Advertisement

लसीकरणावरून श्रेयवाद आम्हाला आवडलेला नाही, काँग्रेसची स्पष्ट शब्दांत नाराजी

श्रेय घेण्यासाठी कोणी परस्पर घोषणा करत असेल तर ते योग्य नाही. ते आम्हाला आवडलेलं नाही, आम्ही निश्चितच नाराज आहोत, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे.

लसीकरणावरून श्रेयवाद आम्हाला आवडलेला नाही, काँग्रेसची स्पष्ट शब्दांत नाराजी
SHARES

महाराष्ट्रातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना राज्य सरकारकडून कोरोना प्रतिबंधात्मक लस मोफत देण्यात येईल, अशी घोषणा नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री स्वत: या प्रस्तावावर विचार करत असताना परस्पर घोषणा करून श्रेय घेण्याचा केलेला प्रयत्न आम्हाला जराही आवडलेला नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टपणे ही नाराजी बोलून दाखवली.

राज्यातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात यावी, अशी काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्वत: त्यासाठी आग्रह धरला आहे. काँग्रेस शासित राजस्थान,पंजाब व छत्तीसगडमध्ये हे मोफतच आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडं तसा आग्रह धरला आहे. त्यावर मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील असा आम्हाला विश्वास आहे. त्याबाबत ते विचार करत असताना श्रेय घेण्यासाठी कोणी परस्पर घोषणा करत असेल तर ते योग्य नाही. ते आम्हाला आवडलेलं नाही, आम्ही निश्चितच नाराज आहोत, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा- १८ ते ४४ वयोगटाला कोरोना लसीसाठी नोंदणी बंधनकारक

सध्याच्या स्थितीत ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांच्या लसीकरणासाठी लसीकरण केंद्रांबाहेर मोठी गर्दी होत आहे. त्यातच १ मे पासून १८ च्या पुढील सर्वांसाठी लस उपलब्ध होत असताना गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये गोंधळ होऊन कोरोना प्रसार वाढून शकतो. म्हणूनच लस उपलब्ध होणं, लसीकरणासाठी जास्त केंद्रं उभारणं यासंबंधी धोरण आखावंच लागेल. शिवाय लोकांचंही यासाठी सहकार्य महत्त्वाचं ठरणार आहे.येत्या दोन दिवसांत यासंबंधी धोरण निश्चित केलं जाईल, अशी माहिती यावेळी बाळासाहेब थोरात यांनी दिली.

केंद्र सरकारने १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाची परवानगी दिली आहे. सोबतच ४५ पेक्षा कमी वय असलेल्यांना केंद्र सरकार लसपुरवठा करणार नाही, हे देखील स्पष्ट केलं आहे. त्यानंतर अनेक राज्यांनी १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. 

यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या मागील बैठकीत झालेल्या चर्चेत सर्वांना मोफत लस देण्याच्या निर्णयावर एकमत झालं होतं. लस मिळवण्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचंही ठरवण्यात आलेलं आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री १ मे रोजी करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्याआधीच नवाब मलिक यांनी घोषणा करून टाकली, तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही या संदर्भात ट्वीट केलं होतं. मात्र, काही वेळातच त्यांनी हे ट्वीट डिलिट केलं. यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये असलेला गोंधळ दिसून आला. 

(maharashtra congress leader balasaheb thorat reacts on free covid 19 vaccination in state)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा