Advertisement

कथित सीडी प्रकरणी मुंडे यांची चौकशी करा- मुख्यमंत्री

मागील काही दिवसांपासून वादग्रस्त सीडीचं सत्र सुरु झालं आहे. त्यामुळे कुणाची बाजू खरी आणि कुणाची खोटी हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे हा प्रश्न निकाली काढण्यासाठी विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांची समिती स्थापन करून चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.

कथित सीडी प्रकरणी मुंडे यांची चौकशी करा- मुख्यमंत्री
SHARES

विधान परिषदेत लक्ष्यवेधी रोखण्यासाठी पैशांची मागणी केल्याच्या कथित आरोप असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची विधानसभा सभागृहात चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे केली.

त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी मुंडे यांना निलंबित करण्याची मागणी करत अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेकडे धाव घेत प्रचंड गोंधळ घातला. त्यावर अध्यक्षांनी अशा परिस्थितीत कामकाज चालवणं अशक्य असल्याचं सांगत विधानसभेचं दिवसभराचं कामकाज स्थगित केलं.



खरी बाजू कुणाची?

विधानसभेत धनंजय मुंडे यांना निलंबित करण्याची मागणी सत्ताधारी भाजपाच्या सदस्यांनी करत पुन्हा एकदा गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''मागील काही दिवसांपासून वादग्रस्त सीडीचं सत्र सुरु झालं आहे. त्यामुळे कुणाची बाजू खरी आणि कुणाची खोटी हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे हा प्रश्न निकाली काढण्यासाठी विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांची समिती स्थापन करून चौकशी करावी. तसंच याप्रकरणी दाखल झालेल्या 'एफआयआर'ची देखील एकत्रित चौकशी करावी.''


विधीमंडळाच्या बाबतीत शंका

या वादग्रस्त प्रकारामुळे विधीमंडळाच्या कामकाज प्रक्रियेबाबत लोकांच्या मनात शंका निर्माण होत आहेत. त्यामुळे या शंका दूर करून विधीमंडळाची शान अबाधित राखली पाहिजे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.


अजित पवारांची तयारी

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार म्हणाले की, कुठल्याही प्रकारच्या चौकशीला आमची तयारी आहे. आम्ही स्वत:च याप्रकरणी न्यायालयीन चौकशीचीही मागणी केली होती. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या सहमतीने सभागृहाच्या कामकाजाला सुरूवात करा.

मात्र, तरीही भाजपाच्या सदस्यांकडून गोंधळ सुरूच राहिल्याने अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.



हेही वाचा-

'न्यूज १८-लोकमत' विरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव

पंकजा, धनंजय पुन्हा आमने-सामने!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा