Advertisement

मुख्यमंत्री जिंकले आणि शिवसेना हरुनही जिंकली!

पालघरच्या लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागला आणि पुन्हा एकदा सर्व आडाखे साफ खोटे ठरवत भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित विजयी झाले. हा विजय म्हणजे भाजपाचा विजय! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय! भाजपा आणि मुख्यमंत्र्यांच्या कुटनितीचा विजय आहे! असंच या विजयांचं वर्णन करता येईल.

मुख्यमंत्री जिंकले आणि शिवसेना हरुनही जिंकली!
SHARES

पालघरच्या लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागला आणि पुन्हा एकदा सर्व आडाखे साफ खोटे ठरवत भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित विजयी झाले. हा विजय म्हणजे भाजपाचा विजय! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय! भाजपा आणि मुख्यमंत्र्यांच्या कुटनितीचा विजय आहे! असंच या विजयांचं वर्णन करता येईल. 


निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ही निवडणूक महत्त्वाची होती. पालघरची निवडणूक ही केवळ रंगली ती विद्यमान तथा दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या मुलाला शिवसेनेने पळवल्यानं. त्यामुळेच ही निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची बनली. काँग्रेसमधून आयात केलेले राजेंद्र गावित हे भाजपाचे अधिकृत उमेदवार असले तरी ही निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच लढवत आहेत. तेच उमेदवार आहेत, असं गृहीत धरून काम करा, असं भावनिक आवाहन करत भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना मतदानाच्या प्रचारात उतरवलं होते. त्यामुळे साम, दाम, दंड, भेदाचा वापर करत प्रसंगी सत्तेचा वापर करत भाजपाने पालघरची विजयश्री खेचून आणली.

पैशांचा पाऊस पाडला

निवडणूक म्हटली तर जय-पराजय आलाच. परंतु या निवडणुकीत जे चित्र दिसलं ते पाहता पैसा जिंकला, अशीही प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. आदिवासी पाड्यांमध्ये जो काही पैशांचा पाऊस पाडला, असा जो काही आरोप होत होता, ते या निकालानंतर पटू लागलाय. मूळात ही निवडणूक सोमवारी घेऊन भाजपाने पहिली विजयाची रेषा पार केली होती. त्यानंतर मतदानामध्ये बोईसर, विक्रमगड, पालघर, डहाणू आदी भागांमध्ये  ५५ ते ६० टक्के मतदान तिथे दुसरी विजयाची रेषा पार केली होती. 


बदलत्या राजकारणांची समिकरणं

नायगाव ते बोईसर हा भाग बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला तर पुढे डहाणूपर्यंत भाजपाचे वर्चस्व आहे. त्यामुळे नेमेकं नायगाव ते बाईसरपर्यंत मतदानाची टक्केवारी ही केवळ सरासरी ४५ टक्के आहे. तर पुढील भागांमध्ये ही टक्केवारी ६० टक्क्यांपर्यंत होती. त्यामुळे हा पैशांच्या पावसाचा परिणाम होता का? असाही प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यातच कहर म्हणजे मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी ४६ टक्के मतदान झाल्याचं घोषित करतात आणि दुसऱ्या दिवशी ५३ टक्के मतदान झाल्याचं जाहीर केलं जातं. 

हे वाढलेलं ७ टक्के मतदान निश्चितच भाजपाचं असल्यानं विजयाची तिसरी रेषाही त्यांनी आधीच पार केल्यानं बहुजन विकास आघाडी मागे पडेल आणि शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. तसंच घडलं पण शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर येवून बहुजन विकास आघाडीचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. हीच आता बदलत्या राजकारणांची समिकरणं आहेत.


आणि भाजपा विजयी

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत हीच क्रमवारी राहिली. भाजपाचे राजेंद्र गावित यांनी बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांच्यापेक्षा १४६ मतांनी आघाडीवर होते. तर शिवसेनेचे श्रीनिवास वनगा हे ८ हजार १९० मते मिळवत तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यानंतर दुसऱ्या फेरीत ४७६६ मतांनी आघाडी घेत राजेंद्र गावित पुढे गेले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील शिवसेना आणि बविआ यांची स्पर्धा होते. परंतु, तेराव्या फेरीनंतर गावितांनी २० हजार मतांची आघाडी घेत एकप्रकारे आपला विजय निश्चित करून टाकला.


लोकसभा निवडणुकीची जागा भाजपाची

मूळात ही लोकसभा निवडणुकीची जागा भाजपाची. आजवर याठिकाणी भाजपानेच उमेदवार दिलेला आहे. शिवसेनेने कधीही याठिकाणी लोकसभा निवडणूक लढवली नाही. परंतु, या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला असला तरी आमच्या दृष्टीकोनातून शिवसेना हरूनही जिंकली आहे. या भागात तसं पाहता शिवसेनेचं अस्तित्व नाही. तशी शिवसेनाही तेवढंस याठिकाणी लक्ष देत नव्हती. 

पण ही निवडणूक भाजपानं प्रतिष्ठेची केल्याने, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपली सर्व शक्ती पणाला लावत आपल्या मावळ्यांसह निवडणुकीत उतरले. पण मतदानावर जर नजर टाकली तरी शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं अर्थात २ लाख ३७ हजार २०७ मतं मिळाली आहे. एवढी मतं मिळणार हे शिवसेनेला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तरीही करिश्मा झाला. 


बहुजन विकास आघाडीलाही आव्हान

या निवडणुकीमुळे या मतदार संघातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या अंगावर चिमूटभर मांस चढल्याशिवाय राहणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अंतिम सामन्यापूर्वी हा सराव सामना खेळला आहे. त्यातच कार्यकर्ते यांनी प्रचंड मेहनत घेतल्याने थोड्याफार उणीव, त्रुटी असतील, त्या दूर करून शिवसेना याठिकाणी लोकसभेसाठी आपला उमेदवार देवू शकतो. भाजपाचा बालेकिल्ला असला तरी त्यांना सहजासहजी शिवसेनेने विजय दिलेला नाही. केवळ भाजपालाच नव्हेतर येथील प्रस्थापित मोठा स्थानिक पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीलाही त्यांनी आव्हान दिलं आहे. त्यामुळे हा निसटता पराभव म्हणता येईल.


शिटीची हवा निघाली

निवडणुकीच्या प्रारंभीच शिवसेना आणि भाजपाच्या लढाईत स्थानिक बहुजन विकास आघाडी पक्षाची शिटीच वाजेल, असं बोललं जात होतं. परंतु, या शिटीची हवा भाजपासह शिवसेनेने काढून टाकली. या पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपा हे पूर्ण शक्तीनिशी उतरून प्रचार करत असतात बहुजन विकास आघाडी आपल्या पारंपारिक पद्धतीनेच प्रचार करत होता. तरीही लोकांना बहुजन विकास आघाडीचाच उमेदवार निवडून येईल, यावर ठाम विश्वास होता. पण सर्व खोटं ठरलं. 


तो काळ गेला

शिटी वाजलीच नाही. परंतु याचा अर्थ या पक्षाच्याविरोधात जनमत आहे, असं होत नाही. या पक्षाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर हे एवढे गाफिल होते की कुणाच्या दबावामुळे त्यांनी ही निवडणूक तेवढी शक्तीने लढवली नाही? की पोटनिवडणुकीपेक्षा आगामी लोकसभा निवडणुकीत आपली शक्ती पणाला लावण्याचा त्यांचा विचार होता? परंतु हिंतेंद्र ठाकूर जर या विचारात असतील की आपण नाही गेलो तरी लोक शिटीसमोरील बटन दाबतील, तर तो काळ गेला. 

निष्ठावान कार्यकर्ते आणि मतदारही राहिलेले नाही. परंतु, या भागामध्ये बहुजन विकास आघाडी जे विकासाचं काम करते, ते काम शिवसेना-भाजपाला करता येणार नाही. या पक्षांच्या हाती या भागाची सत्ता गेली तरी भ्रष्टाचाराचं कुरणच होईल. किमान हितेंद्र ठाकूर यांच्या एका इशाऱ्यावर कुणीही विकासाच्या आड तंगडं आडवं करायला येत नाही. त्यामुळे या जिल्ह्याच्या विकासासाठी बहुजन विकास आघाडीशिवाय पर्याय नाही, असं लोकांना वाटतं. 


 जनमत पाठीशी तरी तिसऱ्या क्रमांकावर

जर एवढा जनमत पाठीशी आहे, तर हा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर का गेला हा संशोधन विषय आहे. मतदानाच्या दिवशी २७६ मशिन्स बंद होणे आणि ७ टक्के वाढलेली मते तसेच बोईसर ते डहाणूपर्यंतचं वाढलेलं मतदान हेच भाजपाच्या पथ्यावर पडलेलं आहे. साम, दाम, दंड, भेदाचा वापर करत भाजपाने विजयाचा मार्ग सुकर करून ठेवला होता. कुटनितीनं भाजपा जिंकली, हरुनही शिवसेना जिंकली आणि जिंकणार म्हणणारी बहुजन विकास आघाडी हरली, असंच म्हणावं लागेल.



हेही वाचा - 

पालघर लोकसभा पोटनिवडणूक: भाजपाचे गावित यांचा दणदणीत विजय

या 5 कारणांमुळे भाजपचा विजय शक्य


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा