Advertisement

लहानपण दे गा देवा!


लहानपण दे गा देवा!
SHARES

उन्हाळी सुट्टी लागली रे लागली की आमचा एकच कल्लोळ सुरू व्हायचा. एरवी तर आमची मज्जा, धमाल असायचीच. पण उन्हाळी सुट्टी म्हटलं की, आमचा नुसता धांगडधिंगा असायचा. दिवसभर आपला खेळण्यात वेळ घालवायचो. भूक, तहान, झोप आणि घरदार विसरून नुसता खेळ, खेळ आणि खेळ मांडलेला असायचा.



सकाळी घरातून खेळायला बाहेर पडायचं. मग ऐकमेकांना आवाज देऊन मैदानात जमा करायचं. आई-बाबा बोलवायचे म्हणून काय ते जेवायला घरी जायचं. कारण खेळात ऐवढे बिझी असयचो की कसलंच भान रहायचं नाही. क्रिकेट, बिझनेस, लपाछुपी, लगोरी, छप्पी, घोटला दिवसभर हे खेळत धमाल चालायची. क्रिकेट खेळताना तर कित्येकांनी काचा फोडल्या असतील. एखाद्या काकूंनी आपली चांगलीच कान उघाडणी देखील केली असेल. आत्ताच्या पिढीपैकी प्रत्येकाच्या आठवणीत असलेलं हे बालपण असंच काहीसं असेल.

बालपण जीवनातील असा क्षण असतो, जो आपण कधीच विसरू शकत नाही. बालपणीच्या आठवणी या आयुष्यभर मनाच्या एका कोपऱ्यात श्वास घेत असतात. त्यापैकी एक म्हणजे बालपणी खेळायचो ते खेळ. आजही हे खेळ आठवले की तुमच्या चेहऱ्यावर हसू उमललं असेल. तुमच्या याच आठवणींना आम्ही पुन्हा एकदा उजाळा देत आहोत.


१) कंचे

कंचे हा तसा लोकप्रिय खेळ. जमिनीत गोल करून एका बोटानं, ज्याच्यावर राज्य आलं असेल, त्याच्या कंच्याला आपण कंचीनं मारायचं. तसंच रिंगण करून त्यात कंचे ठेवायचे. ज्या कंचीला मारायचं असेल, नेम धरून त्याच कंचीला उडवायचं. जो कंची उडवेल ती कंची त्याची होणार, असा हा खेळ. 


सौजन्य

पण खरं सांगायचं झालं तर कंचे असा खेळ आहे जो मला कधीच नीट खेळता आला नाही. त्यातलं काही कळायचंच नाही. त्यामुळे नंतर या खेळाकडे मी तरी पाठ फिरवली. पण माझे सवंगडी मात्र हा खेळ खूप खेळायचे.


२) विटी दांडू


सौजन्य


भारतातील जुना खेळ अशी याची ओळख आहे. याच खेळातून क्रिकेटचा जन्म झाला असं बोलतात. दांडूनं विटी कोलायची.


३) लगोरी

लगोरी तर सर्वांचाच आवडीचा खेळ असेल. आजही गल्लोगल्लीत हा खेळ खेळला जातो.


सौजन्य

या खेळात तुटलेले दगड, फरश्यांचे तुकडे यांचा वापर केला जातो. एकमेकांवर रचलेल्या फरश्यांवर तो चेंडू मारायचा. दूर गेलेला चेंडू प्रतिस्पर्धीनं धरून मारेपर्यंत पडलेल्या फरश्या एकमेकांवर रचाव्या लागतात.


४) आंधळी कोशिंबीर


आंधळी-कोशिंबीर या खेळात कोशिंबीर कुठून आणि कशी आली? याचे उत्तर माझ्याकडे सोडा, कुणाकडेच नसेल. यामध्ये एकाला डोळ्यांवर पट्टी बाधून तीन वेळा गोलाकार फिरवून बाकी प्रतिस्पर्धींना शोधायला सांगितलं जायचं. 


सौजन्य

शुक-शुक किंवा मग टाळ्यांचा आवाज करत ज्याच्यावर डाव आहे त्याला सतवलं जातं. पण समजा कुणी हाती लागलं, तर हा अंधार त्याच्या डोळ्यांपुढे!


५) लपंडाव

लपंडाव हा कायम संध्याकाळी खेळला जायचा. अंधारत गडी कुठे लपले आहेत हे कळायचंच नाही. मग त्यांना शोधण्यासाठी अाख्खा परिसर पिंजून काढायचा. लपंडावला दुसरं नावं म्हणजे लपाछुपी. राज्य आलेला गडी भिंतीकडे तोंड करून डोळे मिटून आकडे मोजणार आणि मोजून झाले की 'रेडी का'? असं विचारणार.


सौजन्य


'नो रेडी' असा आवाज आला, तर गडी अजून आकडे मोजणार. पण लपणारे देखील हुशार. एकमेकांचे शर्ट आणि टी-शर्ट बदलून लपायचे. बिचाऱ्या गडीनं कपड्यावरून चुकीचं नाव घेतलं की मग अंडं. नाहीतर सगळे मिळून त्याला धप्पा द्यायला टपलेलेच असायचे.


६) छप्पी


सौजन्य


छप्पी तर कुणीच विसरू शकत नाही. चौकटींमध्ये छप्पी टाकायची आणि लंगडी करून उड्या मारत चौकोन पार करायचे. आजही रस्त्यावर कुठे चौकोन दिसले की आपण लंगडी करून उड्या मारायला लागतो.


७) आबादुबी

आबादुबी म्हणजेच चेंडूची मारामारी. प्लास्टिक चेंडूनं खेळताना मजा यायची. पण प्लास्टिकचा चेंडू जोरात शेकायचा. म्हणून आम्ही कापडी बॉलनं देखील खेळायचो. या खेळात चेंडू एकमेकांना मारला जातो.

अजूनही कित्येक जण हे खेळ आठवून जुन्या आठवणीत रमले असतील. पण हे खेळ पुन्हा खेळावेसे वाटले म्हणून तुम्ही खेळाल का? मी तर नक्कीच खेळीन. खेळीन म्हणण्यापेक्षा मी अजूनही खेळते. तेवढंच काय ते बालपण अजून माझ्यात जिवंत आहे!



हेही वाचा

'या' फोटोंना बघून नक्कीच जुने दिवस आठवतील!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा