• राणीबागेत प्रवेश महागला, 'पहारेकरी' मात्र सुस्त
SHARE

भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयासह पेंग्विनच्या दर्शनासाठी स्थायी समितीने निश्चित केलेल्या शुल्काला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यता आली आहे. येत्या १ ऑगस्टपासून शुल्कवाढ केली जाणार आहे. स्थायी समितीमध्ये काँग्रेसला हाताशी धरुन शिवसेनेने हा  प्रस्ताव मंजूर केल्यामुळे सभागृहात हा प्रस्ताव रोखणार, असा इशारा भाजपाने दिला होता. परंतु प्रत्यक्षात गुरुवारी हा प्रस्ताव मंजुरीला आला असता कोणत्याही चर्चेविना आणि विरोधाविना हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे राणीबागेच्या मुद्दयावर पहारेकरी शांत का बसले? असा सवाल उपस्थित झाला आहे.


भाजपाचा विरोध मावळला

पालक आणि दोन मुलांना 100 रुपयांचे शुल्क व 12 वर्षांवरील पाचव्या माणसाला केवळ 50 रुपये एवढेच शुल्क आकारण्याचा निर्णय स्थायी समितीत मंजूर करण्यात आला होता. स्थायी समितीत विरोध करुनही हा प्रस्ताव शिवसेनेने मंजूर केला होता. परंतु, स्थायी समितीत हा प्रस्ताव झाल्यानंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली. त्यामुळे सभागृहात हा प्रस्ताव मंजूर करताना भाजपा याला तीव्र विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु प्रत्यक्षात मंगळवारी भाजपाकडून कोणत्याही प्रकारचा विरोध झाला नाही.


भाजपाला दिला चकवा

स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर सभागृहात हा प्रस्ताव मांडण्यासाठी उभे राहिले. त्यांनी विषय मांडण्यास सुरुवात केली. परंतु त्यांनी पूर्णपणे विषय मांडण्यापूर्वीच महापौरांनी अनुकूल-प्रतिकूल म्हणत प्रस्ताव मंजूर केला. कोरगावकर यांनी जेव्हा हा विषय वाचायला सुरुवात केली, तेव्हाच मी हात वर केला होता, परंतु आमच्याकडे न पाहता महापौरांनी तो मंजूर केला, असा दावा भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांनी केला. महापौर चर्चाच करू देत नाहीत, असे सांगत त्यांनी सभागृहाच्या कामकाजावर नाराजीही व्यक्त केली. या प्रस्तावात स्थानिकांना सकाळ व संध्याकाळ फिरण्यासाठी जो १५० रुपयांचा शुल्क आकारला जाणार आहे, त्याला भाजपाचा मुख्य विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.


पहारेकरी झोपले

स्थायी समितीत विरोध करणारे भाजपाचे नगरसेवकांचे प्रत्यक्षात सभागृहात हा प्रस्ताव मंजूर होताना लक्ष नव्हते. स्वत:ला पहारेकरी म्हणणारे भाजपावाले महापालिकेत झोपले आणि राणीबागेच्या शुल्कवाढीचा प्रस्तावशिवसेनेने मंजूर केला. महापालिका सभागृहात हा प्रस्ताव रोखून धरण्याची भाषा करणाऱ्या भाजपाचा विरोध आता कुठे गेला? असा सवाल करत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पहारेकऱ्यांचा विरोध हा केवळ दिखावाच असल्याचा आरोप केला. भाजपाने या प्रस्तावाला विरोध न दर्शवल्यामुळे एकमुखी हा प्रस्ताव मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.


१ ऑगस्टपासून नवी शुल्कवाढ लागू

 • फक्त पेंग्विन पाहण्यासाठी ५० रुपये
 • दोन मुलांसह पालकांना : १०० रुपये
 • ४ माणसांनंतर अतिरिक्त व्यक्तीसाठी : प्रत्येकी ५० रुपये
 • तीन ते १२ वयोगटांतील मुलांसाठी : २५ रुपये


शालेय विद्यार्थ्यांसाठी -

 • पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क
 • खासगी शाळेतील १२ वर्षांवरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी २५ रुपये


जॉगिंगसाठी आकारण्यात येणारे शुल्क

 • सकाळी सहा ते आठपर्यंत मॉर्निंग वॉकसाठी : मासिक १५० रुपये
 • संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत फेरफटका बंद
 • ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी : नि:शुल्क


परदेशी पर्यटकांसाठी -

 • १२ वर्षांवरील व्यक्तीसाठी : ४०० रुपये
 • तीन ते १२ वर्षांपर्यंतच्या व्यक्तीसाठी : २०० रुपयेहेही वाचा

पेंग्विनच्या विशेष कक्षाला तडे

पेंग्विनच्या घरात 'पाळणा' हलणार का ?


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
ताज्या बातम्या