पितृपक्ष केवळ पितरांचा काळ नाही

  Churchgate
  पितृपक्ष केवळ पितरांचा काळ नाही
  मुंबई  -  

  पितृपक्ष केवळ पितरांचा काळ नाही

  आपली भारतीय संस्कृती उत्सवप्रिय आहे. त्यामुऴे आपल्याकडे वर्षभर कुठले ना कुठले सण, उत्सव सुरू असतात. श्रावण मासापासून ते मार्गशीर्ष महिन्यापर्यंत कुठला ना कुठला सण, कुठले ना कुठले पर्व सुरू असते. सणांचा संबंध उत्सवाशी असतो. तर पर्वाचा संबंध हा विशिष्ट्य काळ, पुण्यकाळ, खंड, अंश वा अध्यायाशी असतो. म्हणजेच पर्व हा आपल्या जीवनाचा तो अध्याय किंवा खंड आहे, ज्यात आपण भूतकाळात केलेल्या नकारात्मक कर्मातून निर्माण झालेल्या दुर्भाग्यावर सकारात्मक कर्माचा उपाय योजतो. तसेच आपले उर्वरित जीवन आणि पुढील जन्माला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करतो.
  असेच एक पर्व म्हणजे पितृपक्ष. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा काळ आत्मा आणि आत्मिक उन्नतीसाठी पुण्यकाळ आहे. ज्यात कमीत कमी प्रयत्नातून अधिकाधिक फळाची प्राप्ती केली जाऊ शकते. जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता होणे म्हणजे मोक्ष आणि आध्यात्म. तसेच आध्यात्म या काळाला आत्म्याचे कल्याण आणि मोक्षासाठी सर्वश्रेष्ठ काळ मानते.
  सामान्यपणे पितृपक्षाला श्राद्धाचा पंधरवडा म्हटले जाते. मात्र हा काळ केवळ मृत्यू पावलेल्या लोकांसाठी आहे, ही समजूत चुकीची आहे. श्राद्ध ही आपले अस्तित्व, आपल्या मुळाला ओळखून त्याच्याशी जोडून घेण्याच्या आणि त्याला सन्मान देण्याच्या एका सामाजिक प्रक्रियेचा भाग होती. ज्यात प्राणायाम, योग, व्रत, उपवास, यज्ञ आणि असहाय्य जनांची मदत करण्यासारख्या इतर कल्याणकारी, सकारात्मक कामांचा आणि उपक्रमांचा समावेश होता. कालांतराने पितृपक्षाने आध्यात्मिक आणि धार्मिक स्वरूप घेतले.
  श्रद्धया इदं श्राद्धम्‌। म्हणजेच आपल्या पूर्वजांची आत्मिक संतुष्टी, शांती आणि मृत्यूनंतरच्या त्यांच्या अनंत यात्रेसाठी पूर्ण श्रद्धेने अर्पित कामना, प्रार्थना, कर्म आणि प्रयत्नांना आपण श्राद्ध असे म्हणतो. या पक्षाला त्याच्या या गुणांमुळे पितरे आणि पूर्वजांशी संबंधित विधींशी जोडण्यात आले.
  पितृ पंधरवड्यात स्थूल कामांना महत्त्व देण्यात आलेले नाही. कारण आध्यात्मिक दृष्टिकोनातून समृद्धी आणि भौतिक यशाला क्षणभंगूर म्हणजेचा अल्पायुष्यी मानले जाते. म्हणूनच एवढ्या मौल्यवान काळाचा दुय्यम गोष्टींसाठी उपयोग करणे आध्यात्मानुसार योग्य मानले जात नाही. पण धन, ऐश्वर्याची कामना ठेवून महालक्ष्मीला प्रसन्न करणारी साधना या पक्षाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महालक्ष्मी आराधनेमध्ये या पक्षातील पहिल्या सप्ताहाचा उपयोग केला जातो. हा काळ भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीला सुरू होऊन कृष्ण पक्षातील अष्टमीपर्यंत चालतो. त्यामुळे पितृपक्ष हा केवळ मृत्यू पावलेल्या लोकांसाठी आहे, ही समजूत चुकीची ठरते.
  सदगुरु आनंद जौहरी

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.