Advertisement

मुंबादेवी मंदिर विश्वस्त मंडळ अध्यक्षपदासाठी पुरोहित-शहा यांच्यात जुंपणार!

मुंबईतील मुंबादेवी मंदिरात कायद्यानुसार सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था लागू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदासाठी स्थानिक आमदार राज पुरोहित आणि माजी आमदार व विद्यमान नगरसेवक अतुल शहा यांच्यामध्ये जोरदार चुरस लागणार आहे.

मुंबादेवी मंदिर विश्वस्त मंडळ अध्यक्षपदासाठी पुरोहित-शहा यांच्यात जुंपणार!
SHARES

मुंबईतील मुंबादेवी मंदिरात कायद्यानुसार सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था लागू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदासाठी स्थानिक आमदार राज पुरोहित आणि माजी आमदार व विद्यमान नगरसेवक अतुल शहा यांच्यामध्ये जोरदार चुरस लागणार आहे.


दोन्ही समर्थकांची फिल्डिंग सुरु!

पुरोहितांच्या समर्थकांनी आतापासूनच यावर आपली वर्णी लावण्यासाठी फिल्डींग लावली असली, तरी प्रत्यक्षात अतुल शाह यांनीही आपली ताकद पणाला लावण्याचा निर्धार केल्यामुळे विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदावरून भाजपाच्या या आजी माजी आमदारांमध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


दुसऱ्याच दिवसापासून कार्यकर्ते मैदानात

मुंबादेवी मंदिर हे खासगी असून सुमारे दोनशे वर्षांहून अधिक जुने आहे. परंतु, या मंदिरातील भाविकांची वाढती संख्या आणि मंदिराची आर्थिक उलाढाल पाहाता आता मंदिरावर सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था लागू करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून भाजपाचे आमदार राज पुरोहित यांच्या समर्थकांनी जोरदार फिल्डींग लावत आपलाच माणूस या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी बसावा, यासाठी प्रयत्न सुरु केला आहे.


अतुल शाह यांचीही अध्यक्षपदासाठी तयारी

मुंबादेवी मतदार संघातून पराभूत झालेले माजी आमदार तथा या भागातील भाजपाचे नगरसेवक अतुल शाह यांनीही याबाबत आनंद व्यक्त केला आहे. मुंबादेवी मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदासाठी स्वत:ची किंवा आपल्या मर्जीतील कोणाचीही वर्णी लागावी, अशी सुप्त इच्छा व्यक्त करत त्यांनी यासाठी हालचालीही सुरु केल्या आहेत.


वरीष्ठ नेत्यांचा पुरोहितांना विरोध?

विशेष म्हणजे भाजपाच्या काही वरीष्ठ नेत्यांचा राज पुरोहित यांच्या नावाला विरोध असल्याचे समजते. त्या तुलनेत अतुल शहा हे सध्या भाजपाच्या नेत्यांच्या गुडबुकमध्ये असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जर मुख्यमंत्र्यांनी या दोघांपैकी एकाची निवड केली, तर अतुल शहा यांचा विचार होऊ शकतो.


तिसऱ्याच व्यक्तिची लागू शकते वर्णी!

मात्र, अध्यक्षपदावरून कोणताही वाद होऊ नये, म्हणून या दोघांव्यतिरिक्त अन्य कुणाची तरी वर्णी लावली जाईल, असे भाजपाच्याच काही नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, मुंबादेवी मंदिरात सर्वाजनिक विश्वस्त व्यवस्था करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे मुंबादेवी परिसरात तसेच मुंबईत स्वागत केले जात आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा