Advertisement

काँग्रेसमुळे महापालिकेत शिवसेनेचा बाण टोकदार!


काँग्रेसमुळे महापालिकेत शिवसेनेचा बाण टोकदार!
SHARES

मुंबई महापालिकेत जागता पहारा देऊन सत्ताधारी शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असा दावा भारतीय जनता पार्टीकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात या पहारेकऱ्यांच्या फुग्यातील हवाच काँग्रेसने काढायला सुरुवात केली आहे.


काँग्रेसची उघडपणे साथ

महापालिकेत मंजुरीला येणारे प्रस्ताव रोखून शिवसेनेच्या नाकीनऊ आणण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे. परंतु भाजपाचे हे डाव काँग्रेसमुळे उधळले जात आहेत. शिवसेनेला काँग्रेसकडून उघडपणे साथ मिळत असल्याने महापालिकेत शिवसेनेचा बाण आता अधिक टोकदार बनला आहे.

महापालिकेत शिवसेना आणि भाजपाची सदस्य संख्या ही 'कट टू कट' असल्यामुळे महापालिका सभागृह, स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण समितीसह इतर विशेष समित्यांमध्ये प्रस्ताव मंजूर करताना शिवसेनेची भाजपाकडून कोंडी केली जात आहे.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून बिथरलेली शिवसेना काँग्रेसच्या ऑक्सिजनमुळे पुन्हा तरतरीत झालेली पहायला मिळत आहे. शिवसेनेचा 'गेम' करण्यासाठी भाजपाकडून रणनिती आखली जात असताना भाजपा आणि सरकारला झटका देणारे प्रस्तावच नामंजूर करण्याची शक्कल शिवसेनेकडून लढवली जात आहे.


गप्प राहणेच बरे

गेल्या महिन्यात आरे कॉलनीतील मेट्रो रेल्वेच्या कारशेड आरक्षणाचा प्रस्ताव सुधार समितीने नामंजूर केला. हा प्रस्ताव नामंजूर करण्याचे धाडस शिवसेनेने काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे दाखवले होते. काँग्रेसची साथ असल्यामुळे मेट्रोचा प्रस्ताव सुधार समितीने नामंजूर केला. भाजपाने याचा तीव्र निषेध नोंदवला.

परंतु महापालिका सभागृहात या प्रस्तावावार पहारेकऱ्यांनी आपले तोंडही उघडले नाही. अर्थात काँग्रेसचा पाठिंबा असल्यामुळे मतदानाची मागणी करूनही आपला हेतू साध्य होणार नाही याची कल्पना आल्यामुळे भाजपाने गप्प राहणेच पसंत केले.

राणीबागेच्या शुल्कवाढीच्या प्रस्तावाबाबतही भाजपाने विरोधाचा निशाण फडकावला होता. परंतु काँग्रेसने साथ दिल्यामुळे शिवसेनेने बहुमताच्या जोरावर राणीबागेच्या शुल्कवाढीचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर महापालिका सभागृहात हा प्रस्ताव मंजूर होऊ देणार नाही, अशी भूमिका मांडणाऱ्या भाजपाने प्रत्यक्षात विरोध केलाच नाही.

काँग्रेसची साथ असल्यामुळे शिवसेना बहुमताच्या जोरावर सभागृहात हा प्रस्ताव मंजूर करेल आणि आपण ताेंडावर आपटू, याच विचाराने भाजपाने विरोध न करता झोपी गेल्याचे सोंग घेतले. त्यामुळे महापालिका सभागृहात तसेच वैधानिक समित्यांमध्ये प्रस्ताव मंजूर करताना पहारेकऱ्यांची भीती आता शिवसेनेला राहिलेली नसून काँग्रेसमुळे मनगटात बळ आल्यामुळे पहारेकऱ्यांशी दोन हात करण्याची शिवसेनेची हिंमत वाढली आहे.


"आमच्या ओठात एक आणि पोटात एक असे नाही. आम्ही उघडपणे शिवसेनेला पाठिंबा देत आहोत. पण हा पाठिंबा मुंबईच्या विकासासाठी आणि मुंबईकरांच्या हितासाठी असलेल्या विकासकामांसाठी आहे. मुंबईच्या विकासाला बाधक ठरणारी भूमिका शिवसेनेने घेतली तर आम्ही नेटानं विरोध करू. केवळ विरोधी पक्षात आहोत म्हणून विरोधाला विरोध करणे हे योग्य नसून शिवसेनेला महापालिकेत विकासाच्या मुद्यावरूनच काँग्रेसच्या वतीने पाठिंबा दिला जात असतो."
- रवी राजा, विराेधी पक्षनेते


"महापालिकेत पहारेकरी आहेत का? सभागृहात शुक्रवारी राणीबागेतील शुल्कवाढ तसेच मेट्रोच्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यात आला. तेव्हा पहारेकऱ्यांनी आवाज केलेला नाही. शिवसेना महापालिकेत मुंबईच्या हिताच्या दृष्टीकोनातून विकासाची कामे हाती घेत आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचा पाठिंबा आम्हाला मिळत आहे. विरोधी पक्षाच्या या सकारात्मक भूमिकेचे आम्ही स्वागत करतो."
- यशवंत जाधव, सभागृहनेते



"विरोधी पक्षाला आपली भूमिकाच समजलेली नाही. मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यावर आपण सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देतो. असे विरोधी पक्षनेते सांगत आहेत. त्या विरोधी पक्षनेत्यांची पाणी दरात वाढ करण्याचा प्रस्तावात फेरबदल करण्यासाठी केलेली मागणी सत्ताधारी पक्षाने फेटाळून लावली. मग अपमान सहन करून काँग्रेस शिवसेनेला कशी साथ देते? शिवसेनेच्या मेहेरबानीवर त्यांनी विरोधी पक्षनेतेपद मिळवले आहे. त्यामुळे ते विरोध काय करणार?"
- मनोज कोटक, महापालिका गटनेते, भाजपा



हे देखील वाचा -

भाजपा नगरसेवक मकरंद नार्वेकरांना मुंबई महापालिकेत मारहाण



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा