क्रिकेट आणि चित्रपटांचं एक अतूट नातं आहे. त्यामुळंच बऱ्याच क्रिकेटर्सना रुपेरी पडद्यावर झळकण्याचा मोह होतो, तर सिनेसृष्टीतील अभिनेत्री क्रिकेटर्सच्या प्रेमात पडतात. आता माजी क्रिकेटपटू अजित वाडेकरही रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत.
आजवर बऱ्याच क्रिकेटपटूंनी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. यात संदिप पाटील, सलील अंकोला, अजय जाडेजा आदी क्रिकेटपटूंचा प्रामुख्यानं समावेश आहे. आता यशस्वी कर्णधार, दर्जेदार प्रशिक्षक आणि उत्तम संघटक अशी ज्येष्ठ क्रिकेटपटू अशी ख्याती असलेले अजित वाडेकरांचीही रुपेरी पडद्यावर एंट्री झाली आहे. निवृत्तीनंतरही त्यांचे क्रिकेटशी नाते तुटलेलं नाही. चित्रपटाच्या माध्यमातूनही आपलं क्रिकेटप्रेम जपत 'बाळा' या आगामी मराठी चित्रपटात त्यांनी विशेष भूमिका साकारली आहे.
३ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'बाळा' चित्रपटात वाडेकर क्रिकेट प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. युवा खेळाडूंच्या गुणवत्तेची अचूक पारख वाडेकरांना आहे. कोणामध्ये किती क्षमता आहे? हे त्यांना बरोबर माहित असे. 'बाळा' चित्रपटातल्या बाळा या मुलाच्या क्रिकेट ध्यासाची ते कशी दखल घेतात आणि त्याच्या गुणांची पारख करत त्याला कशाप्रकारे घडवतात याची प्रेरणादायी कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
'बाळा'मध्ये भूमिका साकारण्याबद्दल विचारणा केल्यानंतर 'मला अभिनय जमणार नाही!', असं सांगणाऱ्या अजित वाडेकर यांना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी 'तुला अभिनय नाही, तर तुझ्या आवडीची प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळायची आहे', असं सांगितल्यानंतर गोखलेंच्या विनंतीला मान देत अजित वाडेकर यांनी या चित्रपटाला होकार दिला. सचिंद्र शर्मा यांनी या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन केलं आहे.
या चित्रपटात उपेंद्र लिमये, क्रांती रेडकर, विक्रम गोखले, सुहासिनी मुळ्ये, कमलेश सावंत या मातब्बर कलाकारांसोबत मिहीरीश जोशी हा नवा चेहरा तसेच यशवर्धन–राजवर्धन, आशिष गोखले, ज्योती तायडे अपेक्षा देशमुख, हिया सिंग हे सहकलाकार दिसणार आहेत. सोनू निगम, आदर्श शिंदे, रोहित राऊत, निहार शेंबेकर, उर्मिला धनगर या गायकांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. विजय गमरे यांनी लिहिलेल्या गीतांना महेश-राकेश यांनी संगीत दिलं आहे.
हेही वाचा -
सावरलेल्या प्रेमाची गोष्ट सांगणार ‘पेठ’
ऋतिक पुन्हा करतोय बाॅडी ट्रान्सफॉर्मेशन! व्हिडीओ पहा