Advertisement

शिटी वाजवून पठ्ठ्यानं उंचावलं भारताचं नाव!


शिटी वाजवून पठ्ठ्यानं उंचावलं भारताचं नाव!
SHARES

रस्त्यावरून जाताना कुठला मुलगा एखाद्या मुलीला पाहून शिटी वाजवत असेल तर ती मुलगी काय करेल? ती त्याला दोन-तीन शिव्या देईल. नाहीतर त्याच्या कानशिलात लावून त्याला चांगलीच अद्दल घडवेल. सामान्यपणे शिटी वाजवणं म्हणजे मवालीपणाचं दर्शन घडवण्यासारखं मानलं जातं. जर मुलगा शिटी वाजवत असेल, तर त्याचं वर्तन असभ्यपणाचं मानलं जातं. पण जपानमध्ये मात्र चक्क शिटी वाजवणं एक आर्ट आहे. अवाक झालात ना?

आता हे ऐकून तर तुम्हाला अजून धक्का बसेल की, जपानमध्ये शिटी वाजवण्याची स्पर्धा भरवली जाते. नुकतंच जगभरातील व्हिसलर्सचं 'वर्ल्ड व्हिसलर्स कन्व्हेन्शन २०१८' पार पडलं. या स्पर्धेत मुंबईच्या निखिल राणे या तरूणानं भारताला सलग दुसऱ्यांदा चॅम्पियनशिप मिळवून दिली आहे.


सायलेंट व्हिसलर

निखीलची शिटी वाजवण्याची पद्धत ही मूक अर्थात 'सायलेंट व्हिसल' आहे. शिटी वाजवण्यासाठी ओठांचा चंबू केला जातो. पण सायलेंट व्हिसलमध्ये ओठ न हलवता शिटी वाजवली जाते. जगात सायलेट व्हिसल वाजवणारे फक्त दोनच कलाकार आहेत. एक म्हणजे बॉस्टनचा जेफरी एमॉस आणि दुसरा मुंबईचा निखिल राणे

या वर्षी स्पर्धेत निखिलला हिकीफुकी या प्रकारात बक्षिस मिळवलं असून यात वाद्य वाजवत शिटी वाजवायची असते. यावेळी निखिलनं शोले चित्रपटातील 'मेहबूबा मेहबूबा' हे गाणं शिटीतून वाजवलं. यासोबतच त्यानं खंजिरी, पियानिका, दरबुका (अरेबिक वाद्य) आणि घुंगरु ही वाद्ये वाजवली. स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी म्हणजे जवळपास सहा ते सात महिने निखिल दुसरी कुठलीच कामं हाती घेत नाही. सर्व लक्ष तो फक्त स्पर्धेच्या तयारीवर केंद्रित करतो. आणि याचंच फळ त्याला मिळालं आहे. सलग दुसऱ्यांदा निखिलनं जपानमध्ये भारताचा झेंडा फडकावला आहे.



सात वर्षांचा असल्यापासून सुरुवात

मुंबई इथल्या ताडदेव परिसरात निखिल मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा झाला. वयाच्या सातव्या वर्षापासून निखिल सायलंट व्हिसल वाजवतो. निखिलला लहानपणापासून संगीताची प्रचंड आवड होती. त्यामुळे त्यानं शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. जवळपास पाच वर्ष त्याने शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. निखिल १२ वीला होता. तेव्हा त्यानं एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत पहिल्यांदाच शिटी वाजवत गाणं सादर केलं. तेव्हा सर्वांनी त्याची खूप प्रशंसा केली. त्यानंतर त्यानं त्याच्या शिटीला सुरांची साथ दिली. घरची परिस्थिती बेताची असल्यानं कॉलेजला शिकत असताना त्यानं अनेक ठिकाणी संगीताचे कार्यक्रम केले. या कार्यक्रमातून मिळालेल्या पैशावर निखिल स्वत:चा खर्च चालवत असे. निखिल सध्या आकाशवाणीमध्ये आरजे आहे. आकाशवाणीमध्ये काम आणि संगीताचे कार्यक्रम करता करता तो शिटी वाजवण्याचा सराव देखील नियमित करतो. 


माझातल्या कलागुणांना शाळेतील शिक्षकांनी, कुटुंबियांनी आणि मित्र-परिवाराने वाव दिला. कंठातून शिटी वाजवणं वाटतं तितकं सोपं नाही. माझ्या या प्रवासात मी स्वत:वर खूप काम केलं आहे. माझा कुणी गुरु नाही. त्यामुळे मीच यामध्ये वेगवेगळे प्रयोग करून पाहायचो. यासोबतच मी प्राणायामपासून ते धावण्यापर्यंत सर्व काही केलं आहे. प्राणायम करताना आणि धावताना मी श्वासागणिक शिटी सोडायचो. यामुळे माझी श्वास घेण्याची क्षमता अधिक वाढली.  

निखिल राणे, सायलंट व्हिसलर




दुसऱ्यांदा विजयी

दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१६ साली निखिलनं वर्ल्ड  व्हिसलर्स कन्व्हेन्शन मध्ये सहभाग घेतला होता. फक्त सहभागच घेतला नाही तर या स्पर्धेत निखिलनं विजयही मिळवला होता. विजयाची हीच परंपरा निखिलनं यंदाही कायम राखली. वर्ल्ड व्हिसलर्स कन्व्हेन्शन २०१८ मध्ये इस्त्राइल, कॅनडा, जपान, चीन, कोरीया, अमेरिका, स्पेन, ऑस्ट्रेलिया, व्हेनेझुएला या देशांचा सहभाग होताजवळपास ११ देशांमधून ६७ स्पर्धक सहभागी झाले होते. पण निखिलनं या स्पर्धेत बाजी मारत भारताचं नाव नक्कीच उंचावलं आहे.

जेव्हा निखिलनं या क्षेत्रात पुढे जायचं ठरवलं तेव्हा अनेकांनी त्याला विरोध केला. आरजे म्हणून काम करताना तू भलत्या वळणावर का वळतोय? असं बोलून त्याला अनेकदा हिणवलं. पण निखिलनं कधी इतरांचं बोलणं मनावर घेतलं नाही. दुसऱ्यांच्या बोलण्यावर लक्ष न देता स्वत:च्या पॅशनसाठी त्यानं प्रचंड मेहनत घेतली. सलग दोनदा जपानमध्ये भारताचा झेंडा उंचावल्यानंतरही त्याला अनेकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. खूप क्वचित लोकं असतील जे त्याला मदत करण्यासाठी पुढाकार घेतात. पण निखिल स्वत:च्या परीनं सर्व अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करतो.




कशी असते स्पर्धा?

'वर्ल्ड व्हिसलर्स कन्व्हेन्शन' या स्पर्धेची १९७२ सालापासून सुरुवात झाली. अॅलेंदे हार्ट या व्हिसलरनं या स्पर्धेला सुरुवात केली. या स्पर्धेला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. २०१६ मध्ये त्यांचे निधन झाले. पण त्यानंतरही ही स्पर्धा चालू ठेवण्यात आली. या स्पर्धेत शिटीवर वेगवेगळे म्युझिकल जॉनर ट्राय करायचे असतात. जगभरातून ऑडिशनला आलेल्यांपैकी नेमक्याच स्पर्धकांची निवड होते.

ही स्पर्धा तीन टप्प्यांत पार पडते. पहिल्या टप्प्यात कॅरियोके ट्रॅकच्या आधारे शिटी वाजवायची असते. दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला शिटी वाजवत डांस किंवा अॅक्ट करायचा असतो. निखिलनं देखील पहिल्यांदा या कॅटेगरित भाग घेतला होता. यावेळी निखिलनं वडील-मुलीचं नातं अॅक्ट करत शिटी वाजवली होती. तर तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला शिटी वाजवत वाद्य वाजवायचे असते. २०१६ मध्ये या कॅटेगरिची निर्मिती करण्यात आली होती. हिकीफुकी असं नाव त्यांनी या कॅटेगरीला दिलं. जपानी भाषेत हिकी म्हणजे वाद्य आणि फुकी म्हणजे शिटी असं आहे. याच तिसऱ्या टप्प्यात निखिलला विजेतेपद मिळालं.


व्हिसलर्ससाठी इन्स्टिट्युट स्थापणार

येत्या काळात निखिल एक इन्स्टिट्युशन काढण्याचा विचार करत आहे. निखिलला अनेक ठिकाणाहून कॉल येतात. अनेक तरुण मुलं त्याची ही कला शिकण्यासाठी इच्छुक आहेत. निखिल नुसार शिटी कुणीही वाजवू शकतं. फक्त तुम्हाला टेक्निक येणं गरजेचं आहे. जर ती टेक्निक शिकलं, की कंठातून शिटी वाजवणं कठीण नाही. निखिलचे काही परदेशी व्हिसलर्स देखील शिटी वाजवण्याचे टेक्निक या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवतील. त्यामुळे येत्या काळात भारतात देखील व्हिसलर्सची टीम तयार होईल. माझ्यानंतर माझी गादी चालवणारं कुणी तरी पाहिजे. हीच तरूण पिढी पुढे भारताचं नेतृत्व करेल. भारत कुठल्याच क्षेत्रात मागे नाही. मग या क्षेत्रात देखील भारतानं एक उंची गाठावी, अशी इच्छा निखिलनं व्यक्त केली.


हेही वाचा

डोंबिवलीचे 'सह्याजीराव' ९००० सह्यांचे धनी!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा