Advertisement

दोन चाकांवर गड-किल्ले सर करणारे शिलेदार


दोन चाकांवर गड-किल्ले सर करणारे शिलेदार
SHARES

सह्याद्रीच्या लांबच लांब पर्वतरांगांमध्ये दडलेले गडकोट सर करणं फिरस्त्यांचा आवडता छंद! मोकळा वेळ असो वा काही तरी हटके करायचं असेल तर आपण ट्रेकिंगचा पर्याय नक्कीच निवडतो. एकदा ट्रेकिंगचा निर्णय झाला की मग पाठीला सॅक अडकवून गडाचा पायथा गाठायची तयारी करायची



सोबतीला कुणी असेल तर ठीक, नसेल तर एकटा जीव सदाशीव असं म्हणायचं आणि गडावर चढाई करत माथ्यावर जायचं. गडाच्या आसपासचा परिसर पाहण्यात हरवून जायचं आणि परतीची वाट पकडायची, अनेकांचं हे समीकरण ठरलेलं असतं. छंद म्हणा किंवा विरंगुळा म्हणा, अनेक जण ट्रेकिंगला जातात. पण या सर्वांना मात दिलीय ती 'निसर्ग गिरीभ्रमण'च्या शिलेदारांनी!



'निसर्ग गिरीभ्रमण' या संस्थेच्या माध्यमातून हे शिलेदार गेल्या अनेक वर्षांपासून किल्ल्यांवर जातात. तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे? आम्ही पण जातो किल्ले आणि गडांवर भ्रमंती करायला. 'निसर्ग गिरीभ्रमण' या संस्थेचे शिलेदार असं काय वेगळं करतात? असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल


पण 'निसर्ग गिरीभ्रमण'च्या शिलेदारांची ट्रेकिंग ही साधीसुधी नाही. हे सगळे आपापल्या सायकली घेऊन किल्ल्यावर स्वारी करतात. झालात ना चकित! माझी तर पाठीवर एक साधी सॅक घेऊन गड सर केला तरी दमछाक होते. हे तर चक्क सायकल घेऊन गड सर करतात. 'माऊंटन बायकिंग' हा नवीन ट्रेंड निसर्ग गिरीभ्रमणच्या शिलेदारांनीच सुरू करून दिला.



माऊंटन बायकिंगचं थ्रील 

'निसर्ग गिरीभ्रमण' या ग्रुपनं ३१ डिसेंबर २००१ पासून माऊंटन बायकिंग सुरू केलं. संजय करंदीकर, प्रथमेश मेहेंदळे, दिवाकर भाटवडेकर, यतीन नामजोशी असा हा माऊंटन बायकिंगचा ग्रुप ठरलेला आहे. आता तर या ग्रुपमध्ये मुंबई, पुणे, नाशिक इथले सायकलस्वार देखील सहभागी होतात. निसर्ग गिरीभ्रमण या ग्रुपकडून दरवर्षी ३१ डिसेंबरला माऊंटन बायकिंगसाठी ट्रेकिंगचं आयोजन केलं जातं

पाठीवर सॅक आणि खांद्यावर सायकल घेऊन कडा चढणं हे काम सोपं नाही, असं सुषांत करंदीकर सांगतातसुशांत करंदीकर यांनी महाराष्ट्रात हा ट्रेंड रूढ केला असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. सुशांत यांनी स्वत: एकट्यानं जवळपास ७६-८० गड-किल्ले माऊंटन बायकिंगनं सर केले आहेत.


१९९४ साली मी माझ्या काही मित्रांसोबत पहिल्यांदा सायकल घेऊन हरिश्चंद्र गडावर गेलो होतो. तो अनुभव अविस्मरणीय होता. त्यानंतर ३१ डिसेंबर २००० ला आम्ही परत त्याच गडावर सायकल घेऊन गेलो. त्याचवेळी दरवर्षी ३१ डिसेंबरला माऊंटन बायकिंग करण्याचा निर्णय आम्ही घेतला. तेव्हापासून आम्ही दरवर्षी ३१ डिसेंबरला सायकल ट्रेकिंग करतोअगदी सुरुवातीला सगळ्यांनीच या संकल्पनेची हेटाळणी केली. पण आम्ही आमचा छंद सोडला नाही.

सुशांत करंदीकरसायकलिस्ट



गडावर सायकल घेऊन जायचं म्हणजे तुमची सायकल वजनदार बिलकूल नसावी. शिवाय जोडीला पंक्चर किट, हातोडी, गम तसंच सायकल दुरुस्तीचं सर्व साहित्य, हवा भरण्याचा पंप हे सर्व साहित्य असायला हवं. मात्र, नेहमी ट्रेकला घेतो त्यापेक्षा कमी सामान या माऊंटन बायकिंगला असणं आवश्यक आहे


तुमची मानसिक आणि शारिरीक तयारी असणं देखील फार आवश्यक आहे. माऊंटन बायकिंगसाठी जवळपास एक-दोन आठवडे आधी सायकलचा सराव करणं आवश्यक आहे. ऐनवेळी म्हणजेच मोहिमेलाच तुम्ही सायकल चालवलीत, तर तुमच्या पायांना त्रास होतो, असंही करंदीकर यांनी स्पष्ट केलं.




किती गड-किल्ले केले सर?

हरिश्चंद्र गड

राजमाची-ढाक-भैरी-भीमाशंकर

तोरणा-राजगड

पन्हाळगड-विशाळगड



चांदवड-राजदेर-कंचना-इंदाणी-धोडणा

आड-औंडा-पट्टा-वितंगा

नाणेघाट-जीवधन-चावंड-शिवनेरी-साल्हेर-सुधागड

रतनगड-कळसुबाई



खरंतर ही लिस्ट खूप मोठी आहे. २००० सालापासून या ग्रुपचा सुरू झालेला प्रवास आजतागायत सुरू आहे. आजही असे अनेक माऊंटन सायकलिंगचे ट्रेक आयोजित केले जातात. करंदीकर सांगतात, "कुठल्या ट्रेकवर जायचं म्हणजे आम्हाला पूर्ण तयारी करावी लागते. त्या जागेचा अभ्यास करावा लागतो. जे पहिल्यांदाच आमच्यासोबत ट्रेकिंगला येतात त्यांच्यावर खास करून नजर ठेवली जाते. कारण त्यांची पूर्ण जबाबदारी आमची असते." 

हा उपक्रम असाच पुढे चालू ठेवण्याचा निसर्ग गिरीभ्रमणचा मानस आहे. महाराष्ट्रात माऊंटन बायकिंगची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या संस्थेपासून अनेकांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे.



हेही वाचा

पाच वर्षांचा जीव..पण त्याचे स्टंट थरकाप उडवतात!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा