Advertisement

कोरोनाचं अपयश झाकण्यासाठीच कंगनावर कारवाई, भाजपची टीका

कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यात सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. हे अपयश झाकण्यासाठीच अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर कारवाई करण्यात येत आहे, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

कोरोनाचं अपयश झाकण्यासाठीच कंगनावर कारवाई, भाजपची टीका
SHARES

राज्यात खासकरून मुंबईत कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यात सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. हे अपयश झाकण्यासाठीच अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर कारवाई करण्यात येत आहे. अहंकार आणि सूडाच्या भावनेतून ही कारवाई होत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. (bjp leader pravin darekar reacts on bmc demolishes illegal construction in actress kangana ranaut mumbai bungalow)

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रवीण दरेकर म्हणाले की, कोरोनाला आळा घालण्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पूर्णपणे अपयश आलं आहे. मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर जात असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा उच्चांक नोंदवला जात आहे. यामुळे महापालिका प्रशासनही हतबल झालं आहे. अशा स्थितीत लोकांचं लक्ष या गंभीर मुद्द्याकडून दुसरीकडे वळवण्यासाठीच सत्ताधाऱ्यांनी अस्मितेच्या नावाखाली कंगनावर कारवाई केली आहे. 

हेही वाचा - कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईला हायकोर्टाची स्थगिती

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर सत्ताधाऱ्यांचं नियंत्रण राहिलेलं नाही. हिंदुत्वाचा मुद्दाही आता हाती न राहिल्याने सत्ताधाऱ्यांना नैराश्य आलेलं आहे. त्यामुळेच केवळ अस्मितेच्या मुद्द्याला हात घालून भावनिक वातावरण तयार केलं जात आहे. महाराष्ट्र आणि मुंबईबद्दल अपशब्द बोलणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. अशा कुठल्याही वक्तव्याचं कधीच समर्थन होऊ शकत नाही. परंतु आपला देश संविधानावर चालतो. कुणावरही कुठलीही कारवाई करायची असेल तर त्याला कायद्याची चौकट आहे. कायदा हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. विधानसभा आणि विधान परिषदेत कंगनाविरोधात हक्कभंग आणला गेला, ते कायद्याला धरूनच होतं. परंतु त्या व्यतीरिक्त जी कारवाई होत आहे, ती केवळ अहंकारातून होत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

महापौर किशोरी पेडणेकर यांना मी संध्याकाळपर्यंत १०० अनधिकृत बांधकामांची यादी देणार आहे. त्यावर महापौर २४ तासांत कारवाई करणार? हे सुद्धा आम्ही बघू. मुंबईतील ठिकठिकाणच्या मोकळ्या जागांवर भूमाफियांनी अनधिकृत बांधकामे केली आहेत. त्याविरोधात सर्वसामान्य रहिवाशांच्या असंख्य तक्रारी येऊनही महापालिका जागची हालत नाही. अशा कुठल्या अनधिकृत बांधकांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली? याची माहिती महापौरांनी द्यावी, असं आव्हान देखील प्रवीण दरेकर यांनी दिलं.

हेही वाचा - कंगनाच्या घरात 'इतकं' अनधिकृत बांधकाम, महापालिकेनं यादीच केली जाहीर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा