धकधक गर्लला राज्यसभेची आॅफर?

अमित शहा आणि माधुरी दीक्षित यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात असलं तरी या भेटीत माधुरीला भाजपाकडून राज्यसभेची आॅफर देण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

SHARE

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याला सुरूवात झाली असून बुधवारी दुपारी शहा यांनी धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिच्या निवासस्थानी जाऊन तिची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात असलं तरी या भेटीत माधुरीला भाजपाकडून राज्यसभेची आॅफर देण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या वृत्ताला भाजपा तसंच माधुरीकडूनही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तरी चर्चेनुसार माधुरी खरंच राज्यसभेवर जाणार का याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.


शिवसेनेला गोंजारणार?

सध्या शिवसेना आणि भाजपमधून वारंही वाहत नसल्याने मित्रपक्षाला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंजारणं हा अमिश शहा यांच्या दौऱ्याचा मुख्य अजेंडा आहे. त्यामुळे शहा शिवसेनेचा रूसवा दूर करण्यासाठी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतील, असं म्हटलं जात आहे. त्यानुसार या दोघांच्या भेटीची वेळही ठरली आहे.


कारण गुलदस्त्यात

पण, त्याअगोदर मुंबई दौऱ्यादरम्यान शहा माधुरीसह उद्योगपती रतन टाटा आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची भेट घेणार असल्याचं जाहीर झालं नि अनेकांना ही भेट नक्की कशासाठी? असा प्रश्न पडला. भाजपाकडूनही या भेटीचं कारण गुलदस्त्यात ठेवण्यातआलं.


तासभर चर्चा

त्यानुसार दुपारी शहा यांनी माधुरीच्या निवासस्थानी जाऊन माधुरीची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते. तर माधुरीचे पती डाॅ. श्रीराम नेने आणि मुलगाही यावेळी उपस्थित होता. साधारणत तासभर शहा आणि माधुरी यांची चर्चा झाली असून भाजपा सरकारच्या ४ वर्षांच्या कार्याचा आढावा असलेलं पुस्तकं शहा यांनी यावेळी माधुरीला भेट दिलं.


या दोघांनाही आॅफर

माधुरी आणि शहा यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेलं नाही. असं असलं तरी राजकीय वर्तुळात मात्र माधुरीला राज्यसभेची आॅफर दिल्याच्या चर्चेनं आता वेग पकडला आहे. रतन टाटा आणि लता मंगेशकर यांची भेटही अशाच काही कारणांसाठी तर नाही ना असंही आता म्हटलं जात आहे.


 

लता मंगेशकरसोबत भेट नाही

तब्येत ठिक नसल्याने आपण अमित शहा यांची भेट घेऊ शकत नसल्याचं ट्विट काही वेळांपूर्वी लता मंगेशकर यांनी केलं. त्यामुळे या दोघांची भेट होऊ शकली नाही. त्यावर पुढच्या मुंबई दौऱ्यात आपण लतादीदींची भेट घेऊ अशी प्रतिक्रिया शहा यांनी दिली.हेही वाचा-

अमित शाह मुंबई दौऱ्यावर, 'मातोश्री' भेटीचं काय?

अमित शाह उद्धव ठाकरेंच्या भेटीला, युतीसाठी चर्चा होण्याची शक्यतासंबंधित विषय
ताज्या बातम्या