येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणालाही सुरूवात होणार आहे. अशा सर्व नागरिकांचं लसीकरण मोफत करायचं झाल्यास राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडू शकतो. त्यामुळे मोफत लसीकरणावरील अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांचाच असेल, असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केला.
मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावरून प्रसार माध्यमांनी अजित पवार (ajit pawar) यांना विचारणा केली. त्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, ज्या निर्णयामुळे राज्यावर आर्थिक भार पडू शकतो, त्यावर निर्णय महाविकासआघाडीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्रीच घेऊ शकतात. बाकीच्यांनी त्यामध्ये समंजस भूमिका घ्यायला हवी. अशी वक्तव्य इतरांनी टाळलेली चांगली. तेव्हा मोफत लसीकरणाविषयी अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील.
आता मी काही बोललो आणि उद्या तिकडे मंत्रिमंडळ बैठकीत काही वेगळा प्रस्ताव मंजूर झाला तर उद्या पुन्हा माझी ब्रेकिंग न्यूज होईल. त्यापेक्षा उद्या काय तो निर्णय होईल. २४ तास प्रतीक्षा करा, असं अजित पवार म्हणाले.
हेही वाचा- १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना मोफत लस, ठाकरे सरकारची घोषणा
याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी येत्या १ मे पासून सर्वांना राज्य सरकारकडून मोफत लस देण्यात येईल, अशी घोषणा करून टाकली होती. राज्यात लशींचा आवश्यक तेवढा पुरवठा होण्यासाठी एक समिती नेमून ग्लोबल टेंडर काढण्यात येईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली होती. त्यातच शिवसेना नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील याचवेळेला ट्विट करून मोफत लशीसंबंधी माहिती दिली नंतर ते ट्विट डिलिट करून टाकलं.
राज्य सरकारकडून वा मुख्यमंत्र्यांकडून याबाबत अधिकृतरित्या घोषणा होण्याआधीच राष्ट्रवादी आणि शिवसेने मोफत लसीवरून श्रेय घेणं चुकीचं आहे, असं म्हणत काँग्रेसने आपली नाराजी स्पष्ट शब्दांत बोलून दाखवली.
राज्यातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात यावी, अशी काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्वत: त्यासाठी आग्रह धरला आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडं तसा आग्रह धरला आहे. त्यावर मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील असा आम्हाला विश्वास आहे. त्याबाबत ते विचार करत असताना श्रेय घेण्यासाठी कोणी परस्पर घोषणा करत असेल तर ते योग्य नाही. ते आम्हाला आवडलेलं नाही, आम्ही निश्चितच नाराज आहोत, असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते.
(cm uddhav thackeray will announce free covid 19 vaccination drive in maharashtra says ajit pawar)