पोटनिवडणुका जाहीर करण्यास उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती

मुंबई महापालिकेच्या पश्‍चिम उपनगरांमधील रिक्त प्रभागांच्या पोटनिवडणुका जाहीर करण्याला मुंबई उच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली आहे.

SHARE

महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या ४ उमेदवारांचं जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळं त्यांचं नगरसेवक पद रद्द झालं आहे. त्यामुळं मुंबई महापालिकेच्या पश्‍चिम उपनगरांमधील रिक्त प्रभागांच्या पोटनिवडणुका जाहीर करण्याला मुंबई उच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली आहे. ४ नगरसेवकांचं नगरसेवकपद रद्द झाल्यानं दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांनी नगरसेवकपदावर हक्क सांगत न्यायालयात याचिका दाखल केली. 


उमेदवारांची न्यायालयात धाव

मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले उमेदवार नितीन सलाग्रे (काँग्रेस), गीता भंडारी, संदीप नाईक आणि शंकर हुंडारे (सर्व शिवसेना) यांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. याबाबत निवडणूक आयोगानं सद्यस्थितीत मतदारयादी अद्ययावत करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. या प्रभागात अद्याप निवडणुका जाहीर केलेल्या नाहीत. मात्र मतदारयाद्यांची तपासणी झाल्यावर निवडणुका घोषित होण्याची शक्‍यता असल्याचं  निवडणूक आयोगाच्या वतीनं न्यायालयात स्पष्ट करण्यात आलं आहे.


प्रलंबित दाव्यांवर परिणाम

उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती निझामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी करण्यात आली. मात्र, या प्रकरणातील आणखी काही याचिका अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळं अशाप्रकारे निवडणूक जाहीर होऊ शकत नाही. त्याशिवाय आकस्मिकपणे निवडणुका जाहीर केल्यास याचिकादारांच्या न्यायालयातील प्रलंबित दाव्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असं याचिकाकर्त्यांच्यावतीनं न्यायालयाला सांगण्यात आलं.

याप्रकरणी उच्च न्यायलयानं दोन्ही बाजू लक्षात घेत आयोगाला १२ जूनपर्यंत निवडणुका जाहीर करण्यास मनाई केली. तसंच, जूनच्या पहिल्या आठवड्यात यावर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत.



हेही वाचा -

मी-टू प्रकरणात नाना पाटेकरांना क्लीन चीट ही अफवा

'ब्रिटन्स गॉट टॅलेंट'मध्ये कांदिवलीच्या अक्षतचा जलवा



संबंधित विषय
ताज्या बातम्या