Advertisement

गृहमंत्री गाढ झोपेत आहेत, भाजपचा निशाणा

विकृत बुद्धीचा शर्जील उस्मानी शिवरायांच्या महाराष्ट्रात येऊन हिंदू समाजाविरुद्ध गरळ ओकतो. मात्र दुर्दैवाने गृहखातं त्याच्यावर कसलीही कारवाई करत नाही, कारण आपले गृहमंत्री अनिल देशमुख गाढ झोपेत आहेत.

गृहमंत्री गाढ झोपेत आहेत, भाजपचा निशाणा
SHARES

राज्यात राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालं आहे. राजकीय व्यक्तींकडून गुन्हे घडूनही गृहमंत्री त्यांच्यावर कुठलीही कारवाई करत नाहीत. गुन्हेवारी वाढत चालली आहे. त्याकडे गृहमंत्र्यांचं लक्ष नाही, अशा शब्दांत भाजपने (bjp) गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे.

एका तरुणीला भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळलं जातं, या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू होतो. घटनेला एक वर्ष पूर्ण झालं, मात्र अजूनही दोषीवर कठोर कारवाई करण्यात आली नाही. गृहमंत्री अनिल देशमुख तिला न्याय कधी मिळणार, हे एकदाचं जाहीर करावं. 

महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीत निर्दोष साधूंची १०० जणांच्या जमावाकडून निर्घृण हत्या होते, मात्र त्यावर एक शब्दही आपले गृहमंत्री अनिल देशमुख काढत नाहीत, कारवाई तर दूरच. मारेकरी अजूनही मोकाट फिरताहेत, हीच शोकांतिका ! 

मंत्री संजय राठोड पूजा चव्हाण या तरुणीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करतो, त्याचा फक्त राजीनामा घेतला जातो, मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे... मग या सर्व प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख तुम्ही काय केलं? तुमचं कर्तव्य विसरलात की आठवण करून द्यावं लागेल?

विकृत बुद्धीचा शर्जील उस्मानी शिवरायांच्या महाराष्ट्रात येऊन हिंदू समाजाविरुद्ध गरळ ओकतो. मात्र दुर्दैवाने गृहखातं त्याच्यावर कसलीही कारवाई करत नाही, कारण आपले गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) गाढ झोपेत आहेत. 

हेही वाचा- भाजप महाराष्ट्र पोलिसांचा अपमान करतंय, नाना पटोलेंचा आरोप

सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचा युवा प्रदेशाध्यक्ष महिलेवर बलात्कार करून सुद्धा मोकाट फिरत आहे, मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तो स्वतःच्या पक्षाचा असल्यामुळे कसलीही कारवाई केली नाही. हे असंच सुरू राहिलं तर आपल्या माता-भगिनी कशा सुरक्षित राहतील?

रात्रंदिवस मेहनत करून पोलीसांत भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या मुलांच्या वाट्याला निराशाच... पोलीस भरतीबाबत कसलीही घोषणा नाही, मुलांच्या भविष्याशी खेळ चालला आहे. गृहमंत्रीसाहेब, तुमच्या बेजबाबदारपणामुळे या मेहनत करणाऱ्या मुलांनी जीव द्यावा का? असे अनेक प्रश्न विचारत भाजपने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सोबतच, सचिन वाझेचं प्रकरण फार गंभीर आहे. मात्र याचे गांभीर्य लक्षात न घेता वाझेला मोकाट सूट देणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा. मुंबई पोलिसांचा (mumbai police) कसलाही तपास नाही. मुळात ठाकरे सरकारच्या ताटाखालचं मांजर होणाऱ्यांकडून जनतेच्या सुरक्षेची अपेक्षा करणंच चूक! वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांचा हात आहे आणि त्यांच्यावर गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त आहे. नाहीतर एक साधा API एवढं धाडस करूच शकत नाही, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.

(bjp demands resignation of maharashtra home minister anil deshmukh)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा