एकत्रित नव्हे, प्रत्येक महिन्याला मिळणार मोफत रेशन- छगन भुजबळ

नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रति व्यक्ती ५ किलो अतिरिक्त तांदुळ मोफत देण्याची अधिकृत सूचना प्राप्त झाली आहे, त्यानुसार हे धान्य वाटप करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

एकत्रित नव्हे, प्रत्येक महिन्याला मिळणार मोफत रेशन- छगन भुजबळ
SHARES

राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून (Ration supply) एप्रिल आणि  मे सोबत जून महिन्याचं धान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने १९ मार्चला घेतला होता. दरम्यान  केंद्र शासनाकडून ३० मार्च २०२० रोजी एप्रिल ते जून २०२० दरम्यान नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रति व्यक्ती ५ किलो अतिरिक्त तांदुळ मोफत देण्याची अधिकृत सूचना प्राप्त झाली आहे, त्यानुसार हे धान्य वाटप करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (food and civil supply minister chhagan bhujbal) यांनी दिली.  


हेही वाचा - आर्थिक संकटाला तोंड देण्यास तयार रहा, शरद पवार यांचा इशारा

एकत्रित वाटप गैरसोईचं

पुढील ३ महिन्यांचा अन्नधान्य साठा आणि ३ महिन्यांचे मोफत तांदुळ (wheat and rice supply) एकत्रितपणे उपलब्ध करून दिल्यास शिधा वाटप दुकानांमध्ये साठवणूक करणं जिकीरीचे होईल ही बाब शिधा वाटप दुकानदार संघटनांकडून शासनाच्या निदर्शनास आणण्यात आली तसंच केंद्र सरकारने ३० मार्च रोजी मोफत तांदुळ देण्याचा निर्णय घेतल्यामुळे २ दिवसांत धान्याची वाहतूक करण्यासाठी मर्यादा असल्यामुळे त्या त्या महिन्यामध्ये, त्या महिन्याचे धान्य वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं छगन भुजबळ म्हणाले.

७ कोटी जनतेला लाभ

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर, त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची केंद्र सरकारची  सूचना आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्ड धारकाला त्याने नियमित अन्न धान्याची खरेदी केल्यानंतर, प्रति व्यक्ती ५ किलो तांदुळ त्या त्या महिन्यात मोफत उपलब्ध करून देण्यात येईल. राज्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

लवकरच तांदळाचं वाटप

राज्यभरातील ४०० व्हाटसअॅप ग्रुपच्या माध्यमातून सर्व रेशन धान्य दुकानदारांना याबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत. सामान्य जनतेची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घेण्यास सांगितलं आहे. त्याचप्रमाणे राज्यातील २ लाखाहून अधिक शिधापत्रिका धारकांनी नियमित धान्य घेतले आहे. तसंच सर्व रेशन धान्य दुकानांमध्ये आवश्यक धान्य पुरवठा करण्यात येत असून नियमित धान्य खरेदीनंतर शिधापत्रिका धारकांना लवकरच मोफत तांदळाचे वाटप केलं जाईल.

हेही वाचा- चिंता नको, ६ महिने पुरेल इतका अन्नधान्यसाठा उपलब्ध- छगन भुजबळ

७ वर्षांपर्यंत कैद

सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक  ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास ७ वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचंही छगन भुजबळ यांनी सांगितलं.


संबंधित विषय