Advertisement

आर्थिक संकटाला तोंड देण्यास तयार रहा, शरद पवार यांचा इशारा

योग्य काळजी घेतली नाही, तर आर्थिक संकटाला तोंड देण्याची वेळ आपल्यावर येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

आर्थिक संकटाला तोंड देण्यास तयार रहा, शरद पवार यांचा इशारा
SHARES

आरोग्यविषयक संकटातून उद्या मोठं आर्थिक संकटसुद्धा उभं राहणार आहे. त्यामुळे आपल्याला काटकरीचं धोरण स्वीकारावं लागेल. याची आपण योग्य काळजी घेतली नाही, तर आर्थिक संकटाला तोंड देण्याची वेळ आपल्यावर येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (ncp chief sharad pawar) यांनी दिला. पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सोमवारी जनतेशी संवाद साधला. 

काटकसरीचं धोरण हवं

या आरोग्यविषयक (coronavirus) संकटातून उद्या मोठे आर्थिक संकटसुद्धा उभं राहील. आज जवळपास सर्व व्यवसाय, कारखानदारी, रोजगार, शेती, व्यापार बंद आहेत. या सगळ्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर मोठा होईल, यामध्ये काही वाद नाही आणि म्हणून आपण या सगळ्या परिस्थितीला सामोरे कसं जायचं याचा विचार केला पाहिजे. 

हेही वाचा - आपल्या लाईफस्टाइलमध्ये बदल करायची हीच वेळ- शरद पवार

इथून पुढचे काही दिवस आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये अतिशय काटकसरीने राहण्याच्या संबंधित विचार करावा लागेल. वायफळ खर्च देखील टाळावे लागतील. काटकसरीचं धोरण आपल्याला निश्चितपणे सांभाळावं लागेल, आपण सर्वांनी योग्य ती काळजी घेतली नाही तर उद्या आर्थिक संकटाला तोंड देण्याचा प्रसंग येईल.

यातून आपण काही शिकतोय का? हा प्रश्न आहे. मला स्वतःला असं वाटतंय की आपण काही शिकलो आणि जे अनुभव आपण घेतले ते आपल्याला इथून पुढच्या दैनंदिन जीवनात सुद्धा पाळावे लागतील. विशेषतः लाईफस्टाईल विषयक आपल्या काही सवयी आहेत त्यांच्यामध्ये बदल करण्याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यावी लागेल, असा इशारा शरद पवार यांनी दिला.

साठेबाजी नको

राज्यात अन्नधान्याचा पुरेसा साठा आहे, मालाची कमतरता अजिबात नाही. भाजीपाला,धान्याची दुकाने राज्यात सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना अशा सगळ्या संस्थांकडून मालाची खरेदी करताना साठेबाजी करण्याची गरज नाही. कारण मालाची उपलब्धता आपल्याकडे भरपूर आहे आणि जे जे यासाठी प्रयत्न करतात त्या सर्वांचं अभिनंदन.

घर चालवायचं म्हटल्यावर एलपीजी सिलिंडरचीही अत्यंत आवश्यकता असते. हे सिलिंडर घरोघरी पोहचवण्याचं काम या क्षेत्रातील लोक करत आहेत, त्यांचेदेखील अभिनंदन केले पाहिजे. अत्यावश्यक सेवा देणारे सर्वजण अभिनंदनास पात्र आहेत. असं म्हणत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांचं पवार यांनी कौतुक केलं. 

हेही वाचा - Coronavirus Update: अखेर राज्य सरकारने लावली परप्रांतीयांच्या खाण्यापिण्याची सोय!

दवाखाने सुरू ठेवा

सध्या काही खासगी दवाखाने वा हॉस्पिटल्स मध्ये ओपीडी बंद केल्याचं माझ्या कानांवर आलं. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलद्वारे आमचे अनेक सहकारी रात्रंदिवस लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहेत, अनेक ठिकाणी डॉक्टर अहोरात्र काम करत आहेत.

तर, दुसऱ्या बाजूला डॉक्टरांनी ओपीडी बंद केली किंवा रूग्णांना घ्यायचं बंद केलं, हा विरोधाभास योग्य नाही. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या प्रतिमेला यामुळे धक्का बसेल. माझं या सगळ्या वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना आवाहन आहे, की पुढील ३ आठवडे वैद्यकीय सेवा देण्याचे काम थांबवू नका, आपल्या दवाखान्याचे दरवाजे रूग्णांसाठी बंद करू नका. आज या सेवेची अत्यंत गरज आहे, असं आवाहन पवार यांनी डाॅक्टरांना केलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा