पंकजा, रोहिणींना जाणीवपूर्वक पाडलं, एकनाथ खडसेंचा मोठा आरोप

पक्षातील कार्यकर्त्यांना हाताशी धरून भाजप नेत्या ​पंकजा मुंडे​​​ आणि रोहिणी खडसे यांचा पराभव करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी केला.

SHARE

पक्षातील कार्यकर्त्यांना हाताशी धरून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी केला. यामुळे पक्षातील नेत्यांमध्ये कमालिची अवस्थता पसरली असून ही बाब मी वरिष्ठांच्या कानावर घातली असल्याचंही ते म्हणाले.

भाजप नेते एकनाथ खडसे यांनी विनोद तावडे यांच्यापाठोपाठ पंकजा मुंडे यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पराभवामुळे पंकजा मुंडे नाराज आहेत, भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना जाणीवपूर्वक डावललं जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे, यांत तथ्य आहे का? असा प्रश्न खडसे यांना विचारण्यात आला. 

हेही वाचा- पंकजा मुंडे ‘त्या’ फेसबुक पोस्टवर म्हणाल्या


यावर उत्तर देताना ते म्हणाले, पक्षातील कार्यकर्त्यांना हाताशी धरून या जागा पाडण्यात आल्या यावर पंकजा मुंडे यांचं आणि माझं एकमत आहे. दुर्देवाने ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारे नेते या निवडणुकीत पराभूत झाले. त्यावरुन बहुजन समाजाला डावलण्याचा प्रयत्न होत असल्याचंच दिसून येत आहे. विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रकांत बावनकुळे इ. नेत्यांना तिकीटंच देण्यात आली नाही. या नेत्यांना निवडणुकीत सामावून घेतलं असतं तर पक्षाच्या जागा नक्कीच वाढल्या असत्या. पण तसं झालं नाही. या सर्व प्रकारामुळे पक्षातील काही नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. या संदर्भातील सर्व माहिती मी पक्षातील वरिष्ठांच्या कानावर घातली आहे.

हेही वाचा- गुन्हेगारांना सरकार धडा शिकवेल, भिडेंच्या प्रश्नावर जयंत पाटलांचं उत्तर

पक्षाकडून काय कारवाई अपेक्षित आहे? या प्रश्नावर त्यांनी सांगितलं की, पक्षविरोधी काम करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. कुठल्याही निवडणुकीत पक्षाची चांगली कामगिरी झाल्यावर त्याचं श्रेय जसं पक्षाचं नेतृत्व करणारे नेते घेतात. तशीच वाईट कामगिरीचीही जबाबदारी पक्षनेतृत्वाने घेतली पाहिजे, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.  

संबंधित विषय
ताज्या बातम्या