Advertisement

NEET-JEE परीक्षेच्या विद्यार्थ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करू द्या, गृहमंत्र्यांकडे मागणी

जेईई आणि नीट परीक्षेसाठी जाणाऱ्या मुंबई महानगर प्रदेशातील विद्यार्थ्यांना मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करू द्या, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

NEET-JEE परीक्षेच्या विद्यार्थ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करू द्या, गृहमंत्र्यांकडे मागणी
SHARES

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET UG) आणि राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षे (JEE Main)साठी जाणाऱ्या मुंबई महानगर प्रदेशा (MMR)तील विद्यार्थ्यांना मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करू द्या, अशी मागणी करणारं पत्र महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवलं आहे. (allow students to travel in mumbai local train for neet and jee exam demands maharashtra opposition leader devendra fadnavis to home ministry)

परीक्षेसाठी महाराष्ट्रातील २.२ लाख विद्यार्थी सहभागी झाले असून मुंबई महानगर प्रदेशातील ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. 

आपल्या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलं आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार देशभरात नीट आणि जेईई परीक्षा होणार आहेत. कोरोनामुळे मुंबईत लाॅकडाऊन सुरू आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुंबईतील लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी येणं-जाणं सोयीस्कर व्हावं, म्हणून विद्यार्थ्यांचं हाॅल तिकीटच त्यांचा रेल्वे पास समजून त्यांना उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्यास मंजुरी द्यावी. त्यासंबंधी रेल्वे मंत्रालयाने आदेश काढावेत. 

हेही वाचा - NEET-JEE परीक्षा नकोच! महाराष्ट्रासह ६ राज्यांची सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका

मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करायला मिळाल्यास विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून यासंबंधीचा निर्णय शक्य तितक्या लवकर घेण्यात यावा, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने १७ आॅगस्ट रोजी काही विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळून लावत वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक NEET आणि आयआयटी प्रवेशासाठी आवश्यक JEE परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होतील हे स्पष्ट केलं होतं. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) देखील या परीक्षा ठरलेल्या वेळेवरच होतील, असं स्पष्ट केलं. त्यामुळे जेईई परीक्षा १ ते ६ सप्टेंबर तर नीटची परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. 

दरम्यान या परीक्षांच्या आयोजनाला स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्रासह ६ राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या आधीची याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबतच्या सुरक्षेची तसंच विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्यासाठी जाताना प्रवासात येणाऱ्या अडचणींची दखल घेतली नसल्याचं पुनर्विचार याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.

आता केंद्रीय गृह तसंच रेल्वे मंत्रालय या परीक्षांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देईल का? याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा