‘या’आधीही वादग्रस्त वक्तव्यांमुळे वारिस पठाण आले होते अडचणीत

एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी याआधीही अनेकदा आक्षेपार्ह वक्तव्य करून वाद ओढावून घेतले आहेत. त्यात नव्याने भर पडली आहे. यावर एक नजर टाकूया:

‘या’आधीही वादग्रस्त वक्तव्यांमुळे वारिस पठाण आले होते अडचणीत
SHARES

‘एमआयएम’चे नेते आणि प्रवक्ते वारिस पठाण (AIMIM Waris Pathan) आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आक्षेपार्ह वक्तव्य करून चर्चेत राहायचं पठाण यांना चांगलंच जमतं. परंतु यंदा त्यांनी जाहीर व्यासपीठावरून असं काही वक्तव्य केलं की खुद्द पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना देखील हे वक्तव्य रूचलेलं नाही. यामुळे नाराज ओवेसींनी पठाण यांची प्रवक्ते पदावरून तडकाफडकी उचलबांगडी केली. 

‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आपल्या आक्रमक शैलीसाठी ‘कु’प्रसिद्ध तर आहेतच. पण त्यांच्या पक्षातील नेतेही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत चालताना दिसतात. वारिस पठाण देखील यापैकीच एक. पेशाने वकील असलेले ५१ वर्षीय वारिस पठाण एमआयएमच्या तिकीटावर २०१४ मध्ये भायखळा मतदारसंघातून विधानसभेत निवडून आले होते. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव यांनी त्यांना धूळ चारली. त्यानंतर पक्षाचं प्रवक्तेपद सांभाळणाऱ्या पठाण यांनी याआधीही अनेकदा आक्षेपार्ह वक्तव्य करून वाद ओढावून घेतले आहेत. त्यात नव्याने भर पडली आहे. यावर एक नजर टाकूया:

वारिस पठाण (aimim waris pathan) यांनी १५ फेब्रुवारीला कर्नाटकातील (karnataka) गुलबर्गामध्ये एक भाषण (speech) केलं होतं. त्यात सीएए आणि एनआरसीला विरोध करण्यासाठी दिल्लीतील शाहीन बागमध्ये आंदोलनाला बसलेल्या मुस्लिम महिलांचा धागा पकडून पठाण आपल्या भाषणात म्हणाले, जशास तसं प्रतिउत्तर द्यायचं आम्हीही शिकलो आहोत. पण त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं लागेल. स्वातंत्र्य मिळवावं लागेल आणि जी गोष्ट मागितल्याने मिळत नसेल, ती गोष्ट आता हिसकावून घ्यावी लागेल, हे सुद्धा लक्षात ठेवा. 

आम्हाला बोलतात की आया-बहिणींना पुढं पाठवलं आणि स्वत: ब्लॅंकेटमध्ये बसलेत. पण त्यांना सांगू इच्छितो की आता तर फक्त सिंहिंणीच बाहेर पडल्या आहेत तरी तुम्हाला घाम फुटला आहे. जर आम्ही देखील त्यांच्यासोबत बाहेर पडलो, तर तुमचं काय होईल, याचा विचार करा. आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. असं वादग्रस्त विधान पठाण यांनी केलं. या सभेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

हेही वाचा- वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर विधानाला मनसेनंही ‘असं’ दिलं उत्तर

महत्त्वाची बाब म्हणजे या व्यासपीठावरून वारिस पठाण यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्याच व्यासपीठावर पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी देखील उपस्थित होते. पठाण यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर देशातील सर्वच प्रमुख पक्षांतील नेत्यांनी वारिस पठाण यांच्यावर टीका केली. 

मनसे नेते बाळा नांदगावकर (bala nandgaonkar) यांनी कुणाच्या जीवावर तुम्ही असं वक्तव्य करताहेत? बांगलादेशी आणि पाकिस्तानी तुमचे बाप आहेत का? अशा शब्दांत पठाण यांना झापलं. तर तुम्ही कोणाचे नोकर आहात? १५ कोटी मुस्लिमांचा ठेका तुम्हाला कुणी दिला, असा प्रश्न प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (javed akthar) यांनी पठाण यांना विचारला.

पठाण यांनी जनतेला आव्हान देऊ नये. त्यांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही देखील हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, असं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी केलं.

त्यानंतरही ‘मी संविधानाच्या मर्यादेत राहूनच बोललो आहे, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, जे लोक विरोध करत आहेत तेच कायद्याच्या विरोधात आहेत. भाजप आम्हाला १३० कोटी लोकांपासून वेगळं करण्याच्या घाट घालत आहे.’ असं म्हणत पठाण यांनी माफी मागण्यास नकार दिला. त्यानंतर पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) यांनी पठाण यांच्यावर कारवाई केली. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करत जागोजागी त्यांचे पुतळेही जाळले जात आहेत.

वारिस पठाण (waris pathan) सर्वात पहिल्यांदा चर्चेत आले होते ते २०१६ मध्ये भाजप आमदार राम कदम (bjp mla ram kadam) यांच्यासोबत झालेल्या हमरातुमरीमुळे. राम कदम यांनी विधानसभेत पठाण यांना भारत माता की जय म्हणायला सांगितलं होतं. मात्र जीव देईन, पण भारत माता की जय म्हणणार नाही, असं म्हणणाऱ्या पठाण यांना विधीमंडळाचा अनादर केल्याप्रकरणी विधानसभेतून निलंबित करण्यात आलं होतं.

यावर खुलासा करताना पठाण म्हणाले होते की, मी आपल्या देशावर प्रेम करतो, मी इथंच जन्माला आलो आणि याच मातीत मरेन. मी जय हिंद, जय भारत, हिंदुस्तान जिंदाबाद चा नारा लगावेन, पण भारत माता की जय बोलणार नाही.

हेही वाचा- वारिस पठाण यांचा माफी मागण्यास नकार, पुणे पोलिसांत तक्रार दाखल

त्यानंतर पठाण पुन्हा चर्चेत आले ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे (mns chief raj thackeray) यांच्यावर केलेल्या टीकेमुळे 'मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा आहेत, त्यांचं वक्तव्य गांभीर्याने घेऊ नये', अशी टीका पठाण यांनी केली होती. ज्यांना निवडून आलेला एक आमदारही सांभाळता येत नाही, त्यांनी उगाच मोठ्या घोषणा करु नयेत. माध्यमांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याला प्रसिद्धी देऊ नये, असा हल्लाबोल वारिस पठाण यांनी राज ठाकरेंवर केला होता. 'सीमेवर जवान शहीद होत आहेत, कुठे आहेत अच्छे दिन आणणारे?' असा प्रश्न विचारत 'थोडे दिवस थांबा आम्ही काय करतो ते पहा' असं वक्तव्यही वारिस पठाण यांनी भाजपविरोधात केलं होतं.

एका कार्यक्रमात तलवार नाचवल्यामुळेही वारिस पठाण टीकेचं लक्ष्य झाले होते. भायखळ्यात इद-ए-मिलाद च्या कार्यक्रमात भर गर्दीत तलवार नाचवल्यामुळे त्यांच्यावर आणि या कृत्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल मुंबई पोलिसांवरही टीका करण्यात आली होती. 

एकदा तर वारिस पठाण यांना पक्षातील कार्यकर्त्यांनीच घरचा आहेर दिला होता. निमित्त होतं एका गणेशोत्सव मंडळाला भेट दिल्याचं. २०१८ मध्ये एका मंडळाला भेट दिल्यानंतर गणपती बाप्पा तुम्हा सगळ्यांची दुःखं दूर करो, असा संदेश त्यांनी दिला होता. त्यानंतर पक्षातून त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. या टीकेनंतर यापुढे मी कधीही गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही. माझी चूक झाली असं म्हणत त्यांनी मुस्लिम बांधवांची माफी मागणारा एक व्हिडिओ ट्विटर हँडलवर पोस्ट केला.

यामध्ये ते म्हणतात की, काही दिवसांपूर्वी माझ्या तोंडून अशी काही वाक्ये निघून गेली त्याबद्दल मी अल्लाहची माफी मागितली आहे. मी पण एक माणूस आहे माझ्याकडून चूक झाली आहे. यापुढे पुन्हा कधीही असे घडणार नाही असंही आश्वासन त्यांनी दिलं. प्रत्येक माणसाकडून चुका होतात, तशी माझ्याकडूनही चूक झाली. अल्ला मला माफ करेल यात मला काहीही शंका वाटत नाही. तसंच सगळ्या मुस्लिम बांधवांनी माझ्यासाठी दुवा करावी, अशी विनंती केली.

वारिस पठाण यांच्या एकापाठोपाठ एक वादग्रस्त वक्तव्याकडे पाहता, ते आपल्या पक्षप्रमुखाची जागा घेण्यासाठी योग्य उमेदवार आहेत, असंच म्हणता येईल.

संबंधित विषय