Advertisement

“कोरोनाशी लढायचं होतं, कंगनाशी नाही”

सरकार विसरलं की कोरोनाशी लढायचं होतं कंगनाशी नाही, असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारला टोला हाणला आहे.

“कोरोनाशी लढायचं होतं, कंगनाशी नाही”
SHARES

एका बाजूला महाराष्ट्रातील दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर येत असताना कोरोनाचा विळखा देखील अधिकच घट्ट होऊ लागला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढू लागली आहे. त्यातच कंगना रणौत प्रकरणाने राज्यातील सर्वांचंच लक्ष वेधून घेतल्याने विरोधकांनी यावरून राज्य सरकारला कोंडीत पकडायचं ठरवलं आहे. सरकार विसरलं की कोरोनाशी लढायचं होतं कंगनाशी नाही, असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारला टोला हाणला आहे. (bjp leader nilesh rane slams shiv sena over kangana ranaut controversy)

अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करताच शिवसेना नेते आणि कंगनामधील खडाजंगीला सुरूवात झाली. आधी हमरीतुमरीपर्यंत मर्यायदीत असलेलं हे प्रकरण पुढं जाऊन कंगनाविरोधात आंदोलन, विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणि सोबतच तिच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तातडीने पाडण्याच्या कारवाईपर्यंत येऊन पोहोचलं. केवळ शिवसेनाच नाही, तर ठाकरे सरकारमधील काही मंत्री आणि महापालिका प्रशासनाने या वादात उडी घेतल्याने त्याचा जनमानसात चुकीचा संदेश गेला. कोरोनाच्या संकटाकडे लक्ष देण्याऐवजी सरकार कंगना प्रकरणाला इतकं महत्त्व का देतंय असे प्रश्न उपस्थित होऊ लागले.

हेही वाचा - कंगनाच्या बंगल्यावरील कारवाई नियमानुसारच, महापालिकेचा हायकोर्टात दावा

त्यावर चिवसेनेने करून दाखवलं... कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगात पाचव्या स्थानी. रुग्णसंख्या १० लाखांच्या जवळ. हे सरकार विसरलं की कोरोनाशी लढायचं होतं कंगनाशी नाही, असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेला चिमटा काढला.

राज्यात गुरूवारी २३४४६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामुळे कोरोनाबाधित रूग्णांचा आकाडा १० लाखांच्या जवळपास जाऊन पोहोचला आहे. आतापर्यंत एकूण ७००७१५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर राज्यात एकूण २६१४३२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

मुंबईतील स्थिती देखील फारशी चांगली नाही. महापालिकेने आतापर्यंत मुंबईमध्ये १ लाख ६० हजार ७४४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद केली आहे. घरामध्ये विलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या २ लाख ५४ हजार १७७ इतकी आहे. मुंबईत नियंत्रणात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने रुग्णदुपटीचा कालावधी देखील घसरू लागला आहे. १ सप्टेंबरपर्यंत ८० दिवसांवर असलेला रुग्णदुपटीचा कालावधी गुरुवारी तब्बल ६३ दिवसांवर घसरला आहे. मागील महिनाभर रोज १००० ते १२०० पर्यंत खाली आलेली रुग्णसंख्या आता दीड ते दोन हजारापर्यंत वाढू लागली आहे. ही वाढती रुग्णसंख्या मुंबईकरांच्या चिंतेत भर टाकणारी आहे.

 हेही वाचा - कंगनाच्या चाहत्याकडून संजय राऊत यांना धमकी, कोलकत्यातून एकाला अटक


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा