Advertisement

पोलिसांना विश्रांतीची गरज, केंद्राने मनुष्यबळ द्यावं- उद्धव ठाकरे

आवश्यकता भासेल तसं केंद्र सरकारने त्यांचं मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास पोलिसांवरचा ताण कमी होईल, अशी मागणीही केली. सोमवार ११ मे रोजी पंतप्रधानांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

पोलिसांना विश्रांतीची गरज, केंद्राने मनुष्यबळ द्यावं- उद्धव ठाकरे
SHARES

लॉकडाऊन (lockdown) काही प्रमाणात शिथिल करताना आपण ग्रीन झोन्समध्ये उद्योग-व्यवसाय सुरु होतील असं पाहिलं आहे. परप्रांतीय मजुरांची वाहतूक सुरु झाली आहे. मात्र हे करताना प्रत्येक राज्याने व्यवस्थित काळजी आवश्यक आहे. अन्यथा कोरोना संसर्ग (coronavirus) देशभर वाढू शकतो, असा धोक्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. सोबतच आवश्यकता भासेल तसं केंद्र सरकारने त्यांचं मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास पोलिसांवरचा ताण कमी होईल, अशी मागणीही केली.  सोमवार ११ मे रोजी पंतप्रधानांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

मजुरांना घराची ओढ

यासंदर्भात अधिक बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) म्हणाले, लॉकडाऊनबाबत पंतप्रधानांनी निश्चित व ठोस अशी दिशा दाखवावी, आम्ही सर्व राज्ये त्याप्रमाणे अंमलबजावणी करू. गेल्या दोन महिन्यांपासून सर्वजण अडकले आहेत. परराज्यातील मजुरांना घराची ओढ लागली आहे. इतर राज्यांतले महाराष्ट्रीय परत येत आहेत. हे मजूर विविध झोन्समधून ये-जा करीत आहेत, अशा वेळी सर्वांनी व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे, अन्यथा देशात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. महाराष्ट्राने साडेपाच लाख मजुरांच्या निवारा व नाश्ता, भोजनाची व्यवस्था चोखपणे ठेवली आहे तसंच इतर राज्यांशी समन्वय ठेऊन मजुरांना पाठवणं सुरु केलं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा- मुंबई लोकल सुरू करु द्या, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती

मनुष्यबळ द्यावं  

केंद्रीय पथकांनी मुंबई-पुणे इथं भेटी दिल्या असून उपयुक्त सूचना केल्या आहेत. इथं डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस अहोरात्र काम करीत आहेत. विशेषत: पोलिसांना  मधूनमधून विश्रांती देण्याची गरज आहे. त्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्थेचं काम आहे, ते आजारी पडून चालणार नाही. त्यामुळे आवश्यकता भासेल तसं केंद्र सरकारने त्यांचं मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास पोलिसांवरचा ताण कमी होईल. त्याचप्रमाणे केंद्रीय संस्था, पोर्ट ट्रस्ट, लष्कराची रुग्णालये व आयसीयू बेड्स सुविधाही मिळाल्यास पुढे कोरोनाशी लढताना त्याचा उपयोग होईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबईतील व्यवस्था

मुंबईतील कंटेनमेंट क्षेत्राकडे अधिक काटेकोर लक्ष देण्यात येत असून  लॉकडाऊनची अधिक कठोर अंमलबजावणी. चाचण्यांची संख्याही खूप वाढवली आहे. नेहरू सायन्स सेंटर, रेसकोर्स मैदान, वांद्रा-कुर्ला संकुल, गोरेगाव एक्झिबिशन सेंटर येथे विलगीकरणाची, उपचाराची व्यवस्था केल्याचेही ते म्हणाले. मुंबई-पुणे सारखा तज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स देशाच्या पातळीवर तयार करून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तो संपर्कात राहील, असं पाहण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.   

संसर्ग वाढण्याची शक्यता

आपण एप्रिल मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला. आता असे सांगण्यात येतं की मेमध्ये या रोगाचा उच्चांक येईल, तो जून , जुलैमध्येही येऊ शकतो असंही बोललं जात आहे. वुहानमध्ये परत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झालाय असं मी वाचलं. जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा इशारा दिला आहे. अशा वेळी लॉकडाऊनबाबत काळजीपूर्वक कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

हेही वाचा- थकलेला जीएसटी लवकर द्या, मुख्यमंत्र्यांनी पुन्हा करून दिली पंतप्रधानांना आठवण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा