Advertisement

कचरा खाणारं अनोखं बास्केट


कचरा खाणारं अनोखं बास्केट
SHARES

पाणी-वीज टंचाई, गृहटंचाई, वाहतुक कोंडी या समस्यां इतकीच सध्या मुंबईसाठीची आणखी एक गंभीर समस्या म्हणजे अपुरे डंपिंग ग्राऊंड. मुंबईत दिवसेंदिवस कचरा वाढत चालला आहे. त्यात डंपिंग ग्राऊंड अपुरे पडत असल्यानं हा कचरा कुठं टाकायचा हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशावेळी मनात आणलं तर प्रत्येक मुंबईकर कचऱ्याच्या विल्हेवाटाची समस्या दूर करण्यास हातभार लावू शकतो. हो...ठरवलं तर प्रत्येकजण कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावत कचऱ्याचं प्रमाण कमी करू शकतो आणि हे शक्य होऊ शकतं ते कचरा खाणाऱ्या बास्केटद्वारे.


अशी तयार झाली कचरा खाणारी बास्केट

सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ असणाऱ्या जयंत जोशी यांना ११ वर्षांपूर्वी घरातील कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची या विचारातून एक भन्नाट कल्पना सुचली. त्यानुसार त्यांनी प्लास्टिकच्या बास्केटला नायलाॅन जाळी लावली. त्यात एक विशिष्ट प्रकारचे बायो कल्चर पावडर टाकली. या पावडरमध्ये कचऱ्याचं वेगानं विघटन होईल असे घटक असल्यानं कचऱ्याची विल्हेवाट सहज आणि जलदगतीनं होते.

अशा या बास्केटमध्ये जोशी कुटुंबिय आपल्या घरात तयार होणारा कचरा, जसं की, शिळं अन्न, फळे, भाज्या टाकू लागले. या कचऱ्याचं विघटन होऊ लागलं आणि त्यातून खतही मिळू लागलं. जोशींचा हा प्रयोग यशस्वी ठरला आणि त्यातूनच कचरा खाणारी बास्केट जन्माला आली. पुढं जोशी यांनी नियमितपणे कचरा खाणारी बास्केट वापरण्यास सुरूवात केली आणि आपल्या घरातील कचरा कमी केला.


कचऱ्यातून खतनिर्मितीही

जोशींचा कचरा खाणाऱ्या बास्केटचा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर त्यांनी इतरांनाही कचऱ्याच्या विल्हेवाटीचं महत्त्व समजावून देत कचरा खाणारी बास्केट वापरण्यासाठी प्रोत्साहीत केलं. त्यातूनच आतापर्यंत जोशी यांनी २२ हजारांहून अधिक कचरा खाणाऱ्या बास्केट तयार करत अनेकांच्या घरातील कचरा कमी केला आहे.

दरम्यान शिळं अन्न, फळे, भाज्या आणि फळांच्या साली कचऱ्यात न टाकता या बास्केटमध्ये टाकल्यास एका बास्केटमधून दोन ते तीन किलो खत एका महिन्याला निर्माण होतं. या खताचा वापर झाडांसाठी करता येतो वा खताची विक्रीही करता येते. त्यामुळे ही बास्केट खूपच फायद्याची ठरते.


दिवसाची फक्त ५ मिनिटं द्या


या बास्केटचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कचऱ्याचं विघटन होताना वा खत तयार होताना बास्केटला कोणत्याही प्रकारची दुर्गंधी येत नाही. तर बास्केटमध्ये पाणी सुटत नाही की अळ्या पडत नाहीत. इतकंच काय गांडुळही होत नाहीत. त्यामुळे अशीही पर्यावरणस्नेही बास्केट तुम्ही घरात कुठंही अगदी स्वयंपाक घरातही ठेवू शकता.

कचऱ्याचं विघटन होतं, त्यातून खतनिर्मिती होते, दुर्गंधीही येत नाही या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी या बास्केटच्या आहेतच. पण त्याचबरोबर या बास्केटमध्ये कचरा टाकत दिवसांतून दोनदा वा तीनदा कचरा ढवळण्यासाठी तुम्हाला केवळ ५ मिनिटांचा वेळ द्यावा लागेल. त्यामुळं ही मोठी वेळखाऊ गोष्ट नसल्यानं या बास्केटचा वापर करणं सहज सोप ठरतं.


मी आतापर्यंत तीन हजारांहून अधिक कचरा खाणाऱ्या बास्केट बनवल्या आहेत. या बास्केटचा अधिकाधिक लोकांनी वापर केला तर नक्कीच वाढता कचरा आणि कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या बऱ्यापैकी दूर करता येईल. तर ही बास्केट वापरणंही सोप असून त्यातून खतनिर्मितीही होत असल्यानं याच दुहेरी उपयोग होतो. त्यामुळे अशा बास्केट वापरल्या गेल्या तरी नक्कीच शून्य कचरा संकल्पना प्रत्येक घरात प्रत्यक्षात उतरताना दिसेल.

- जयंत जोशी


कसा कराल बास्केटचा वापर?

कचरा फस्त करणाऱ्या या टोपलीत ओल्या कचऱ्याचे विघटन करणारे जिवाणू असतात. टोपली शक्यतो स्वयंपाकघरात कोरड्या जागी ठेवावी. त्यात पाणी टाकण्याची आवश्यक्ता नाही. कारण स्वयंपाक घरातील ओल्या कचऱ्यामध्ये ५० ते ९० टक्के पाणी असते. जिवाणू त्या पाण्याचे बाष्पीभवन करतात. दोन महिन्यानंतर काळसर असे हे खत तयार होते. हे बास्केट घराबाहेर ठेवणं टाळावं. कारण उंदीर-घुशी हे बास्केट कुरतडू शकतात.



हेही वाचा

मानसिक आरोग्यावर भाष्य करणारी 'बोलकी भिंत'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा