Worli
  शिवसेनेचा बिन चपलांचा नगरसेवक!

  शिवसेनेचा बिन चपलांचा नगरसेवक!

  Share
  Now
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले वरळीतील शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांना आता नगरसेवक बनण्याचा मान मिळणार आहे. भोसले यांच्याबरोबर विद्यमान सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव याही शिवसेनेच्या नामनिर्देशित सदस्य म्हणून सभागृहात येणार असल्याचे शिवसेनेच्या गोटातून समजते.

  महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाचे संख्याबळानुसार प्रत्येकी दोन सदस्य आणि काँग्रेसचा एक नामनिर्देशित सदस्य येणार आहे. शिवसेनेने या वेळी नव्या महापालिकेत पराभूत नगरसेवक आणि एक नाराज इच्छुक उमेदवार यांची वर्णी लावण्याचा निर्णय घेतला असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. त्यानुसार शिवसेना प्रवक्ते अरविंद भोसले आणि तृष्णा विश्वासराव यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते. 

  अरविंद भोसले हे वरळीतून इच्छुक होते. पण, तिथे चेंबूरकर यांना उमेदवारी दिली आणि ते निवडूनही आले. चेंबूरकर यांचा प्रचार करावा लागेल म्हणून भोसले हे फक्त पक्षाच्या प्रमुख जाहीर सभांनाच उपस्थित राहत असत. परंतु तरीही चेंबूरकर आणि किशोरी पेडणेकर यांनी या विभागात 16 पैकी 13 नगरसेवक निवडून आणले. नारायण राणे यांचा पराभव होईपर्यंत पायात चपला घालणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी राणेंच्या पराभवानंतर पायात चप्पल घातली. पण, नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या प्रचार शुभारंभ सभेत त्यांनी निवडणूक होईपर्यंत पुन्हा चपलांचा त्याग केला. पण याची कोणतीही दखल पक्षाने न घेतल्यामुळे त्यांनी पुन्हा मुकाट पायात चपला चढवल्या.

  महापालिका सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांचा केवळ 127 मतांनी निसटता पराभव झाला आहे. त्यामुळे विश्वासराव यांचीही स्वीकृत सदस्य म्हणून वर्णी लागणार आहे. काँग्रेसकडून दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष सुनील नरसाळे यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून भाजपाने आपली दोन नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत. त्यामुळे येत्या 8 मार्चला महापौरांना दिलेल्या सीलबंद पाकिटात कोणाचे नाव जाहीर होते याविषयी उत्सुकता आहे.

  Share
  Now
  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.