Advertisement

काॅंग्रेस, राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ उमेदवार, शिवसेना नाराज?

राष्ट्रवादीसोबतच काँग्रेसने देखील या निवडणुकीत २ उमदेवार उभे करण्याची भूमिका घेतल्याने शिवसेना नाराज झाल्याचं सूत्रांकडून कळत आहे.

काॅंग्रेस, राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ उमेदवार, शिवसेना नाराज?
SHARES

महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं अखेर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादीसोबतच काँग्रेसने देखील या निवडणुकीत २ उमदेवार उभे करण्याची भूमिका घेतल्याने शिवसेना नाराज झाल्याचं सूत्रांकडून कळत आहे.  

काँग्रेसने शनिवारी राजेश राठोड यांच्या उमेदवारीची घोषणा केली. सोबतच या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून आणखी एक उमेदवार उभा करण्यात येईल, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांपुढे मांडली. 

हेही वाचा - रामदास आठवले चक्क भाजपवर नाराज, 'हे' आहे त्यामागचं कारण, वाचा...

तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्या नावांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली. विधान परिषदेसाठी या दोघांची नावं काही दिवसांपासून माध्यमांमध्ये फिरतच होती. मात्र दोन्ही काँग्रेसने प्रत्येकी २ उमेदवार उभे करण्याची भूमिका घेतल्याने शिवसेना नाराज झाल्याचं म्हटलं जात आहे. 

करोनाच्या संकटकाळात निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शिवसेना प्रयत्नशील असताना काँग्रेसनं परस्पर २ उमेदवार जाहीर केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अस्वस्थ झाल्याचं म्हटलं जात आहे. काँग्रेसने हट्ट न सोडल्यास विधान परिषद निवडणूक लढवायचीच नाही, असा निर्वाणीचा निर्णय घेतल्याचं त्यांनी समजत आहे.

शिवसेनेने विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपनेही ३ ऐवजी प्रवीण दटके , डॉ. अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गोपीचंद पडळकर असे ४ उमेदवार निवडणुकीत उतरवल्याने या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी मतदान होत आहे. विधान परिषदेत रिक्त झालेल्या ९ जागांपैकी भाजपच्या ३, राष्ट्रवादी ३, काँग्रेस २ आणि शिवसेना १ अशा जागेचा समावेश आहे. विधानसभेत निवडून आलेले २८८ आमदार या ९ जागांसाठी मतदान करतील. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ११ मे अशी आहे. २४ एप्रिल रोजी होणारी ही निवडणूक कोरोना संकटामुळे पुढं ढकलण्यात आली होती.

हेही वाचा - विधानपरिषदेसाठी माझं नाव चर्चेत, पण..- शशिकांत शिंदे


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा