Advertisement

आझादच्या नजरकैदेचे ४८ तास, सभेसाठी न्यायालयात धाव


आझादच्या नजरकैदेचे ४८ तास, सभेसाठी न्यायालयात धाव
SHARES

भीम आर्मीचे संस्थेचे संस्थापक चंद्रशेखर आझाद हे गेल्या ४८ तासांहूनही अधिक काळ पोलिसांच्या नजरकैदेत आहेत. त्यांची मुंबईतील सभा रद्द झालीच आहे. पण आता पुण्याची सभाही गुंडाळावी लागल्याचं चित्र आहे. असं असलं तरी आझाद आणि भीम आर्मीनं हार मानली नसून त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवला आहे. मुंबई उच्च न्यायालयात न्या. सी. वी. भगंड यांच्या खंडपीठाकडे भीम आर्मीकडून दुपारी एकच्या दरम्यान याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. नितीन सातपुते यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. या याचिकेनुसार आझाद यांची नजरकैदेतून त्वरीत मुक्तता करत त्यांना पुण्यास जाण्यास तसंच तिथं सभा घेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आल्याचंही सातपुते यांनी सांगितलं आहे.


हाॅटेल मनालीत नजरकैदे

१ जानेवारी शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आझाद यांना बंद सभागृहात सभा घेण्यास सांगत पोलिसांनी सांगितलं होतं. पण आझाद आणि भीम आर्मी वरळी, जांबोरीच्या सभेवर ठाम होते. त्यामुळं शुक्रवारपासून आझाद मालाडच्या हाॅटेल मनाली इथं पोलिसांच्या नजरकैदेत आहेत. तर त्यांना नजरकैद दिल्यानं भीम आर्मीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबईसह राज्याच्या अन्य ठिकाणी त्यांच्या सुटकेची मागणी करत आंदोलनं केली जात आहेत. तर दुसरीकडे मुंबईतून ४०० हून अधिक भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.


पुण्याला जाण्यास मनाई

या कार्यकर्त्यांची बोरीवली न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी सकाळी मुक्तता करण्यात आली. त्यांना २ जानेवारीपर्यंत पुण्यास जाण्यास मनाई करण्यात आली असून रोज सकाळी ८ वाजता पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. असं असलं तरी कार्यकर्ते अजूनही आक्रमक असून ते पुण्याला जाण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.आझाद यांनीही उत्तर प्रदेशला जाण्यास स्पष्ट नकार देत या दडपशाहीचं उत्तर भाजपाला २०१९ मध्ये देऊ, असा इशारा दिला आहे.


याचिकेकडे लक्ष

पुण्यास जाण्यास आणि सभा घेण्यास परवानगी मिळावी यासाठी भीम आर्मीनं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानुसार यासाठी याचिका दाखल केली असून दुपारी ३ वाजता या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता असल्याची माहिती अॅड. सातपुते यांनी दिली आहे. त्यामुळे आता सर्वांचंच लक्ष या याचिकेच्या सुनावणीकडे लागलं आहे.



हेही वाचा-

भीम आर्मीचे आझाद यांच्या मुंबईसह राज्यातील सभांना परवानगी नाकारली

भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांची धरपकड



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा