Advertisement

१५ दिवसांत मिळणार अंगणवाडी बालकांना घरपोच शिधा- यशोमती ठाकूर

३ ते ६ वर्षे वयोगटांतील बालकांना घरपोच शिधा देण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसांत संपूर्ण राज्यात १०० टक्के गरम ताज्या आहाराऐवजी कोरडा शिधा वाटपाचं उद्दिष्ट महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी निश्चित केलं आहे.

१५ दिवसांत मिळणार अंगणवाडी बालकांना घरपोच शिधा- यशोमती ठाकूर
SHARES

लाॅकडाऊनमुळे महिला व बालकल्याण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये दिला जाणारा शालेयपूर्व शिक्षण व पोषण आहार स्थगित करण्यात आला आहे. असं असलं तरी ३ ते ६ वर्षे वयोगटांतील बालकांना घरपोच शिधा देण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसांत संपूर्ण राज्यात १०० टक्के गरम ताज्या आहाराऐवजी कोरडा शिधा वाटपाचं उद्दिष्ट महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी निश्चित केलं आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीतही राज्याचा कारभार प्रभावीपणे हाकण्याचा प्रयत्न शासनातर्फे होत आहे. या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह अमरावती येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) यांच्याशी संपर्क साधून आढावा घेतला. 

हेही वाचा - आठवड्याभरात मिळेल घरपोच पोषण आहार- यशोमती ठाकूर

कोरोनामुळे अंगणवाड्यांमध्ये ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांना दिले जाणारे शालेयपूर्व शिक्षण व पोषण आहार हे उपक्रम सध्या बंद आहेत. मात्र, बालकांच्या पोषण आहारात खंड पडू नये यासाठी त्यांना घरपोच शिधा देण्याचे आदेश यशोमती ठाकूर यांच्यातर्फे देण्यात आले आहेत. गरम ताज्या आहाराऐवजी बालकांना १५ मे पर्यंत घरपोच शिधा (टीएचआर) दिला जाणार आहे. महाराष्ट्र कन्झ्युमर्स फेडरेशन लिमिटेडतर्फे हा शिधा पोहोचवला जाणार आहे. आतापर्यंत संपूर्ण राज्यात ४० टक्के पुरवठा झाला असून येत्या १५ दिवसांत राज्यभरात १०० टक्के शिधापुरवठा केला जाणार आहे. शिधा घरपोच देताना सामाजिक अंतराचं काटेकोर पालन केलं जात असून मास्क व हँडग्लोव्हजचा वापर केला जात आहे. अंगणवाडी सेविका लाभार्थी बालकाच्या पालकांना अंगणवाडीत बोलावून पॅकिंग स्वरूपातील शिधा देत आहेत. 

या कॉन्फरन्समध्ये महिला व बालविकास सचिव आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास योजना इंद्रा मालो, महिला व बालविकास आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रद्धा जोशी, बाल हक्क आयोगाच्या सदस्य सचिव सीमा व्यास, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव आस्था लुथरा आदी सहभागी झाले. 

यामुळे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून बालकांच्या घरापर्यंत शिधा पोहचू शकेल. जेणेकरून लाॅकडाऊनच्या काळात बालकांना आणि पालकांना दिलासा मिळू शकेल.

हेही वाचा - महाराष्ट्राला दरमहा १० हजार कोटी द्या, अजित पवारांची केंद्राकडे मागणी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा