Advertisement

तीनचाकी रिक्षा कुठं न्यायची, हे मागे बसलेलाच ठरवतो - देवेंद्र फडणवीस

रिक्षा कुठं न्यायची हे चालक नाही, तर मागे बसलेली सवारी ठरवते, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

तीनचाकी रिक्षा कुठं न्यायची, हे मागे बसलेलाच ठरवतो - देवेंद्र फडणवीस
SHARES

विरोधक महाविकास आघाडी सरकारला तीनचाकी रिक्षा म्हणून हिणवत असले, तरी माझ्या दृष्टीने ही तिन्ही चाकं एकाच दिशेने धावत आहेत, हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. शिवाय या रिक्षाचं स्टिअरिंगही माझ्या हातात आहे, तेव्हा चिंता करण्याचं कारण नाही. असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. या वक्तव्यावर टीका करताना स्टिअरिंग भलेही उद्धव ठाकरेंच्या हाती असो, ही रिक्षा कुठं न्यायची हे चालक नाही, तर मागे बसलेली सवारी ठरवते, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. भाजपच्या प्रदेश पदाधिकारी बैठकीत भाषण करताना फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं. (bjp leader devendra fadnavis criticises cm uddhav thackeray and mva government)

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांनी दीर्घ मुलाखत घेतली. या मुलाखतीत राऊत यांनी महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असं तीनचाकी (रिक्षा) सरकार असल्याची टीका सातत्याने विरोधाकांकडून होत असते, यावर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला. 

हेही वाचा- ‘त्यांची’ तर रेल्वेगाडी, मुख्यमंत्र्यांचा एनडीएला टोला

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, भलेही विरोधकांकडून सरकारला तीनचाकी रिक्षा असं उपरोधाने म्हटलं जात असलं, तरी ही तिन्ही चाकं एका दिशेने चालत असल्याचं माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं आहे. बुलेट ट्रेन की रिक्षा असा प्रश्न मला विचारलात तर मी रिक्षाच सांगेन. कारण आपलं सरकार हे गोरगरीब जनतेचं सरकार आहे. ज्याचं स्टिअरिंग माझ्या हाती आहे. त्यामुळे माझा पाठिंबा हा रिक्षालाच असेल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

मागे एकदा मी एनडीएच्या बैठकीत गेलो होतो तेव्हा तिथं ३० ते ३५ घटक पक्षांचे प्रमुख उपस्थित होते. शिवाय विविध राज्यांमध्ये त्यांना अपक्षांचीही आहेच. याचाच अर्थ आपलं सरकार जर तीन चाकी रिक्षा असेल तर एनडीए ही तर रेल्वे गाडी आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी मारला होता. शिवाय मुलाखत सुरू असताना सरकार पाडून दाखवा असं आव्हान देखील दिलं होतं. 

त्यावर सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. आम्ही कोरोनाची लढाई लढणार आहोत. पण रोज ओरडता काय, किमान सरकार चालवून तर दाखवा, असं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना म्हणाले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक फोटो ट्विटअर हँडलवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एका गाडीत बसले असून गाडीचं स्टिअरिंग उपमुख्यमंत्र्यांच्या हाती आहे. यावरूनही बरीच चर्चा रंगली होती.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा