गोरेगाव - नोटाबंदीनंतर नव्या नोटांचा प्रचंड तुटवडा असताना देशभरातील विविध कारवायांमध्ये आतापर्यंत तब्बल 34 कोटींची रक्कम नव्या चलनी नोटांच्या स्वरुपात जप्त करण्यात आलीय. नव्या नोटांच्या तुटवड्यामुळे बँका आणि एटीएममधून पैसे काढण्यावर मर्यादा असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्या चलनी नोटा त्यांना कुठून मिळाल्या याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी केलीय. तसंच कारवाई झालेले बरेच जण हे भाजपाशी संबंधीत आहेत. त्यामुळे भाजपानं त्यावर खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
सर्वसामान्यांचे पैसे बँकेत असूनही त्यांना पैसे मिळणे कठीण झाले आहे. तसंच छोटेमोठे व्यापार ठप्प झाले आहेत. बाजारपेठेत मंदीचं वातावरण आहे. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे मात्र काहींकडे कोट्यवधी रुपये नव्या नोटांच्या स्वरुपात सापडत आहेत. असं असताना भाजपा सरकार गप्प का? असा सवाल आझमी यांनी केला