प्रेमाचा अतिरेक नको...

Mumbai
प्रेमाचा अतिरेक नको...
प्रेमाचा अतिरेक नको...
प्रेमाचा अतिरेक नको...
प्रेमाचा अतिरेक नको...
प्रेमाचा अतिरेक नको...
See all
मुंबई  -  

बऱ्याच महिन्यांनंतर आम्ही कॉलेज फ्रेंड्स भेटलो होतो. दोन दिवसांचा मस्त प्लॅन होता लोणावळाला एकत्र घालवायचा. त्यातल्या एक दोघींची लग्न झाली आहेत आणि काहींचा साखरपुडा ! त्यामुळे बऱ्याच गोष्टी (girl's talk) शेअर करण्यासाठी आम्ही सगळ्या वेळ काढून भेटलो होतो. एकत्र भेटल्यावर प्रत्येकीने आपापल्या घरी, बॉयफ्रेंडला, नवऱ्याला कॉल करून आम्ही पोहोचल्याचं कळवलं. पण आमच्यातल्या एका मुलीला तिचा नवरा किमान दर दोन तासांनी कॉल करून काय करतेयस? हे विचारत होता. नंतर तर आम्ही सगळ्याच एवढया वैतागलो की शेवटी तिला तिचा मोबाईल स्विच ऑफ करायला सांगितला. पण त्यानंतर त्याने चक्क तिच्याशी बोलायला आमच्यातल्या एकीच्या मोबाईवर कॉल केला! आम्ही या गोष्टीवरून तिला खूप चिडवलं. एवढं की शेवटी ती रडकुंडीला आली. पण नंतर मात्र आम्ही तिला खूप गांभीर्याने विचारलं,

तुझा नवरा नेहमीच असं करतो का? म्हणजे हे असं सारखं कॉल करून कुठे आहेस? काय करतेयस? विचारणं...
हो...त्याची सवय आहे अगं ती?
सवय? ही असली कसली सवय? जर त्याला माहीत आहे आपण एकत्र वेळ घालवायला खूप महिन्यांनी भेटलोय तरीही?
हो गं, त्याचं प्रेम आहे माझ्यावर तेवढं..काळजी वाटते त्याला नेहमी..
हे असलं प्रेम? १० वेळा कॉल करून विचारणारं प्रेम? हे प्रेम नाही, जरा 'अतीच' प्रेम आहे..नाही का?
आम्ही खूप मस्करी केली यावरून तिची. ती रात्र आमची याच विषयावर बोलण्यात गेली..
पण मला मात्र हे काही पटलं नाही. म्हणजे प्रेम आहे मान्य..पण ते हे असं?
आम्ही मुंबईला आल्यावर मी माझ्या काही खास मित्रमैत्रिणींना आमची पिकनीक कशी झाली हे सांगताना हाही किस्सा सांगितला आणि त्यावर त्यांनी त्यांच्या ओळखीतही अशी लोकं आहेत, असं मला सांगितलं.
मग मी काहींचे किस्से ऐकले :

माझं लव्ह मॅरेज झालंय. म्हणजे गेली ३ वर्ष आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. तेव्हा ही माझा बॉयफ्रेंड (आताचा नवरा) असाच होता. म्हणजे मी दिवसात काय-काय करते ते तो नेहमी कॉल करून विचारायचा. एखाद्या वेळी जर ऑफिसमध्ये मी मीटिंगमध्ये असेल आणि फोन सायलेंटवर असेल तर त्यानंतर त्याचे १२-१५ मिस्ड कॉल असायचे. बरं माझी मीटिंग आहे हे सांगूनही तो त्याचे कॉल करणं काही सोडायचा नाही. बऱ्याचदा तू कॉल का उचलला नाहीस, यावरुनही आमचे वाद झाले आहेत.
- खुशबू राणे


माझं लग्न ठरलंय. साखरपुडा झालाय. मी Advertising फर्म मध्ये काम करतो. त्यामुळे एकदा ऑफिसला गेलो की मग मोबाईलकडे बघायला वेळच मिळत नाही. पण माझी होणारी बायको अगदी उठलास का? निघालास का? जेवलास का? कधी निघणार आहेस? हे असं विचारायला दिवसातून बऱ्याचदा फोन करते. तिला माझी काळजी आहे. मी वेळेवर जेवावं, वेळेवर घरी जावं हे तिला वाटतं. पण मी ज्या फील्डमध्ये आहे, त्यामध्ये हे होणं नेहमीच शक्य नाही. बऱ्याचदा कॉल उचलला नाही म्हणून ती रागावते आणि घरी जाऊन मला मिळालेला वेळही तिची समजूत घालण्यातच जातो.
- तुषार माने

मी गेली २ वर्ष एका रिलेशनशीपमध्ये आहे. माझा बॉयफ्रेंड आमच्या जवळच राहतो. आमच्या घरीही आमच्या नात्याबद्दल माहीत आहे. त्याची एक सवय आहे. मला कुठेही जायचं असलं की त्याला माझ्याबरोबर यायचं असतं. म्हणजे अगदी मार्केटमध्ये सुद्धा. मी त्याला याबद्दल विचारलं, की तो म्हणतो अगं तेवढाच एकत्र वेळ घालवू. बरं मी एकटी असेल तेव्हा ठीक आहे. बऱ्याचदा आमचा फ्रेंड्सचा ग्रुप असला, तरी त्याला माझ्याबरोबर यायचं असत. त्याने येऊ नये असं मला नाही वाटत. पण बऱ्याचदा माझे सगळेच फ्रेंड त्याच्यासमोर कम्फर्टेबल असतीलच असं नाही ना?
- माधुरी जैन


आपल्या पार्टनर वर प्रेम असणं हे वाईट नाही. ते असायलाच हवं. त्याची / तिची काळजी असायलाच हवी. पण जेव्हा त्या प्रेमाचा आणि काळजीचा अतिरेक होतो, तेव्हा मात्र नात्यामध्ये खटकेही उडायला लागतात. प्रेम आणि 'अति' प्रेम या दोन्ही गोष्टींत फरक आहे. आपण जेव्हा एखाद्यावर खूप प्रेम करतो, तेव्हा आपल्याला ती व्यक्ती कुठे आहे? काय करतेय? जेवली असेल का? घरी पोहचली असेल का? हे माहीत असणं गरजेचं वाटतं. पण जेव्हा हे अती होतं, तेव्हा त्याचे नात्यावर पडसाद उमटायला सुरवात होते.
आपल्या आजूबाजूलाच असे बरेच जण असतील जे कधी तरी बोलून जातात, 'माझा बॉयफ्रेंड खूप Possessive आहे. त्याला प्रत्येक गोष्ट सांगावी लागते', किंवा 'माझ्या बायकोला मी कुठे बाहेर गेलो की मी कुठं जातोय? कोणाबरोबर जातोय? त्यांचे नंबर हे एवढं सगळं द्यावं लागतं, तरच ती शांत होते.'

हे अति काळजी करणं, Possessive असणं, नंतर irritated करायला लागतं आणि मग या अशा छोट्या गोष्टींमुळे ही वाद होऊ लागतात. अती काळजी, अती प्रेम आणि संशय यामध्ये एक बारीकशी रेघ आहे आणि आपण ती कधी नकळत ओलांडून जातो हे आपल्यालाही समजत नाही.

एक किस्सा सांगते...
आमच्या बाजूला एक जोडपं रहात होतं. एकदा असंच आम्ही बाहेर रात्रीचा जेवणाचा प्लॅन केला. त्या मुलीने कॅज्युअल ड्रेसिंग केली होती. मंगळसूत्र घातलं नाही. त्या मुलालाही ते चालायचं. पण त्या रात्री मजा म्हणून त्याचा मित्र त्याला म्हणाला, 'वहिनींनी मंगळसूत्र नाही घातलं, तर कोणालाच विश्वास बसणार नाही त्यांचं लग्न झालंय. अजूनही प्रपोज येतील.' ही गोष्ट अगदी मजेशीररीत्या घेण्यासारखी होती. तिनेही ती तशीच घेतली. पण त्यानंतर बऱ्याचदा तिला तो 'तुला ना मोठं मंगळसूत्र छान वाटतं, तुला सूट करतं ते, घालत जा' असं म्हणायचा. तो का असं बोलायला लागला हे तिला बरोबर समजलं होतं. बऱ्याचदा त्याला बरं वाटावं म्हणून ती ते घालायचीही. पण तिला त्या गोष्टीचं वाईट ही वाटलं होतं. अर्थात, हे त्याने तिच्याकडे 'त्या' नजरेने कोणी पाहू नये, म्हणूनच सांगितलं होतं. पण तिला ते आवडतंय का, हे पाहणंही तेवढंच महत्वाचं होतं.

माझ्या गर्लफ्रेंडला खूप सवय आहे. प्रश्न विचारायचे म्हणजे सुरवातीला ते बरं वाटायचं. ती काळजी आवडायची. पण नंतर ते जरा अतीच व्हायला लागलं. म्हणजे ती कॉल करत असताना माझा नंबर जर बिझी लागला, तर कॉलवर कोण होतं? किंवा तू कुठे होतास, तुझा मोबाईल का स्वीच ऑफ होता? हे सुरु होतंच. एकदा तर तुझा फेसबुकचा पासवर्ड दे हेही तिने विचारलं. बऱ्याचदा आमच्यात यावरून भांडणंही झालीत आणि शेवटी आम्ही वेगळं होणंच पसंत केलं.

- सुशांत भानुशाली

बऱ्याचदा हा अतिरेक नात्याला संपवतो. या अशा स्वभावाच्या लोकांना किंवा असं वागणाऱ्या लोकांना सतत आपला पार्टनर आपल्यापासून काही लपवत तर नाहीये ना? तो आपल्यापासून लांब तर जाणार नाही ना? या अशा गोष्टी भेडसावत असतात. पण कालांतराने त्याचे परिणाम मात्र खूप भयानक होतात.

प्रत्येकजण आपल्या पार्टनरच्या बाबतीत थोड्याफार प्रमाणात Possessive असतोच. पण त्याचं प्रमाणही आपल्याला समजायला हवं. म्हणजे, सतत विचारले जाणारे प्रश्न :

  • कोणाबरोबर बोलत होतीस/होतास?
  • एवढा वेळ काय बोलत होतीस/होतास?
  • कोणत्या मित्र/मैत्रिणीबरोबर बाहेर जाणार आहेस?
  • त्याने/तिने तुझ्या फेसबुकच्या पोस्ट/फोटोवर अशी कंमेंट का केली?
  • तुझ्या फेसबुकवर एवढ्या मुली/मुलं कसे?
  • एवढ्या रात्री तू online काय करतेस/ करतोस?
  • ती/तो तुझ्याशी एवढ्या पर्सनल गोष्टी शेअर करतो/करते?


"आपल्या प्रत्येकाला वाटतं की माझी व्यक्ती ही माझीच असावी. त्यामुळे Possessiveness हा प्रत्येकामध्ये थोड्याफार प्रमाणात असतोच. पण त्याचा अतिरेक चांगला नाही. म्हणजे अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर, तुम्ही कॉलवर बोलत आहात आणि तिथे तुमचा पार्टनर आला आणि तुम्ही 'नंतर बोलते' असं सांगून कॉल ठेऊन देता. त्याने तुम्हाला विचारलं 'कोणाशी बोलत होतीस?' तर हा अगदी नॉर्मल प्रश्न आहे. पण त्यावर जर तुम्ही त्याला 'होता एक फ्रेंड' असं तोडत उत्तर दिलं, तर नक्कीच त्याच्या/तिच्या मनात वेगळा विचार येणार. त्यामुळे दोघांमध्ये गोष्टी तेवढ्या क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. काहींचा मूळचा स्वभावच तसा असतो. म्हणजे अशा लोकांबरोबर डील करण थोडं कठीण असतं, म्हणून त्यांच्याबरोबर आपण आधीच गोष्टी तेवढ्या स्पष्टपणे मांडल्या, तर नातं टिकवण्यास मदत होते".
- ज्योती सोनावणे, काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट

आपल्याला आपल्या जोडीदाराबद्दल वाटणार प्रेम, काळजी, हे त्या-त्या प्रमाणात सुरवातीला ठीक वाटतं. पण नंतर याच छोट्या छोट्या गोष्टी भांडणाला कारणीभूत ठरतात. तेव्हा प्रेम करत असताना आपण 'अती प्रेमा'च्या आहारी जाऊन येणारा 'possessiveness' नंतर ' Over-possessiveness' तर होत नाहीये ना? याची काळजी घ्यायला हवी.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.