Advertisement

भांडुपमधील आगीला बीएमसी, ठाकरे सरकार कारणीभूत- देवेंद्र फडणवीस

भांडुपमधील सनराईज रुग्णालयाला लागलेली आग म्हणजे ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिकेच्या दुर्लक्ष आणि ढिसाळपणाचा नमुना असल्याची टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

भांडुपमधील आगीला बीएमसी, ठाकरे सरकार कारणीभूत- देवेंद्र फडणवीस
SHARES

भांडुपमधील सनराईज रुग्णालयाला लागलेली आग म्हणजे ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिकेच्या (bmc) दुर्लक्ष आणि ढिसाळपणाचा नमुना असल्याची टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या आगीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोविड रुग्णालयांतील अग्निसुरक्षा तपासण्याचे आदेश दिले आहेत. मात्र भंडाऱ्यातील रुग्णालयाला आग लागून वर्ष होत आलं तरी एकाही रुग्णालयाचं फायर आॅडिट झालेलं नाही, याकडेही देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधलं.

प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जी घटना घडली आहे, त्यामध्ये सरकार आणि महापालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष व ढिसाळपणा हा स्पष्टपणे दिसतो आहे. यासंदर्भात आता फार बोलणं उचित ठरणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचाच पक्ष मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी आहे. मात्र मुंबई महापालिकेचं प्रशासन हे भ्रष्टाचाराने पोखरलेलं आहे. जी अनधिकृत इमारती, रुग्णालयं आहेत, सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, परंतु महापालिकेकडून कोणतीही कारवाई होऊ शकत नाही. हेच निश्चित आहे.

हेही वाचा- “होळी, रंगपंचमीला गर्दी नको, नियमांचं पालन करा”

आणखी किती लोकांचा मृत्यू झाल्यानंतर या सरकारला जाग येणार? भांडुपमधील या घटनेची सखोल चौकशी व्हायलाच हवी. आणि दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे. आता घोषणा नाही तर, सरकारने थेट कृतीच करून दाखवावी, असं आव्हानही देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला दिलं.

राज्य सरकार अग्निसुरक्षेबाबत गंभीर नसल्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधलं. राज्यात कुठंही फायर सेफ्टी आॅडिट झालेलं दिसून येत नाही. राज्य सरकार घटना घडली की केवळ घोषणा करते. घोषणेच्या पलिकडे सरकारच्या माध्यमातून काहीही झालेलं नाही. रेस्क्यूचीही व्यवस्था नसल्याने अनेक अडचणी येतात, असंही देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले.

ड्रीम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांच्या झालेल्या मृत्यूंची माहिती मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली. तसंच राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये सुरु आहेत, अशा ठिकाणी अग्नीसुरक्षेची तात्काळ तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 

(bmc and thackeray government responsible for bhandup dreams mall fire incident says devendra fadnavis)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा