हाला नाहीत. त्यामुळे आमच्या जनरल डब्ब्यात बऱ्याचदा महिलाही चढतात. एखादी महिला ट्रेनमध्ये चढली असेल, तर पुरुष स्वतःहून त्यांना बसायला जागा देतात. पण तरीही गर्दीत एखाद्याचा चुकून धक्का लागलाच, तर त्यापुढे होणारा प्रसंग आपल्या सगळ्यांनीच पाहिला असेल. महिलांना 'तो' स्पर्श कळतो, असं म्हणतात. डब्ब्यातले सगळेच पुरुष चांगलेच असतात, असं मी नाही म्हणत. पण त्यात खरंच एखाद्याचा चुकून धक्का लागू शकतो ना? आणि जर एखाद्या महिलेचा धक्का पुरुषाला लागला तर? सुरवातीचा प्रसंग इथेही घडेल का?

- सुयोग घरत

किती साधं आणि सरळ उदाहरण आहे हे!  म्हणजे तुम्ही, मी, आपण सगळ्यांनीच हे पाहिलं आहे. ट्रेन, बसमध्ये असे कितीतरी किस्से रोज घडतात, ज्यात महिलेला धक्का लागला म्हणून त्या पुरुषालाच चोप दिला जातो. पण असं कधी पाहिलं आहे का, की एका महिलेचा धक्का लागला म्हणून सगळे पुरुष एकत्र होऊन तिला बोलतायत?

अजून एक किस्सा आठवतोय. एकदा हॉटेलमध्ये मी आणि माझी मैत्रीण बसलो होतो. माझ्या मागच्या टेबलवर ३-४ मैत्रिणींचा ग्रुप बसला होता. त्यांच्या गप्पा चालू असताना आम्हालाही त्या ऐकू येत होत्या. आमच्या बाजूच्या टेबलवर बसलेल्या २ मुलांवरून त्या मुली कमेंट्स पास करत होत्या. 'किती मस्त दिसतोय ना यार हा..जामच आवडलाय मला..' असं बरचसं बोलणं आमच्या कानावर पडलं. त्या मुली ज्या मुलाला बघून हे सगळं करत होत्या, त्याला हे समजलं नाही अशातला भाग नाही. पण त्याने काहीच केलं नाही. पण हा सेम प्रसंग मुलीबरोबर झाला असता तर? एव्हाना त्या मुलाला बाजूच्या सर्व टेबलवर बसलेल्यांनी बोलून किंवा प्रसंगी मारुनही हॉटेलच्या बाहेर काढलं असतं. असे बरेच प्रसंग आपण बघतो. रस्त्यावर धक्का लागला म्हणून, बसमध्ये सारखं पाहतोय म्हणून, अशा बऱ्याच प्रसंगांमध्ये पुरुषाला शिव्या किंवा चोप मिळतो. यामध्ये ९०% पुरुष चुकीचे असतीलही, पण १०% पुरुषही त्यात भरडला जातोय त्याचं काय?

मी या विषयावर १-२ ओळखीच्या क्राईम रिपोर्टर्सशीही बोलले. त्यांच्याकडूनही मला बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या.

एकाने ही घटना सांगितली. रोड अॅक्सिडेंटमध्ये एका बाईच्या गाडीची धडक लागून एका वृद्धाचा मृत्यू झाला. तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना समजलं की तिला अटक न करता फक्त फाइन लावून सोडून देण्यात आलं होत. त्याने हेही सांगितलं, की अशा बऱ्याच केसेस आम्ही बघतो, ज्यात महिलेची चूक असूनही तिला पुरुषाला जी शिक्षा केली जाते, ती महिला आहे म्हणून केली जात नाही. तसेच जर तसाच काही मोठा गुन्हा (केस) नसेल, तर महिलेला सूर्यास्तानंतर विचारपूस करण्यासाठी पोलीस स्टेशनलाही बोलावलं जात नाही. पण हे पुरुषांसाठी लागू नाही. बऱ्याचदा पोलिसही 'ती बाईची बाजू आहे, आपण नाही काही करू शकत' असं बोलतात.

हल्लीच घडलेल्या अतुल तापकीर आत्महत्या प्रकरणात 'बायकोचा त्रास ' हे महत्वाचं कारण होतं. एखादी महिला स्वतःच्या चुकीमुळे एकटी राहत असेल, तरीही तिला बिचारी, गरीब याच नजरेने पाहिलं जातं.

माझं २ महिन्यांपूर्वी घरच्यांच्या संमतीने लग्न झालं. लग्नाच्या काही दिवसांतच माझ्या बायकोचं वागणं बदललं. घरात काम न करणं, छोट्या छोट्या गोष्टींवरून माझ्याशी वाद करणं. या गोष्टी खूप वाढत गेल्या. नंतर मला समजलं, ती तिच्या मित्राशी दिवसभर फोनवर बोलत असते. मी तिला त्याबद्दल विचारलं असता, त्या दिवाशी तिने खूप तमाशा केला आणि घरी निघून गेली. या सगळ्या भांडणामुळे माझ्या आईला हार्टअटॅक आला. ती हॉस्पिटलमध्ये आली आणि तिथेही तिने त्याच गोष्टी परत काढून भांडण केलं. तेव्हा मी ठरवलं, मला तिच्याबरोबर राहायचं नाही. नंतर ती आणि तिच्या घरचे काही लोक आमच्या घरी येऊन बोलून गेले. पण आम्हाला पुन्हा एकत्र यायचं नव्हतं. आणि काही दिवसांतच तिने माझ्यावर आणि माझ्या घरच्यांवर गुन्हा दाखल केला, की आम्ही तिला मारहाण करायचो. त्याच दिवशी पोलिसांनी आम्हाला अटक केली. लग्नाच्या दुसऱ्या महिन्यापासून ते आज ८ महिने झाले तरीही, ही केस अजून सुरु आहे. त्या मुलीला आम्ही मारहाण केली नाही, त्रास दिला नाही, हे आम्ही सिद्ध करू शकत नाही. पण तिनेही ते सिद्ध न करताच आमच्यावर मात्र गुन्हा दाखल झालाय.

आनंद भोसले (बदलेलं नाव)

यासारखे असे कितीतरी पुरुष आहेत, जे अशा खोट्या आरोपांवरून तुरुंगात जातात. महिलेची बाजू म्हणून तिला काही सिद्ध करावं लागत नाही. आणि पुरुष आहे म्हणून तो कितीही बोलला, तरी त्याच्यावर अविश्वास दाखवला जातो. मानसिक अत्याचार फक्त पुरुषांकडूनच होत नाहीत, तर असे बरेच पुरुष आहेत ज्यांच्यावर महिलांकडून शारीरिक आणि मानसिक अत्याचार होतात. पण पुरुष समोर येत नाहीत.

- महिलांवर पुरुष हात उचलतो, तसं पुरुषांवरही हात उचणाऱ्या महिला आहेत.

- लग्नाचं वचन देऊन जर मुलामुलींमध्ये शारीरिक संबंध झाले आणि त्यानं लग्न केलं नाही, तर त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करता येतो. पण त्याच्याउलट पुरुष मात्र असं काहीच करत नाहीत आणि केलं तरी महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे असं अजून तरी कोणतंही उदाहरण नाही.

अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यात महिला सहज गुन्हा दाखल करू शकते, पण पुरुष नाही करू शकत आणि केला तरी त्याला महिलेला मिळतो तो न्याय नाही मिळत. आधी पुरुष महिलांकडून होणारे त्रास बोलूनही दाखवत नव्हते. पण आता हळूहळू का होईना, पुरुष बोलू लागलेत.

संविधानात कोणताही कायदा फक्त मुलींसाठी किंवा मुलांसाठी असा बनवलेला नाहीये. पण आपल्या समाजात राहणाऱ्या लोकांनीच अशी परिस्थीती निर्माण केली आहे ज्यात महिलेला नेहमीच दया, सहानुभूती दाखवली जाते. अगदी साधं उदाहरणच द्यायचं झालं तर, एखाद्या पोलीस स्टेशनला एक मुलगा आणि मुलगी कम्प्लेंट द्यायला आले, तर सर्वात आधी मुलीची कम्प्लेंट लिहून घेतली जाते, मग मुलाची. अशा बऱ्याच केसेस आम्ही पाहतो ज्यात फक्त मुलगी आहे म्हणून गोष्टी बदलतात. याला  कायदा नाही, आपल्या समाजात राहणाऱ्यांची मानसिकता कारणीभूत आहे. 

- कविता शिंदे, वकील


सगळेच पुरुष चांगले किंवा सगळेच वाईट, असं मला अजिबात म्हणायचं नाही. पण काही गोष्टींमध्ये पुरुषांची ही बाजू समजून घेणं गरजेचं आहे. महिलांवर होणारे अत्याचार पुरुषांपेक्षा नक्कीच जास्त आहेत. महिलांना काही गोष्टींत प्राधान्य देण्याची गरजही आहे. आणि ते मिळायलाच हवं. पण या सर्व गोष्टींमुळे 'महिला आहे म्हणून' याचा गैरवापर करणाऱ्यांची संख्याही सध्या वाढत चालली आहे, हेही तितकंच खरंय.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा