Advertisement

'एबी आणि सीडी' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित, अमिताभ यांचा पहिला मराठी चित्रपट

आजोबा आणि नातवंड यांच्यामधील नातं हे फारच हलकंफुलकं. हेच हलकंफुलकं नातं पाहायला मिळेल अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले यांच्या 'एबी आणि सीडी' चित्रपटात.

'एबी आणि सीडी' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित, अमिताभ यांचा पहिला मराठी चित्रपट
SHARES

बॉलिवूड शहनशहा अमिताभ बच्चन जर तुमच्या आजोबांचे वर्गमित्र असतील तर? तुमचा आनंद गगनात मावेनासा होईल. तुम्ही अगदी तुमच्या मित्र-मैत्रिणींसमोर शायनिंग मारायला मोकळे आणि तुमचे आई-बाबा सर्व नातेवाईक, मित्रपरिवार आणि शेजारी-पाजारी यांच्याकडे बोंबाटा करून झालेच असतील. एकदा काय ही बातमी पसरली की, तुमच्या आजोबांचा रुबाबच बदलेल. नाही का? सगळे आजोबांना त्यांच्या लहानपणीच्या आठवणी विचारतील. कुटुंबियांसाठी नेहमीच दुर्लक्षित असणारे आजोबा अचानक सेंटर ऑफ अॅटरॅक्शन होतील. असंच काहीसं घडलंय ‘एबी आणि सीडी’ या चित्रपटातील ‘चंद्रकांत देशपांडे’ यांच्या बाबतीत.

जसजसं म्हातारपण येतं तसतसं घरातल्यांना म्हातारे व्यक्ती या अडचण वाटू लागतात. त्यांच्याकडे फार लक्ष दिलं जात नाही. अशा परिस्थितीत खंबीर आधार बनतात त्यांची नातवंड. आजी-आजोबा आणि नातवंड यांच्यामधील नातं हे फारच हलकंफुलकं असतं. असंच नातं विक्रम गोखले, अक्षय टंकसाळे, साक्षी सतिश यांच्यात पाहायला मिळणार आहे. आजोबा-नातवंडांचं हे प्रेमळ नातं ‘एबी आणि सीडी’ मध्ये पाहायला मिळेल.

एबी आणि सीडी’च्या पोस्टरनंतर आता या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात विक्रम गोखले चंद्रकांत देशपांडे यांची व्यक्तीरेखा साकारत आहेत. उतार वयात कुटुंबातल्या सदस्यांकडून चंद्रकांत देशपांडे यांना मिळणारी वागणूक टिझरमधून दाखवण्यात आली आहे. मुलगा आणि सुनेकडून कशीही वागणूक मिळत असली तरी नातवंडांचं मात्र आजोबांवर खूप प्रेम असतं. अचानक चंद्रकांत यांना वर्गमित्राचं पत्र येत आणि हा वर्गमित्र दुसरे तिसरे कुणी नाही तर अमिताभ बच्चन असतात. आपल्या आजोबांना अमिताभ बच्चन यांचं पत्र आल्याचं कुटुंबियांना कळताच एकच गोंढळ उडतो. कुटुंबातील सदस्यांचा आजोबांप्रती वागण्यात बदल येतो

आजोबांना अमिताभजींकडून आलेलं पत्रं, तसंच त्यांच्याकडून सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आलेला होकार, पण नंतर चंद्रकांत देशपांडे यांनी स्वत: ‘आज अमिताभ बच्चन सोहळ्याला येणार नाही’ हे केलेले वक्तव्य आणि अमिताभजींच्या दमदार आवाजातील ‘चंदू मी आलोय’ हा डायलॉग’.... या सर्व गोष्टी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या आहेत.

अक्षय विलास बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर मिलिंद लेले यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे. ‘एबी आणि सीडी’ मध्ये अमिताभजी बच्चन, विक्रम गोखले यांच्यासह सुबोध भावे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, साक्षी सतिश, शर्वरी लोहोकरे, नीना कुळकर्णी, लोकेश गुप्ते, सीमा देशमुख, सागर तळाशीकर यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.



हेही वाचा

अनटचेबल, एकता कपूरनं वाटली केळी, पण...

जयललिता यांच्या जयंतिनिमित्त 'थलायवी'चा पोस्टर प्रदर्शित

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा