Advertisement

गणेशोत्सव २०१९: बाप्पाही घेतात कलाकारांच्या घरचा पाहुणचार

भाद्रपद शुद्ध चतुर्थी आले की 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात महाराष्ट्राच्या घराघरात विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन होतं. रुपेरी पडद्यावरील ग्लॅमरस ताऱ्यांच्या घरीही श्री गजानन विराजमान होतात. या श्रीगणेशाची हौस-मौज काही औरच असते.

गणेशोत्सव २०१९: बाप्पाही घेतात कलाकारांच्या घरचा पाहुणचार
SHARES

भाद्रपद शुद्ध चतुर्थी आले की 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात महाराष्ट्राच्या घराघरात विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन होतं. रुपेरी पडद्यावरील ग्लॅमरस ताऱ्यांच्या घरीही श्री गजानन विराजमान होतात. या श्रीगणेशाची हौस-मौज काही औरच असते.

कलाकारांच्या घरचा गणपती म्हटला की, सर्वसाधारणपणे आपल्याला आघाडीच्या चार-पाच कलाकारांच्या घरच्या गणपतींची आठवण होते. यात आघाडीवर आहेत ते नाना पाटेकर. नानांच्या घरातील गणपतीचा थाट काही वेगळाच असतो. अभिनयासोबतच महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या कुटुंबांना हातभार लावण्यात अग्रस्थानी असणाऱ्या नानांसोबतच स्वप्नील जोशी, मोहन जोशी आणि मंगेशकर कुटुंबियांच्या घरचे गणपती रसिकांमध्ये चांगलेच पॅाप्युलर आहेत. किंबहुना दरवर्षी टेलिव्हीजनच्या माध्यमातून ते रसिकांना दर्शनही देत असतात, पण याखेरीजही गणपती बाप्पा दरवर्षी इतरही बऱ्याच कलाकारांच्या घरचा पाहुणचार घेतात.

स्वप्नील जोशीच्या घरातील गणपती केवळ दीड दिवसांचा असतो. मूळचा गिरगावकर असलेला स्वप्नील आता कांदिवली येथील आपल्या घरात बाप्पांची सेवा करतो. दीड दिवस बाप्पांची यथेच्छ सेवा केल्यानंतर स्वप्नील त्यांना निरोप देतो. या दरम्यान कलाकार-पाहुण्यांसोबतच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचीही स्वप्नीच्या घरी रेलचेल असते. भारतीय संगीत क्षेत्राची शान मानल्या जाणाऱ्या मंगेशकर कुटुंबियांच्या घरातील सुरेल गणेशाची बातच काही न्यारी असते. भारतरत्न लतादीदी मंगेशकरांच्या हातचे मोदक खाल्लेल्या या बाप्पाची सेवा करण्याचा वसा आता राधा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर या नव्या पिढीने पुढे सुरू ठेवला आहे. पं. हृदयनाथ मंगेशकर, मीना खडीकर आणि उषा मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवाचं विधीवत पूजन करण्यात येतं. या घरात विराजमान होणाऱ्या गणपतीची सेवा म्हणजे जणू सुरेल सांगितीक मैफलच ठरते.

मराठीसोबतच हिंदीतही लोकप्रिय असणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या घरातील गणपतीची शान काही वेगळीच आहे. सिनेसृष्टीत 'मोजो' म्हणून ओळखले जाणारे मोहन जोशी शाडू मातीची मूर्ती आणत नाहीत. अंधेरी येथील आपल्या घरी ते इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करतात. त्यांच्या घरी श्रीगणेशाची चांदीची मूर्ती आहे. मूर्तीकाराकडून मातीची गणेशमूर्ती आणण्यापेक्षा ते त्याच चांदीच्या गणपतीची मखरात बसवून मनोभावे पूजा करतात. जयवंत वाडकर यांच्या घरचा गणपती त्यांच्याप्रमाणेच काहीसा हरहुन्नरी असतो असं म्हणायला हरकत नाही. मराठी सिनेसृष्टीत 'वाड्या' अशी ओळख असणाऱ्या जयवंत वाडकर यांचा मित्र परीवार खूप दांडगा आहे. त्यामुळं त्यांच्या चीराबाझार येथील घरी लहान-मोठ्या कलाकारांसोबतच इतरही पाहुणे मंडळी दर्शनासाठी गर्दी करतात. वाडकरांच्या घरी बालगणेश आणि पार्वतीमातेची मूर्ती आणण्याची परंपरा आहे.

अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, गीतकार अशी चतुरस्र कामगिरी करत अबालवृद्धांना वेड लावणाऱ्या चिन्मय मांडलेकरच्या घरचा गणपती निसर्गप्रेमी आहे. चिन्मयच्या पत्नीच्या निसर्गाची आवड असल्यानं ती त्यातूनच गणेशाचं अप्रतिम मखर बनवते आणि त्याच अनोख्या मखरात ठाण्यातील मांडलेकरांच्या घरी श्री गजानन विराजमान होतात. निर्माता-दिग्दर्शक रवी जाधव आणि त्याची पत्नी मेघना दोघेही कलाप्रेमी आहेत. त्यामुळं त्यांच्या घरातील गणपती केवळ कलाप्रेमीच नाही, तर 'फॅमिली गणेश' आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण रवीच्या घरी दरवर्षी शाडूच्या मातीपासून स्वत: गणपती बनवण्याची परंपरा आहे. रवी, मेघनासह त्यांची दोन मुलंही आपापल्या परीनं गणेशाची मूर्ती बनवतात. त्या चार मूर्तींपैकी सर्वात सुंदर मूर्तीची पूजा केली जाते. इतर तीन मूर्त्या शोकेसमध्ये ठेवल्या जातात. यामुळंच रवीच्या घरी  'फॅमिली गणेश' अवतरतो असं म्हटलं जातं.

मराठी सिनेसृष्टीत 'यूजे' अशी ओळख असलेल्या कोरिओग्राफर उमेश जाधवच्या घरच्या गणपतीचा थाट काही औरच असतो. युजेच्या अनोख्या शैलीप्रमाणं त्याच्या गणपतीची स्टाईलही काहीशी हटके असते. दागिन्यांनी मढवलेली गणेशमूर्ती या घरात विराजमान होते. डेकोरेशन खूप वेगळं असतंच, पण या घरातील आरती स्पेशल असते. उमेशच्या घरी १० दिवस १० कोरिओग्राफर्स वेगवेगळ्या शैलीत गौरीनंदनाची आरतीच्या माध्यमातून सेवा करतात. अभिनेत्री समीधा गुरूच्या घरी गणेशोत्सवात श्रीगणेशयाग करण्याची प्रथा आहे. शर्मिष्ठा राऊतच्या काकांच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. गेल्या वर्षी शर्मिष्ठा बिग बॅासमध्ये सहभागी झाली होती. त्यामुळं त्यांनी बिग बॅासच्या घराचाच सेट गणेशाच्या मखरासाठी उभारला होता.

शाहिर साबळेंचा नातू आणि दिग्दर्शक केदार शिंदेच्या पवई येथील घरी शिल्पा शेट्टीप्रमाणे दरवर्षी लालबागच्या राजाचीच प्रतिमूर्ती आणण्याची परंपरा आहे. अशोक शिंदेही आपल्या मालाडच्या घरी मोठ्या प्रेमानं गणरायाचं विधीवत पूजन करतात. मराठी सिनेसृष्टीतील चिरतरुण अभिनेता अशी ओळख असणाऱ्या शिंदेंकडे गणराय दीड दिवस मुक्कामी असतात. राम मराठे यांची नात असलेल्या अभिनेत्री प्रिया मराठेच्या ठाणे येथील घरी पारंपारीक पद्धतीनं वक्रतुंडाची सेवा करण्याचा वारसा आहे. 'फुलपाखरू' मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी आणि 'दादा, एक गुड न्यूज आहे' या सध्या गाजत असलेल्या नाटकात उमेश कामतच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणाऱ्या ऋता दुर्गुळेच्या काकांच्या घरी गणेश पूजन करण्याची परंपरा आहे.

मराठी बिग बॅासच्या पहिल्या पर्वाची विजेती ठरलेल्या मेघा धाडेच्या गोरेगाव येथील घरी १० दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो. इकोफ्रेंडली गणेशमूर्ती हे मेघाच्या घरच्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य आहे. गायक स्वप्नील बांदोडकरच्या काकांच्या माहिम येथील घरी गणरायाचं आगमन होतं. गायिका डॅा. नेहा राजपाल आपल्या पवई येथील घरी सूरांच्या माध्यमातून श्रीगणेशाची सेवा करते. दिग्दर्शक विजू मानेच्या ठाणे येथील घरच्या गणपतीचा थाट काही न्याराच असतो. ठाण्यातील राजकीय क्षेत्रातील मंडळींसोबत कलाकारही या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी मानेंच्या घरची वाट धरतात. कलाकारांच्या घरच्या गणपतींचा थाट हा खरोखर न्याराच असतो. त्याला ग्लॅमरची जोड लाभल्यानं या गणेशाचं आकर्षण आणखी वाढतं.

'सेक्रेड गेम्स' या वेबसिरीजमुळं मराठीसोबत सध्या हिंदीतही चांगलीच चर्चेत असलेली स्मिता तांबेच्या घरी ट्री गणेशाचं आगमन होतं. स्मिताचे पतीच मूर्ती बनवतात आणि रंगवतातही. स्मिता ती मूर्ती वस्त्रालंकारांनी सजवते. या मूर्तीत झाडांच्या बिया टाकलेल्या असतात. या गणेशाचं घरीच विसर्जन केल्यावर त्या बियांना अंकूर फुटतात आणि बाप्पाचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी कायम राहतो असा विश्वास स्मिताला वाटतो.हेही वाचा -

गणेशोत्सव २०१९: तेजुकायाची कागदी लगद्याची गणेशमूर्ती, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार नोंद

गणेशोत्सव २०१९: 'चिंचपोकळीचा चिंतामणी'च्या देखाव्यात यंदा ७५ फुटी शिवलिंग
संबंधित विषय
Advertisement